पंकज भोसले

नायक-नायिकेची अनपेक्षितरीत्या भेट आणि फुलत जाणाऱ्या प्रेमाच्या वळणांवर येणाऱ्या काटय़ांवर मात करीत चालणारी नाटय़मयी सुफल प्रेमकहाणी हॉलीवूड आणि बॉलीवूडच्या चित्रपटप्रेमींना नेहमीच पाहायला आवडते. लग्न हे अंतिम ध्येय असणाऱ्या आणि त्यापूर्वी (अन् नंतरचेही) सहजीवन स्वर्गासमान असल्याचा भ्रम निर्माण करणाऱ्या चित्रपटांनी गेल्या सिनेआरंभ काळापासून देशोदेशातील सामान्य नागरिकांच्या प्रेमकहाण्या फुलविल्या. साठोत्तरीच्या दशकांत अमेरिकी वास्तववादी सिनेमांच्या लाटेत प्रेम-नात्यांच्या आणि लग्नसंस्थेच्या कचकडय़ा स्वरूपावर चर्चा सुरू झाली. चाळीस वर्षांपूर्वी ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ या चित्रपटाने नायक-नायिकेच्या घटस्फोटानंतर त्यांच्या लहान मुलाच्या ताब्यावरून तयार होणाऱ्या वितंडाची गोष्ट प्रभावीरीत्या मांडली होती. स्व-पुढाकाराने आणि सामंजस्याने होणाऱ्या नायक-नायिकेच्या काडीमोडीची कथा पार ऑस्कर सोहळा गाजवून गेली होती. नामांकने जाहीर होण्यापूर्वीच नोआ बाऊमबाक या दिग्दर्शकाचा ‘मॅरेज स्टोरी’ हा चित्रपट यंदाच्या ऑस्कर सोहळ्यावर छाप पाडणार अशी अटकळ बांधली जात आहे. ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’मधील वैवाहिक वादाची परिस्थिती चार दशकांनतर अधिक पुढारलेल्या समाजात अधिक प्रभावीप्रमाणे यातील अभिनेत्यांनी मांडली आहे.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?

चित्रपटाला आरंभ होतो समुपदेशकाच्या खोलीमध्ये घटस्फोटेच्छुक निकोल (स्कार्लेट जोहान्सन) आणि चार्ली (अ‍ॅडम ड्रायव्हर) एकमेकांविषयी काय वाटते यांच्याविषयी लिहिलेले टिपण सादर करण्यासाठी सज्ज असताना. दोघेही एकमेकांसमोर टिपण वाचू शकत नाहीत, तरी त्यातल्या एकमेकांविषयीच्या समसमान प्रेमाचे-आदराचे-आपुलकीचे आणि समविचारांचे प्रतिबिंब ध्वनिस्वगतांमधून प्रेक्षकांच्या कानी पडलेले असते. चार्ली हा न्यू यॉर्कमधील रंगभूमीवरील प्रथितयश दिग्दर्शक-कलावंत आहे. निकोल पूर्वाश्रमीची चित्रपट अभिनेत्री आणि आता चार्लीच्या हौशी-प्रायोगिक नाटकमंडळींमधील प्रमुख अभिनेत्री आहे. दोघांच्या एकमेकांवरील प्रेमाला ओहोटी लागलेली नसताना निकोल त्याच्यापासून काडीमोड घेऊ इच्छिते. चार्लीचा आत्ममग्न, स्व-केंद्रित, स्व-गरजांना कुरवाळत राहण्याच्या स्वभावाचे आणि एकदा केलेल्या प्रतारणेचे कारण पुढे करून ती या निर्णयावर येते. मात्र या साऱ्या गुण-अवगुणांची मात्रा आपल्यातदेखील सारख्याच प्रमाणात असल्याचे ती विसरून जाते. न्यू यॉर्कहून लॉस एंजेलिस येथे टीव्ही मालिकेच्या चित्रणासाठी जाताना ती आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन जाते. मुलाच्या कायदेशीर ताब्यासाठी निकोल लॉस एंजेलिसमध्ये अर्ज करते आणि न्यू यॉर्कमध्ये आपल्या नाटकाच्या तालमींमध्ये गुंतलेल्या चार्लीसमोर अडचणींचे अनंत डोंगर उभे राहण्यास सुरुवात होते.

