मानसी जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजाच्या पारंपरिक रूढी, विचारसरणीला झुगारून प्रणित हाटे या तरुणाचा गंगा बनण्यापर्यंतचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. उत्कृष्ट अभिनय आणि त्याला साजेसे नृत्यकौशल्य या गुणांच्या जोरावर आपले अस्तित्व सिद्ध करणाऱ्या आणि मराठीत छोटय़ा पडद्यावर पहिली तृतीयपंथी अभिनेत्री म्हणून ओळख मिळवलेल्या गंगाच्या जीवनप्रवासाचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने घेतलेला वेध..

‘युवा डान्सिंग क्वीन’ आणि ‘कारभारी लय भारी’ या मालिकेतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी प्रणित हाटे ऊर्फ गंगा ही तृतीयपंथी अभिनेत्री. तिच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली. प्रणित ते गंगा बनण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासात तिला अनेक टक्केटोणपे सहन करावे लागले. तिच्या या प्रवासाविषयी ती मनमोकळेपणाने बोलते. लोकांना आयुष्यात पैसा, शिक्षण तसेच इतर आव्हानांचा सामना करावा लागतो, मात्र मला कळायला लागल्यापासून बाहेरच्यांपेक्षा माझ्या मनातील भावनांच्या कल्लोळाशी लढावे लागले, अस्तित्वाची लढाई पहिली जिंकावी लागली. आतलं जग जिंकल्यानंतर लोकांच्या मानसिकतेशीही झगडावे लागले. मी माझे अस्तित्व स्वीकारल्यावर बाहेरचा लढा अधिक सुकर  झाला, असं गंगा सांगते.

गंगाला लहानपणीच तिच्यातील स्त्रीत्वाची जाणीव झाली होती. मला कायम सुंदर मुलींप्रमाणे राहावेसे वाटत असे. लहानपणी क्रिकेट, भोवरा, लगोरी असे खेळ खेळण्याऐवजी मुलींबरोबर भातुकली खेळायला आवडायचे. वेळ मिळाला की आईची नजर चुकवून तिच्या साडय़ा नेसून आरशासमोर तासन्तान मी स्वत:ला निरखत बसत असे. लग्नसमारंभात हातावर मेहंदी काढायचे. यामुळे अनेक वेळा मी लोकांच्या चेष्टेचा विषयही बनले. एक मुलगा मुलींप्रमाणे राहतो हे पचवणे पारंपरिक विचारसरणीच्या माझ्या आई-वडिलांना कठीण गेले. मी मुलीसारखे राहायला लागल्यावर त्यांनी अनेकवेळा मला मारले. आपल्या मनावर वर्षांनुवर्षे चालत आलेल्या सामाजिक रूढी-परंपरेचा घट्ट पगडा बसलेला असतो. माझ्या कुटुंबालाही मला स्वीकारणे अवघड गेले, असे ती सांगते. लहानपणीचा काळ हा तिच्यासाठी खूप अवघड होता. ‘एखादी मुलगी चार मुलांमध्ये खेळत असल्यास तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, मात्र एखादा मुलगा मुलींमध्ये असल्यास त्याला बायल्या, हिजडय़ा या उपाध्या लावल्या जातात. लहानपणी मित्रांनी, नातेवाईकांनी मला अशाच उपाध्या लावल्या होत्या. माझी देहबोली, वागणे, हावभाव, बोलणे हे मुलांपेक्षा वेगळे असल्याने अनेकांचे टक्केटोणपे सहन करतच मी लहानाची मोठी झाले,’ अशी आठवण तिने सांगितली.

२०१५ मध्ये ‘कलर पॉझिटिव्ह’ या नाटकातील साकारलेली ‘गंगा’ ही तृतीयपंथीयाची भूमिका माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली, असे ती सांगते.  ही भूमिका केल्यावर माझा आत्मविश्वास दुणावला. त्या गंगाचे रूप मी माझ्यात पाहात होते. माझ्या आणि गंगाच्या गोष्टीत एक समान धागा, दु:खाची किनार होती. त्यानंतर मी ‘वजूद’ हा लघुपट केला होता. त्यामुळे मी तृतीयपंथी आहे हे स्वीकारणे सहज सोपे गेले. या आधीचे जगणे संघर्षमय होते. पुरुषासारखे दिसण्यासाठी मी त्याप्रमाणे चालणे तसेच आवाज बदलणे हे प्रयोगही करून पाहिल्याचेही तिने सांगितले.

