रवींद्र पाथरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेले सुमारे साडेपाच महिने नाटक व नाटय़गृहे करोनाकहरामुळे जवळजवळ ठप्प आहेत. ती पुन्हा कधी सुरू होतील हे कुणीच सांगू शकत नाहीत. आणि समजा, एखाद्दोन महिन्यांनी नाटय़गृहे सुरू झाली तरी प्रेक्षक तिथे जाऊन नाटकं बघायला धजतील का, हा आणखीन वेगळा मुद्दा आहे. आजही करोनाचा धिंगाणा सुरू आहे. त्यामुळे सगळे नाटय़कर्मी हताश, हतबल झालेले आहेत. प्रश्न फक्त त्यांच्या रोजी-रोटीचाच नाही, तर कलेची भूकही कधी पूर्ण होणार हाही आहेच. अर्थात आजचे बहुतांश कलाकार हे आपल्या कलाभिव्यक्तीवरच उदरनिर्वाह करीत असल्याने त्यांच्यापुढे भविष्याबद्दल मोठेच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे, ही वस्तुस्थिती आहेच. यावर उपाय काढण्याचे त्यांचे त्यांचे आपापल्या परीने प्रयत्नही जारी आहेतच. परंतु त्या प्रयत्नांनाही मर्यादा आहेत. आणि सगळ्याच गोष्टी काही स्वस्वाधीन नसल्याने त्यांची कितीही इच्छा असली तरी करोनापूर्व काळात ते ज्या तऱ्हेने कामांत व्यग्र होते ती स्थिती सध्या तरी शक्य नाही. यावर हृषीकेश जोशी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ‘ऑनलाइन नाटक’ नावाची नवी संकल्पना काढली आहे आणि आपल्या ‘नेटक’ या संस्थेतर्फे तेजस रानडे लिखित आणि हृषीकेश जोशी दिग्दर्शित ‘मोगरा’ या नव्याकोऱ्या नाटकाचे धडाक्यात प्रयोग सुरू केले आहेत. लवकरच त्याचे ५० प्रयोग होत आहेत. ‘ऑनलाइन नाटक’ ही नेमकी काय संकल्पना आहे? तर सगळेच जण (यात कलाकार, तंत्रज्ञ आणि टेक्निकल टीम असे सगळेच आले.) आपापल्या घरून हे नाटक सादर करतात.. लाइव्ह! आणि जगभरातले प्रेक्षक ते एकाच वेळी पाहू शकतात. अर्थात रीतसर तिकिटे काढूनच! आहे की नाही भन्नाट आयडिया!
तर या नाटकाबद्दल..
हे निरनिराळ्या काळांतील स्वत्वाचं भान आलेल्या पाच जणींचं आत्मकथनपर असं नाटक आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वानंदीपासून ते वर्तमान काळातील बलात्कारित रियापर्यंत वेगवेगळ्या पाच स्त्रियांचा मानसिक-भावनिक-आत्मिक संघर्ष यात चितारलेला आहे. नाटकाचं नाव ‘मोगरा’ असलं तरी ते सकारात्मकतेचं, नव्या ऊर्जास्रोताचं प्रतीक म्हणून बहुधा ठेवलं गेलं असावं. अन्यथा मोगऱ्याचा संदर्भ यातल्या प्रत्येकीच्याच आयुष्याशी जुळतोच असं नाही. वरकरणी तो जुळवून दाखवलेला असला, तरीही! असो.
तर या पंचकन्यांपैकी पहिली स्वानंदी ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एका समाजसुधारकाची वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी लग्न झालेली पत्नी. अल्पवयात लग्न झाल्यानं शिक्षण न झालेलं. तथापि त्या काळात ज्या प्रकारचं वातावरण होतं त्याच्याशी समरस होण्याचा प्रयत्न करत ती सासरघरी मोठी होते. सासरघरातल्या वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या माणसांशी जुळवून घेत रुळत असतानाच तिचे यजमान तिला घरच्यांच्या परोक्ष अनौपचारिक शिक्षणाचे धडे देतात. त्यातून ती हळूहळू प्रगल्भ होत जाते. संस्कारांनी, विचारांनी आणि शिक्षणानंही. आपल्यातील या बदलांची तिची तिलाच हळूहळू जाणीव होत जाते. सगळं काही मनासारखं चाललेलं असतानाच अकस्मात अतिश्रमांमुळे तिच्या पतीचं अकाली निधन होतं आणि तिच्यावर आभाळच कोसळतं. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे केशवपनाचा दुर्धर प्रसंग तिच्यावर ओढवतो. परंतु ती त्यास साफ नकार देते. आपल्या पतीला आपले घनगर्द केस फार आवडत असत, आणि त्यांच्या सुधारणावादी विचारांत असल्या अनिष्ट रूढींना कसलंही स्थान नव्हतं, त्यांना आपलं हे केशवपन करणं कधीच पसंत पडलं नसतं याची तिला जाणीव असते. त्यामुळे ती खंबीरपणे घरच्या, दारच्या आप्तेष्टांचं प्रचंड दडपण झुगारून त्यास प्राणपणानं विरोध करते आणि आपल्या मुलांना घेऊन घर सोडते. पतीचं समाजसुधारणेचं कार्य पुढे चालवायचा निश्चय करते..
