भक्ती परब

राकेश ओमप्रकाश मेहरा हे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून आदरानं घेतलं जातं. २००१ मध्ये त्यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘अक्स’ नावाचा चित्रपट केला. त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. अमिताभ यांच्या भूमिकेचंही कौतुक झालं. त्यांच्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाने भारताबरोबरच इतर देशांमध्येही चांगली कमाई केली. त्यानंतरच्या ‘दिल्ली ६’ आणि ‘मिर्झिया’ या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही, मात्र फरहानला मुख्य भूमिकेत घेऊन के लेला ‘भाग मिल्खा भाग’ हा चरित्रपट विशेष लोकप्रिय ठरला. आता ते ‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी झालेला संवाद..

आयुष्यात येणारी आव्हानं प्रत्येकाला काही ना काही शिकवून जातात. आपण नेहमीच वेगळं काय करता येईल? असा विचार करत राहतो. आपलं अंतर्मन सातत्यानं आपल्याला काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडण्यासाठी प्रेरित करत असतं. हा जो आपला आतला आवाज आहे तो ओळखून काम करणं याला मी महत्त्व देतो, असं मेहरा सांगतात. जाहिरातकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या मेहरा यांना चौकटीबाहेरचं वेगळं असं काही पटत नाही. ते म्हणतात, प्रत्येकाची स्वप्नं वेगळी आहेत, ती पूर्ण करण्याच्या वाटाही वेगवेगळ्या आहेत. ‘अक्स’ हा चित्रपट पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत असताना आपण योग्य क्षेत्रात आहोत, गोष्ट सांगणं हाच आपला व्यवसाय आहे ही जाणीव झाल्याचं त्यांनी सांगितलं.

चित्रपटकर्मी म्हणून मला नेमक्या कोणत्या पद्धतीने गोष्ट सांगायची? ती व्यावसायिक आहे की वेगळ्या वळणाची आहे? हे जाणून घेण्यासाठीच मी माझ्या अंतर्मनात डोकावतो. दिल्लीतील बालभारती एअरफोर्स विद्यालयात शालेय शिक्षण झाले. तिथे प्रवेशव्दाराजवळ मिग २१ विमानाची प्रतिकृती होती. अजूनही आहे. तिथेच आसपास आम्ही शाळेत सुट्टीच्या दरम्यान खेळत असायचो. ते विमान मनात कुठेतरी बसलं होतं. त्यानंतर श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये गेलो, तेव्हाही देशातील आणीबाणीमुळे एक वेगळं राजकीय वातावरण आजूबाजूला अनुभवत होतो. त्या काळात दिल्ली विद्यापीठातील मुलांच्या विचारधारा वेगवेगळ्या होत्या. राजकारणाविषयी त्यांची काही एक मतं होती. तिथे सगळे व्यवस्थेला दोष देत बसायचे. पण स्वत: कुठलं कर्तव्य, कृती करायचे नाहीत. लहानपणापासून माझ्या घराजवळच असलेल्या लाल किल्ल्यावरचं ध्वजारोहण आणि पंतप्रधानांची भाषणं ऐकली. या सगळ्यातून माझी जडणघडण झाली, असं मेहरा म्हणाले.

तुम्ही काय सांगता त्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात काय क रता त्यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाला ओळख मिळते. ‘रंग दे बसंती’ चित्रपटाला सेन्सॉरच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. आता सेन्सॉर वगैरे काही नसून फक्त प्रमाणपत्र देणं एवढय़ापुरतंच ते उरलं आहे. हे प्रमाणपत्र देताना हिंसा, अमली पदार्थ, आयटम साँग, नग्न दृश्यं त्यात नाही ना या गोष्टी पाहिल्या जातात. मला वाटतं १८ वर्षांपर्यंतच्या मुलांनी असे चित्रपट पाहू नयेत, अशी सेन्सॉर बोर्डाची अट असावी. पण १८ वर्षांनंतर त्याने काय पहावं हे सांगायला सेन्सॉरची गरज नाही, असं परखड मत त्यांनी मांडलं.

