रवींद्र पाथरे

यवतमाळच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण आयोजकांनी मागे घेतल्यावर एकच गदारोळ उडाला. वादविवादांचं आवर्त उठलं. अशा वादळी वातावरणात आता संमेलनाचं उद्घाटन कुणाच्या हस्ते करायचं, असा प्रश्न निर्माण झाला. यातून मार्ग काढायचा कसा? शेवटी आयोजकांना कुणीतरी शहाणिवेचा सल्ला दिला, की एखाद्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करा! आणि वैशाली येडे या विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. यानिमित्तानं एक सकारात्मक संदेश समाजात गेला. वैशाली येडे ही नवऱ्यामाघारी स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी राहिलेली सबला! वर्ध्याच्या अ‍ॅग्रो थिएटर निर्मित ‘तेरवं’ या जनजागृती करणाऱ्या दीर्घाकात त्या कलावंत आहेत. शाम पेठकरलिखित आणि हरीश इथापे दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग नागपूरच्या नाटय़संमेलनात पाहण्याची संधी नुकतीच मिळाली.

विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न सरकारने कित्येक हजार कोटींची पॅकेजेस देऊनही अद्यापि सुटलेला नाही. हे शेतकरी आत्महत्या का करतात, या प्रश्नाचं ठोस उत्तर अजून मिळालेलं नाही. सरकार कुणाचंही येवो; शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. या समस्येच्या गाभ्यापर्यंत पोहोचायला कुणाला सवड नाही. तशी निकडही कुणाला वाटत नाही. ना सरकारला, ना समाजाला. आपल्यासारखी शहरी माणसं शेतकरी आत्महत्यांकडे सहानुभूतीनं पाहण्याची संवेदनाही हरवून बसलीयत. या पार्श्वभूमीवर ‘तेरवं’ पाहिलं. एक भळभळती जखमच जणू समोर साकार झाल्याचं दु:ख अन् वेदना झाल्या. म्हटलं तर हे एक प्रचार-नाटय़. परंतु यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांचं जगणं ज्या उत्कटतेनं मांडलं गेलं आहे, ते पाहून कुणीही संवेदनशील व्यक्ती हेलावून गेल्याविना राहणार नाही.

संपूर्ण स्त्री-कलाकारांच्या संचातलं हे नाटक. जुन्या काळच्या ओव्यांच्या पाश्र्वसंगीताच्या लय-तालात आपल्यासमोर पेश होतं. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांच्या वाटय़ाला जे दु:खभोग येतात, त्याची ही नाटय़रूप विराणी! नवऱ्यापश्चात या विधवा स्त्रियांची होणारी ससेहोलपट चितारणारं! घरातली गरिबी. शिक्षणही तोकडं. रूढी-परंपरावादी समाजात वाढल्या असल्यानं बाहेरच्या जगात वावरायचं कसं हेही माहीत नसलेल्या या स्त्रिया. दुर्दैवाच्या फेऱ्यानं अकस्मात उघडय़ा आभाळाखाली फेकल्या गेलेल्या. पुढचं सारं आयुष्य अंध:कारमय. पदरी मुलं. नवरा गेल्यानं सासरघर शत्रू झालेलं. खायला काळ न् भुईला भार असलेली पांढऱ्या कपाळाची ही स्त्री सर्वानाच नकोशी झालेली. अशा परिस्थितीत तिनं जगायचं कसं? पैसे कमावण्यासाठी लागणारं कसलं कौशल्य अंगी नाही. कुणाच्या तरी शेतात राबून कसाबसा भाकरतुकडा मिळवणं, एवढंच फार तर ती करू जाणे.