कळीचं पूर्णाशाने उमललेलं फूल होण्याचा.. विचारांनी प्रगल्भ होण्याचा स्वानंदीचा हा प्रवास अत्यंत प्रत्ययकारी आहे.
पूजा.. वयात येताना लैंगिकतेची समाजप्रचलिततेपेक्षा वेगळी जाणीव घेऊन जन्माला आलेली ही तरुणी. मुलांमध्ये सहजगत्या, मोकळेपणाने वागताना.. वावरताना कसलीही वेगळी भावना न अनुभवणारी.. पुरुषांच्या स्पर्शानं ‘तसल्या’ भावनांचे तरंग मनात न उमटणारी ही मुलगी. पण बरोबरीच्या मैत्रिणींच्या स्पर्शातून मात्र तिच्या तन-मनात वेगळंच आवाहन जागं होतं. साहजिकपणेच मैत्रिणींमध्ये तिच्या या वेगळ्या भावनिक प्रतिसादाची अनिष्ट प्रतिक्रिया उमटत असे. त्या पूजापासून दूर जात. नृत्यांगना असलेली, नृत्याचे क्लास घेणारी पूजा तिच्या स्त्रीशिष्यांच्या नृत्याच्या वेळच्या अभावित स्पर्शानी मोहरत असे. आपल्याला हे असं का होतंय याबद्दल विचार करताना तिला जाणवत असे, की आपण इतर मुलींपेक्षा ‘या’बाबतीत वेगळ्या आहोत. आपली मागणी वेगळी आहे. परंतु यात काही वावगं आहे असं मात्र तिला बिलकूल वाटत नसे. नताशा.. तिचीच एक शिष्या. तिच्याबद्दलही पूजाला असंच आकर्षण वाटत असे. नताशालाही पूजा आवडे. दोघीही एकमेकींकडे आकृष्ट होत होत्या. आपली ही वेगळी पसंती पूजा घरच्यांना सांगते आणि एकच हलकल्लोळ माजतो. तिला घालूनपाडून बोललं जातं. ‘घराण्याला कलंक’ असल्याचा ठपका तिच्यावर ठेवला जातो. तिला घराबाहेर काढलं जातं. पण नताशाचे आई-वडील मात्र त्यांचं हे परस्पराकर्षण समजून घेतात. त्यांच्या लग्नाला मान्यता देतात. दोघींचं सहजीवन सुरू होतं. पुढे एक मुलगी दत्तक घेऊन आपलं ‘कुटुंब’ पूर्ण करण्याचा निर्णय पूजा-नताशा घेतात.
पूजाला हे कळतच नाही, की एखाद्याची भावनिक-लैंगिक गरज समाजमान्य रूढींपेक्षा वेगळी असेल तर त्याचा इतका बाऊ करण्याचं मुळात कारणच काय? त्यामुळे समाजव्यवस्था कशी काय ढासळू शकते? आजच्या जगातील या ‘समस्ये’चं उत्तर काय? आपल्या नैसर्गिक ऊर्मी दडपून भिन्नलिंगी व्यक्तीशी लग्न करणं? परंतु उलट, त्यामुळे आणखीनच भयानक समस्या निर्माण होतील. अशा लग्नसंबंधांतून कुणीच सुखी होणार नाही. दोघांचीही आयुष्यं उद्ध्वस्त होतील. हे समाजाला हवं आहे का? आपण एक समाज म्हणून याबाबतीत कधी प्रगल्भ होणार?