‘मेर प्यारे प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाविषयी ते म्हणाले, सरगम नावाची एकल माता आपल्या मुलाबरोबर राहतेय. एके दिवशी तिच्यावर बलात्कार होतो. ज्या कारणामुळे तिच्यावर बलात्कार होतो, कुठली परिस्थिती त्याला कारणीभूत ठरते, त्या घटनेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा आहे, हे चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बलाकाराच्या घटनांमध्ये वाढ, त्याची आकडेवारी, न्यायालयीन प्रकरणे, फाशी दिली जावी, शिक्षेच्या बाबतीतली मतमतांतरे, मग जिच्यावर बलात्कार झालाय ती बदला घेते वगैरे असं सगळं चित्रण आधी अनेक चित्रपटांतून आलं आहे. मला ते दाखवायचं नाही. आपण बलात्काराच्या घटनेकडे कसे पाहतो, त्याचा सामना कसा करतो, त्या स्त्रीला कोणत्या यातनांतून जावं लागतं, हे दाखवण्यावर भर दिला आहे. आपण अनेकदा जिच्यावर बलात्कार झालाय तिलाच दोषी ठरवतो. आपण मुलींना लहानपणापासून कसे वाढवतो, आपण मुलींकडे मुळात कसे पाहतो, या गोष्टीत बदल झाला पाहिजे. एका २४ वर्षीय आईची आणि तिच्या ८ वर्षांच्या मुलाची ही गोष्ट आहे. आईवर बलात्कार झाल्यावर त्याला आपल्या आईची काळजी वाटू लागते. त्यामुळे तो पंतप्रधानांना पत्र लिहितो, असं हे कथानक आहे. हा एक सामाजिक चित्रपट आहे. आपण मुलींना लहानाचं मोठं करताना जो भेदभाव करतो, त्यात बदल होण्याची आवश्यकता आहे. मुलगा बाहेरून कधीही घरी आला तरी चालेल, पण मुलीने लवकर घरी आलं पाहिजे. मुलाला कधी बजावत नाही, तूही वेळेत घरी ये. इथूनच असमानतेला सुरुवात होते, हे बदलायला हवं.

चित्रपट ही एक कला असली तरी त्यामध्ये व्यवसायाची गणितंही आहेत. त्यामुळे त्याचा समतोल साधणं गरजेचं असल्याचंही ते स्पष्ट करतात. चित्रपट माध्यमात विविध प्रकारची गुंतवणूक असते. त्यामुळे आशयघन चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याबरोबर त्या चित्रपटाने व्यवसायही नीट केला पाहिजे हीसुद्धा एक जबाबदारी असते. त्यात धोका पत्करणं हा भागही येतो. माझ्यासाठी आर्थिक गणितं सांभाळण्यापेक्षा मी जे खूप जवळून पाहिलंय, अनुभवलंय ते या माध्यमातून लोकांपर्यंत अचूक पोहोचवणं हेच आव्हान राहिलं असल्याचं मेहरा यांनी  एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

जे चित्रपट मला विचार देतात. ते हसायला, रडायला किंवा माझ्यातल्या एखाद्या भावनेला साद घालतात, असेच चित्रपट मला एक प्रेक्षक म्हणून बघायला आवडतात. ‘दो आँखे बारह हाथ’ हा चित्रपट मला कधीही पाहायला आवडतो. व्ही.शांताराम माझे आवडते दिग्दर्शक आहेत.

‘मेर प्यारे प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातूनही एक वेगळा विषय समोर आणण्याचा प्रयत्न आहे. बलात्कार झालेल्या स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन यावर चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. बलात्कार झाल्यावर बदला घेतला पाहिजे, फाशी झाली पाहिजे असा सूर उमटतो. हे तर करायचंच आहे. पण त्याआधीही मुळात असं वातावरण का आहे, अशा घटनांचं प्रमाण का वाढतंय, यावर विचार झाला पाहिजे. बलात्कार ही एक शारीरिक जखम आहे आणि त्याहीपेक्षा ती एक मानसिक जखमसुद्धा आहे. ती आयुष्यभर स्त्रीचा पिच्छा सोडत नाही. अशा स्त्रीला आता तुझं कसं होणार? या पद्धतीने पाहिलं जातं. त्यापेक्षा ही घटना घडल्यानंतर आयुष्यात पुन्हा उभं राहणं तिला कोणी शिकवत नाही, साथ देत नाही. यासाठी हा चित्रपट एक आरसा ठरेल.

-राकेश ओमप्रकाश मेहरा

Story img Loader