नोआ बाऊमबाक याच्या चित्रपटांची गंमत म्हणजे वरवर शोकांतिका वाटणाऱ्या विषयांना अत्यंत तिरकसपणे हाताळून पाहण्याची खोड. ‘मार्गो अ‍ॅट द वेडिंग’, ‘व्हाइल वी आर यंग’, ‘मिस्ट्रेस अमेरिका’, ‘मेयरोविट्झ स्टोरीज (न्यू अ‍ॅण्ड सिलेक्टेड)’ हे चित्रपट पाहिल्यास त्याची प्रचीती येईल.  ‘स्क्वीड अ‍ॅण्ड व्हेल’ या आपल्या पहिल्याच चित्रपटात चौकोनी कुटुंबातील व्यक्तींच्या जीवनात घटस्फोटानंतर होणारी उलथापालथ काहीशा विनोदाच्या अंगाने या दिग्दर्शकाने दाखविली होती. बऱ्याच प्रमाणात दिग्दर्शकाची स्वत:ची आत्मकथा असलेल्या या चित्रपटाचे प्रचंड कौतुक झाले होते. कारण चित्रपट घटस्फोटाकडे सामाजिक प्रश्न म्हणून पाहत नव्हता. पालकांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे लहान मुलांच्या आयुष्याची वाताहत वगैरे होते, असे सांगण्याच्या किंवा कोणताही संदेश-सल्ला देण्याचा त्याचा प्रयत्नही नव्हता. ‘मॅरेज स्टोरी’ही त्याच शैलीमध्ये साकारला आहे. स्वाभिमान, आत्मसन्मान आणि एकमेकांचा आदर राखत लग्नाची सात पावले उलटी चालण्याचा संघर्ष येथे रंगविण्यात आला आहे. कुटुंब न्यायालयात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा किंवा एखाद्याला नालायक ठरविण्याचा व्यवसायातून तयार झालेला वकिली कावा निकोल आणि चार्ली सारख्याच प्रमाणावर हाणून पाडतात. फारसे न भांडता या प्रक्रियेत एकमेकांचे सांत्वन करताना दिसून येतात.

चार्लीच्या नाटक कंपनीतील कलावंतांच्या सूक्ष्म तपशिलांसह निकोलच्या आई-बहिणीशी चार्लीचे टिकून असलेले मैत्रीचे नाते चित्रपटातील तिरकस विनोदाची धार आणखी वाढवितात. चार्लीकडे मुलाचा ताबा द्यायचा की नाही, याबाबत पडताळणी करण्यास आलेल्या न्यायालयाच्या प्रतिनिधीसमोर त्याच्याकडून होणाऱ्या प्रमादाचा प्रसंग अ‍ॅडम ड्रायव्हरने अत्यंत सुंदर वठविला आहे. घटस्फोटानंतरच्या त्याच्या स्वगतगीताच्या सलगदृश्यातही त्याने जीव ओतला आहे.

चित्रपटात काडीमोडीच्या गोष्टींपेक्षा प्रेमजुळवणीच्या कथांना प्रेक्षकांकडून अधिक पसंती असली, तरी हा चित्रपट घटस्फोट आणि दाम्पत्यातील मतभेदांना ज्या प्रकारे दाखवतो, त्यासाठी सध्या गौरविला जात आहे. सामाजभयाच्या नावाखाली कुण्या एकेकाळी तडजोड करीत आयुष्य जगणारी विवाहस्थिती आता आपल्याकडेही बदलू लागली असल्यामुळे हा चित्रपट ऑस्करच्या नामांकन यादीत पोहोचण्याआधीच पाहण्यास हरकत नाही.