तिसरी : रिया. स्त्री-पुरुष मैत्रीतील तिच्या मोकळेपणाचा गैरफायदा घेत तिच्या एका मित्रानंच तिच्यावर बलात्कार केलेला. त्यातून ती आणखीनच बंडखोर बनते. या आघाती घटनेनं ती जरी पुरुषद्वेष्टी झाली नसली तरी त्यांच्या प्रत्येक बारीकसारीक वर्तनाबद्दल सतर्क होते. लग्नाला तिचा विरोध नाहीए, परंतु आपला जोडीदार होऊ इच्छिणारा पुरुष खरोखरीच मनानं स्वच्छ, नितळ, पारदर्शी असायला हवा, ही तिची अट असते. तिचा बॉस असलेला तरुण तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतो. ती त्याला आपला पूर्वेतिहास स्वच्छपणे कथन करते. त्याने तो हादरतो. तिच्याशी संपर्क तोडतो. परंतु काही दिवसांनी तो पुन्हा तिला फोन करून तिच्या आयुष्यात घडलेली ती घटना अपघात असल्याचं समजून ती विसरण्याची इच्छा दर्शवतो. त्याचे आई-वडील तिच्या घरी येऊन तिला रीतसर मागणी घालतात. लग्न ठरतं. परंतु दरम्यान अशा एक-दोन घटना घडतात, की तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतात. तिच्यावर झालेल्या बलात्काराची गोष्ट तो निकटवर्तीयांना सांगत सुटतो. त्यातून आपण किती महान आहोत, रियाशी लग्न करून तिच्यावर कसे उपकार करत आहोत, हेच तो ठसवायचा प्रयत्न करत असल्याचं तिच्या लक्षात येतं आणि ती ऐन लग्नादिवशीच त्याला भेटून, त्याला त्याच्या तिरस्करणीय वृत्तीबद्दल भलंबुरं सुनावून ती त्याच्याशी ठरलेलं लग्न स्वत:च मोडते. अर्थात आकाशच्या रूपात तिला सर्वार्थानं समजून घेणारा जोडीदार तिला पुढे मिळतो, ही गोष्ट अलाहिदा.
राधिकाचा संसार ही कुणाही तरुणीची स्वप्नकथाच जणू. उच्च अभिरुचीचा, सर्वार्थानं सहजीवन जगू पाहणारा, तिला सुखात ठेवण्यासाठी सतत धडपडणारा जोडीदार तिला मिळालेला. उत्तम कॉर्पोरेट कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी, आलिशान जीवनशैली, वर रोमॅंटिक वृत्तीचा, तिचं मन जपणारा, तिच्यासाठी महागडय़ा गिफ्ट्स आणणारा, मित्रमंडळींसाठी सतत घरी पाटर्य़ा करणारा, व्हेकेशनला तिला जगभर हिंडवणारा.. दोघा राजा-राणीचा दृष्ट लागावी असा संसार.
मात्र, काही वर्षांनंतर तिला या सगळ्याचा कंटाळा येऊ लागतो. घरचेही ‘आता बस करा प्लॅनिंग!’ असं थेटच म्हणू लागलेले असतात. मित्रमैत्रिणींचे फुललेले संसारही राधिकाला आपल्या संसारातील कमतरतेची जाणीव करू लागलेले असतात. तिलाही आता आपल्या घरात लहानग्याची दुडदुडणारी पावलं हवीहवीशी वाटू लागलेली असतात. ती तसं त्याला बोलूनही दाखवते. त्याचीही हरकत नसते. पण काही केल्या तिची कूस फळत नाही म्हणताना ती गायनॅकॉलॉजिस्टकडून आपल्या सगळ्या तपासण्या करून घेते. तिने त्यालाही सोबत चलायचा आग्रह केलेला; परंतु ऑफिसमधल्या व्यग्रतेचं कारण सांगून तो येण्यास असमर्थता व्यक्त करतो. तीही समजून घेते. परंतु आपल्या चाचण्यांमध्ये काहीच अनुचित न आढळल्याने ती त्यालाही मग चाचण्या करण्याबद्दल सांगते मात्र- तो खवळूनच उठतो. आजवरचा त्याचा सुसंस्कृततेचा, सभ्यतेचा बुरखा ठार गळून पडतो. ती आपल्या पुरुषत्वाविषयीच शंका घेतेय असं त्याला वाटतं. तो तिच्यावर कधी नव्हे तो हात उगारतोच, तिच्यावर पाशवी बलात्कारही करतो. तिला चढलेली आपल्या सुखी संसाराची भूल क्षणार्धात उतरते. ती घर सोडते. माहेरी न जाता मैत्रिणीच्या घरी काही काळ राहते. दरम्यान, त्याला त्याची चूक कळेल अशी तिला आशा वाटत असते. पण तसं काहीच होत नाही. तो साधी तिची विचारपूसदेखील करत नाही. ती समजायचं ते समजते आणि आपला स्वतंत्र मार्ग स्वीकारते..