शिवाय नवऱ्याविना स्त्री म्हणजे धन्याविना गाय.. अशी पुरुषी समजूत. त्यामुळे साम-दाम-दंड-भेद यापैकी जमेल ती क्लृप्ती वापरून तिला वश करायला सगळेच टपलेले. मागासलेल्या, बुरसटलेल्या भोवतालात स्वत्व टिकवून जगणं या स्त्रीसाठी दुष्करच. तिच्या या जीवघेण्या वेणा ‘तेरवं’मध्ये मुखर झाल्या आहेत. या विधवा वाटय़ाला आलेले दु:खभोग पचवत, प्राप्त परिस्थितीशी झगडत, प्रसंगी तिच्याशी दोन हात करत, कधी तिच्यासमोर नांगी टाकत कसंबसं जगत असतात. या त्यांच्या जगण्याचं हे कोलाज आहे. त्या जगण्यातले व्याप-ताप, त्यांना तोंड देताना या स्त्रियांची होणारी दमछाक, कुचंबणा, कोंडी.. त्यातूनच उसळून येणारी त्यांची विजिगीषु वृत्ती.. याचं एक सम्यक चित्र ‘तेरवं’त रंगवलं गेलं आहे. या स्त्रियांच्या जगण्यातले तपशील, त्यातले ताण.. त्यातून जात स्वत:ला आणि आपल्या पोराबाळांना सावरून आयुष्य जगण्यासाठीची त्यांची तडफड, त्यात कधी येणारं अपयश, तर कधी या वादळातून पार झाल्यावर येणारी सार्थकता.. मिळणारं नितळ समाधान.. ‘तेरवं’ हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांचं विलक्षण स्वगत आहे. प्रत्येकीच्या वाटय़ाला आलेलं दु:ख जरी एकच असलं तरी त्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. यात गुंतलेली माणसं रक्ताच्या नात्यातली असली, शेजारातली असली तरी प्रसंगवशात त्यांनी धारण केलेली रूप वेगळीच असतात. अपरिचित असतात. आकस्मिकपणे बदललेल्या या वास्तवाला कसं सामोरं जायचं, हे त्या स्त्रीला उमगत नाही. बरं, तिला सावरायला कुणी पुढं आलं तरी त्या व्यक्तीच्या हेतूबद्दल संशय घेतला जाण्याची शक्यता अधिक. आणि विश्वास तरी कुणावर ठेवणार? ज्याच्यावर विश्वास ठेवावा, तो अचानक कधी फणा काढेल सांगता येत नाही. परिस्थितीनं आतडय़ाची माणसंही वैरी झालेली. अशा वेळी त्या स्त्रीनं करावं तरी काय?

दिग्दर्शक हरीश इथापे यांनी शाम पेठकर यांच्या संहितेला दिलेलं प्रयोगरूप अत्यंत प्रवाही आहे. जात्यावरच्या ओव्यांचं पाश्र्वसंगीत सतत नाटकभर सोबत करतं. एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात सहजतेनं जाताना ही लय साथसंगत करत राहते. एक दुखरी विराणी नाटक पाहताना सतत आपल्या मनात गुणगुणत राहते. मात्र, हे नाटक केवळ वेदनेचं गाणं नाहीए, तर ते स्त्रीशक्तीच्या कणखरतेचंही दर्शन घडवतं. समाजप्रबोधनाची अदृश्य किनार त्याला आहे. परंतु प्रचारीपणाच्या पल्याड जात ते माणसाचं अस्सल जगणं आपल्यासमोर मांडतं. मुंबई-पुण्याकडच्या व्यावसायिक नाटकांतली सफाई कदाचित त्यात नसेलही; परंतु एक कोवळेपण, सच्चेपण त्यात निश्चित आहे.. जे आपल्याला खिळवून ठेवतं.

वीरेंद्र लाटनकर (संगीत), चैतन्य आठले-प्रीती मरव (नेपथ्य), सुहास नगराळे-अमर ईमले (प्रकाशयोजना) या सर्वानीच आपापली जबाबदारी चोख पार पाडली आहे. संपूर्ण स्त्री-कलावंतांच्या या नाटकात कविता ढोबळे, वैशाली येडे, मंदा अलोने, माला काळे, प्रतीक्षा गुढधे, सविता जडाय, शिवाणी सरदार, श्वेता क्षीरसागर, उर्वशी डेकाटे, अश्विनी नेहारे, गोरल पोहाणे, संहिता इथापे, अवंती लाटनकर या कलावंतांनी मन:पूत झोकून कामं केली आहेत. आपलं जगणंच आपण मांडतो आहोत ही प्रखर जाणीव त्यातून डोकावते.

रंगकर्मी हरीष इथापे गेली पंधराएक वर्षे वध्र्याजवळील रोठे गावात ‘अ‍ॅग्रो थिएटर’ ही संकल्पना राबवीत आहेत. शेतात बांधलेल्या वास्तूत निवासी नाटय़कार्यशाळा, नाटकाच्या तालमी, रंगप्रयोग ते करीत असतात. ‘तेरवं’ ही इथलीच निर्मिती. या दीर्घाकातील स्त्री-कलावंतांना जगण्याचं साधन म्हणून शेळ्या आणि शिवणयंत्रं घेऊन देऊन तसंच बचत गटाच्या माध्यमातून कर्ज मिळवून देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे त्यांचे प्रयोगही सुरू आहेत.

Story img Loader