प्रणित म्हणूनच सुरू झालेला रुपेरी पडद्यावरचा प्रवास हाही म्हणूनच संघर्षमय ठरला, असे तिने सांगितले. ‘मला लहाणपणापासून नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. मी आधीपासून चित्रपट तसेच मालिकांमध्ये पुरुषांच्या भूमिकेसाठी ऑडिशन्स द्यायचे, मात्र माझी देहबोली, शरीराची ठेवण आणि वागणे स्त्रीसारखे असल्याने अनेक वेळा मला नकार पचवावे लागले. माझा अभिनय त्याप्रमाणे नसल्याने भूमिकेसाठी मला डावलले गेले. अशा वेळेस अनेकदा रडू यायचे. निराशा पदरात पडायची, मात्र मी जिद्द सोडली नाही. गंगा म्हणून स्वत:ला स्वीकारल्यानंतरच रुपेरी पडद्यावरच्या या संघर्षांची धारही थोडी कमी झाली,’ असे गंगा म्हणते. ‘युवा डान्सिंग क्वीन’नंतर टाळेबंदीमुळे सहा-सात महिने घरीच होते. नंतर मला ‘कारभारी लय भारी’ मालिकेसाठी विचारणा झाली. ‘युवा डान्सिंग क्वीन’ आणि ‘कारभारी लय भारी’ या मालिकेत काम करतानाही मला इतरांसारखीच वागणूक मिळाली. ‘युवा डान्सिंग क्वीन’ कार्यक्रमात तर एका महिलेने तुझ्याकडे पाहून तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याची प्रतिक्रिया दिली. या अशा घटनांनी माझ्यातील आत्मविश्वास अधिक दुणावला, असे ती सांगते. ‘कारभारी लय भारी’मध्ये काम करताना कार्यक्रम आणि मालिकेतील फरक पहिल्यांदा समजल्याचे तिने स्पष्ट केले. मालिके त काम करण्याची पद्धत समजली. मराठी मालिके त तृतीयपंथी अभिनेत्री म्हणून काम करणारी मी एकमेव आहे याचा अभिमान वाटत असल्याचे गंगा सांगते. ‘हिंदीत जेवढे तृतीयपंथीयांबद्दल उघडपणाने बोलले जाते. तेवढे प्रादेशिक मनोरंजन क्षेत्रात बोलणे गरजेचे आहे. माझे आयुष्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा आहे,’ असे सांगणाऱ्या गंगाला आता चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याची ओढ लागली आहे.

स्त्रीत्व जपणाऱ्या प्रत्येकाचा गौरव

लोक सण-समारंभांना तसेच इतर कार्यक्रमांत तृतीयपंथीयांना बोलावतात, मात्र त्यांना स्वीकारणे लोकांसाठी जड जाते. इतर वेळेस कोणी येऊन तृतीयपंथीयांची साधी चौकशीही करत नाहीत. महिला दिन म्हणजे फक्त महिलांचा नव्हे तर स्त्रीत्व जपणाऱ्या प्रत्येकाचा दिवस आहे असे मला वाटते. या महिला दिनाच्या निमित्ताने समाजाने तृतीयपंथीयांनाही सन्मानाने वागवावे. त्यांना माणसाप्रमाणे वागणूक मिळावी, अशी माझी इच्छा आहे. तृतीयपंथीयांना भिक्षा मागणे अथवा नाचकाम करणे याशिवाय दुसरा उत्पन्नाचा काही मार्ग नाही. समाजाने त्यांना एक संधी देणे आवश्यक आहे.

तृतीयपंथीयाकडूनच हल्ला

नुकताच गंगावर हल्ला झाला. या हल्ल्यामुळे पहिल्यांदा घाबरलेल्या- गोंधळलेल्या गंगाने स्वत:ला सावरले. आपल्यावर झालेला अन्याय तिने एका व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला. पोलिसांनी त्याची दखल घेऊन आरोपीलाही पकडले. याविषयी बोलताना, मी मित्राला बस स्थानकावर सोडायला आले होते. त्याला सोडून आल्यावर घरी जात असताना एक तृतीयपंथीयाने माझ्यावर हल्ला केला. त्याने दारू पिऊन अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुझे गुरू कोण, तू कुठला, काय काम करतो? असे प्रश्न विचारले. मी तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. माझे गुरू कोणी नाही हे सांगितल्यावर त्याने माझे केस धरून मारायला सुरुवात केली. माझ्यावर एवढा अत्याचार होत असताना समोरच्या माणसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. एकानेही पुढे येऊन माझी मदत केली नाही. मी व्हिडीओ केल्यावर पोलिसांना ही घटना समजली. आणि त्यांनी मग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी त्या तृतीयपंथीयाला पकडले असून ती आता ठाण्याच्या कारागृहात शिक्षा भोगते आहे, असे तिने सांगितले.