सरस्वती.. साताऱ्याकडच्या एका गावातली मुलगी. वडील तालेवार. घरची परिस्थिती चांगली. तिचं अकरावीपर्यंतचं शिक्षण बिनदिक्कत झालेलं. सरस्वती हुशार होती. अकरावीला ६२ टक्के मार्क्स मिळाल्यानं गावात तिचं कोडकौतुक होतं. पुढे तिला कॉलेजात जाऊन शिकायचं असतं. मोठं व्हायचं असतं. पण वडील सरळ तिचं लग्न ठरवतात आणि जबरदस्तीनं करून मोकळेही होतात. तिची स्वप्नं अधुरीच राहतात. नवरा बॅंकेत नोकरीला. जुनाट विचारांचा. ती पुढं शिकायची इच्छा व्यक्त करते तेव्हा तो तिची खिल्लीच उडवतो. मग ती गप्पच बसते. रांधा-वाढा-उष्टी काढा, पोरांचा जन्म, पुढे त्यांचं संगोपन वगैरेंत ती गुंतते. सगळ्या जबाबदाऱ्या निगुतीनं पार पाडते. परंतु तिचं मन त्या संसारात उरलेलं नसतं. मुलं शिक्षण, लग्न वगैरे होऊन परदेशी जातात. ती हट्टानंच मुलीलाही शिक्षणासाठी परदेशी पाठवते. जे आपल्याला मिळालं नाही ते सगळं मुलीला मिळावं म्हणून धडपडते. त्यात तिला यशही मिळतं.
पुढे नवरा गेल्यावर कॉलेज शिकायचं आजपर्यंत दडपून टाकलेलं आपलं स्वप्न पूर्ण करायचं ती ठरवते.. आणि सगळ्या अडचणींवर मात करत ग्रॅज्युएट होते..
अशा या पाच जणी. प्रत्येकीच्या आत्मभानाच्या, साक्षात्काराच्या कथा वेगळ्या असल्या तरी त्यात एक सूत्र नक्की आहे : ‘स्व’चा शोध आणि त्याची परिपूर्ती! लेखक तेजस रानडे यांनी ही वेगवेगळ्या वृत्तीच्या स्त्रियांच्या आत्मशोधाची कहाणी त्यांच्या त्यांच्या कथनशैलीत संहितेत आकारली आहे. त्यांचा स्वतंत्र होण्याचा प्रवास जरी एकाच दिशेनं असला तरी प्रत्येक स्त्रीची पार्श्वभूमी वेगळी आहे. प्राक्तनाला भिडण्याची वृत्ती भिन्न आहे. त्यामुळेच हा कहाण्यांचा एकत्रित गुच्छ प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. या सर्वाचा प्रवास त्यांचा त्यांना करू देण्याचं स्वातंत्र्य लेखकानं त्यांना दिलं आहे. म्हणूनच साऱ्या जणी मूर्त रूपात वेगवेगळ्या भासल्या तरी त्यांचं एकमेकींशी नातं आहे. आणि ते प्रस्थापित करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
दिग्दर्शक हृषीकेश जोशी यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते प्रत्यक्ष कलाकार तालमींना हजर नसताना त्यांच्या त्यांच्या घरी त्यांच्याकडून तालमी करवून घेण्याचं! ते त्यांनी कसं काय पेललं, हे त्यांचं तेच जाणोत. परंतु प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत करण्यात ते यशस्वी झाले आहेत. पात्रांचे विविध कंगोरे त्यांनी बारकाईनं तासून प्रकटवले आहेत. थिएटरमधलं रंगावकाश उपलब्ध नसताना कलावंतांना त्यांच्याच घरात त्यांचं वेगवेगळं रंगावकाश (सूचक नेपथ्यासह) आखून देणं आणि त्या सीमित अवकाशात त्यांच्या हालचाली, भावभावनांची आंदोलनं अधोरेखित करणं हे तसं अशक्यकोटीतलंच होतं. परंतु उपलब्ध जागेची डिजिटल पाहणी करून, कॅमेऱ्याचे अॅंगल्स निश्चित करून त्यांनी नाटक सफाईनं बसवलं आहे. अजित परब यांनी पात्रानुरूप काळाचं सूचन करणारं, त्यांच्या भावभावना गहिरं करणारं पार्श्वसंगीत दिलं आहे. अर्थात यात अद्ययावत तंत्रज्ञांच्या टीमचं योगदानही अत्यंत मोलाचं आहे. कारण दर प्रयोगाला नवनव्या अडचणी उद्भवत असणार आणि त्यांची त्या, त्या वेळी उत्तरं शोधून पूर्ण लांबीचं (अगदी मध्यांतरासह) हे नाटक सादर करणं हे रोज नवं धाडस करण्यासारखंच आहे. त्याबद्दल सगळ्या टीमला हॅट्स ऑफ!! (या ‘तंत्रज्ञानी’ साहसाबद्दल पुढे कधीतरी!) या नाटकात बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून कलाकारांच्या घरच्यांनाच भूमिका निभावावी लागते. त्यांचाही ‘मोगरा’च्या यशात वाटा आहे.
