मानसी जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दिल दोस्ती दोबारा’ मालिकांतून लोकप्रिय झालेली स्वानंदी टिकेकर आता  ‘अस्सं माहेर नको गं बाई, मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  यात तिच्यासोबत दिल दोस्तीमधील आशू म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्ताने दिल दोस्तीनंतर पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांना वेगळ्या स्वरूपात दिसेल. यात स्वानंदी टिकेकर सखीची भूमिका साकारत आहे. या मालिकेबद्दल स्वानंदी सांगते की, ‘आतापर्यंत छोटय़ा पडद्यावर सासुरवास या संकल्पनेला धरून अनेक मालिका आल्या आहेत. ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांना अनेक वर्षांनंतर माहेरवास पाहण्यास मिळेल. सखी आणि कुणाल या जोडप्याला कामानिमित्त सखीच्या माहेरी राहावे लागते. माहेरी सगळं आपल्या मनासारखं होईल अशा विचारात असणाऱ्या सखीचा प्रत्यक्षात मात्र भ्रमनिरास होतो. यात आईचे असणारे जावयावरील प्रेमामुळे तिला आपल्याच घरी वेगळे वाटते. सहसा मुलींना सासुरवासाची भीती वाटते पण सखीला मात्र माहेरवास नकोसा झाला आहे. हाच माहेरवास मालिकेत हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला आहे, असेही तिने सांगितले.

या मालिकेत ती आणि पुष्कराजसोबतच सुप्रिया पाठारे आणि राजन भिसे हे कलाकारही आहेत. त्या दोघांच्या अभिनयातील सहजता स्वानंदीला जास्त भावते. एखादा सीन ते अत्यंत सहजतेने साकारतात. सुप्रियाताई सुगरण आहे तर राजन काका पट्टीचे खवय्ये आहेत. सुप्रियाताई रोज नवनवीन पदार्थ बनवून आणतात. त्यामुळे सेटवर आमची सुप्रियाताईंनी बनवलेला पदार्थ खाण्यात चढाओढ लागते.

*  संगीतसाधना सुरूच ठेवणार 

सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या  गायनाच्या कार्यक्रमाचे स्वानंदीने विजेतेपद पटकावले. घरातच गाण्याचे संस्कार मिळणाऱ्या स्वानंदीचा स्पर्धक ते विजेता हा प्रवास रोमांचकारी आहे. घरातच गाणे असले तरीही मी गाण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नसल्याचे ती सांगते. माझे आजी-आजोबा आणि आई आरती गायक असल्याने रोज माझ्या कानावर गाण्याचे बोल पडतात. या कार्यक्रमामुळे माझ्यातील गायन कौशल्याची नव्याने ओळख झाल्याचे स्वानंदी नमूद  करते. या कार्यक्रमाच्या प्रवासात काही गाण्यांचे सादरीकरण चांगले तर काही वाईट झाले. तरी नाउमेद न होता मी माझे प्रयत्न सुरू ठेवले. या वेळेस आईवडिलांनी जे करशील ते मनापासून कर एवढाच सल्ला दिला.  चित्रीकरणातून वेळ काढत मी माझी संगीतसाधना सुरू ठेवणार असल्याचे ती सांगते.

* वडिलांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका आवडतात

वडिलांनी चित्रपट तसेच मालिकांमधून साकारलेल्या नकारात्मक अथवा ग्रे शेड असलेल्या भूमिका जास्त आवडत असल्याचे स्वानंदीने सांगितले. लहानपणी वडिलांना नकारात्मक भूमिकेत पाहून राग यायचा. मात्र एक कलाकार म्हणून त्याच आता जास्त आव्हानात्मक वाटतात. उदय टिकेकर यांची दूरदर्शनवरील ‘आव्हान’ या मालिकेतील नकारात्मक भूमिका सर्वात जास्त आवडत असल्याचे ती आवर्जून नमूद करते. या टाळेबंदीच्या कालावधीत घरी असताना ही मालिका संपूर्ण पाहिली. त्यांच्या ‘रॉकी हँडसम’, ‘मदारी’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’या स्वानंदीच्या आवडत्या भूमिका आहेत.

* घरात संगीतमय वातावरण

स्वानंदीची आई आरती अंकलीकर टिकेकर या उत्कृष्ट शास्त्रीय गायिका आहेत. त्याविषयी स्वानंदी भरभरून बोलते. घरात माझी सकाळ आईच्या रियाजाने होते. माझ्या आईने गायलेला प्रत्येक राग, गाणे मला आवडते. त्यातही ‘पुरेधनाश्री’ आणि ‘नंद’ हे दोन राग ऐकताना कान थकत नाहीत. मीराबाईंचा ‘म्हारे घर आवोजी’ नावाचा अभंग, ‘बोलावा विठ्ठल’ हे विशेष आवडते आहेत.