यातले सर्व कलाकार कसलेले आहेत. त्यांच्या धाडसाचंही कौतुक.
गौरी देशपांडे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील परकरी पोर स्वानंदी ते प्रगल्भ विचारांची स्त्री ही स्थित्यंतरं, तिचं मनस्वी जगणं, तिच्या वागण्या-वावरण्यापासून ते वृत्तीबदलापर्यंत सगळी रूपं उत्कटतेनं साकारली आहेत. स्वानंदीचे भावनिक-मानसिक हिंदोळे तिच्या चेहऱ्यावर सहजी प्रकटतात. तसंच तिचा निर्धारही!
पूजाचं समाजमान्य स्त्री-पुरुष अस्तित्वापेक्षा आपलं वेगळं असणं आणि त्याबद्दल कोणतीही खंत वा अपराधभाव नसणं, हे भार्गवी चिरमुले यांनी पूजाच्या आत्मनिवेदनातून पारदर्शी नैसर्गिकतेनं दाखवलं आहे. इतरांच्या दृष्टीत असलेलं आपलं वेगळेपण तिला अनैसर्गिक वाटतच नाही मुळी. आणि ते ती सर्वाना पटवून द्यायचा प्रयत्न करते. काही अंशी यात ती सफलही होते. तिचं नताशासोबतचं सहजीवन येणाऱ्या प्रगल्भ काळाचं अपत्य असेल.
मित्राकडूनच बलात्कार झालेली रिया आपला स्वाभिमान कायम राखून आयुष्य जगू इच्छिते. त्यासाठी ती ढोंगी बॉसचं पितळ उघडं पाडायलाही मागेपुढे पाहत नाही. रियाचं बिनधास्त व्यक्तिमत्त्व मयूरा रानडे यांनी आवश्यक त्या तडफेनं उभं केलं आहे. रियाची देहबोली तिच्यात आत्माभिमान शिगोशीग असल्याचंच दर्शविते. त्यामुळे आपली बंडखोर वृत्ती ठसवायला त्यांना वेगळे सायास करावे लागलेले नाहीत.
स्पृहा जोशी यांनी अखंड सुख तनमनात मुरलेल्या, त्याचं अप्रूप पुरेपूर जाणणाऱ्या, खुल्या विचारांच्या राधिकाचं व्यक्तिमत्त्व प्रत्ययकारकतेनं व्यक्त केलं आहे. सुख झेलणं आणि ते बोचणं म्हणजे नक्की काय होणं, ते का टोचतं, काठोकाठ सुखानं भरलेला प्यालाही एखाद्या कमतरतेनं मन कसं पोखरत राहतो.. या साऱ्या अंतस्थ कल्लोळांचं भावदर्शन त्यांनी संवादोच्चारणातून, देहबोलीतून, विरामाच्या जागांतून नीटस पोहोचवलं आहे.
वंदना गुप्ते यांच्या मूळ बिनधास्त वृत्तीला प्रारंभी काहीशी मुरड घालणारी सरस्वतीची भूमिका असली तरी उत्तरार्धात त्यांच्या मिश्किल स्वभावाला, बिनधास्तपणाला फुल्टू वाव मिळाला आहे आणि त्यांनी त्यात धम्मालच बॅटिंग केली आहे. शिक्षणाची तीव्र आस सरस्वतीला प्रकाशाकडे कशी घेऊन जाते याचं खुमासदार दर्शन त्या घडवतात. गावाकडची बोली आणि त्यातली खुमारी त्या एन्कॅश करतात.
एकुणात.. करोनाकाळातला हा अनोखा नाटय़‘प्रयोग’ नक्की अनुभवावा असाच आहे. त्यातून भविष्यकाळात मराठी नाटय़सृष्टीला नवे धुमारे फुटतील यात काही संशय नाही.