रवींद्र पाथरे

रंगकर्मी राम दौंड यांनी दोन वर्षांपूर्वी ‘हे राम!’ हे अप्रतिम नाटक सादर करून जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं होतं. गावातील उत्सवादरम्यान सादर होणाऱ्या रामकथेवरील नाटकाच्या निमित्तानं गावातलं राजकारण, वृद्ध व तरुण पिढीतील अंतराय, स्पृश्यास्पृश्यतेची सुप्त धग, टीव्ही मीडियाचं माणसांच्या जगण्यावर झालेलं अतिक्रमण या साऱ्या भवतालाला कवेत घेणारं ते नाटक होतं. दृक्-श्राव्य-काव्यानुभूती देणारं.  यंदा पुन्हा राम दौंड यांनी ‘तुका म्हणे..’ हे विस्मयचकित करणारं नाटक रंगमंचावर आणलं आहे. किती सखोल जाणिवेचा हा रंगकर्मी आहे, हे यातून प्रत्ययाला येतंच; शिवाय एक उत्कट, संवेदनशील व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख पटते.

Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
women raped in Bopdev Ghat Pune
Bopdev Ghat Crime : “तरुणाला बांधलं आणि त्यानंतर २१ वर्षांच्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार..”, पोलिसांनी सांगितला बोपदेव घाटातला घटनाक्रम
A garba event in Indore has been cancelled in Indore
Garba Cancelled : “हिंदू महिला आणि मुस्लिम पुरुषांमधील संबंध वाढवण्यासाठी गरब्याचं आयोजन”, बजरंग दलाचा आरोप; ३५ वर्षांची परंपरा खंडित!
tanishk vice president arun narayan
‘नैसर्गिकच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांना अनेकांगी मर्यादा’; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांचे प्रतिपादन
PM narendra modi Chandrababu Naidu and Nitish kumar
तिरुपती लाडू भेसळ वाद आणि नितीश कुमारांकडून राम मंदिराचे कौतुक; भाजपाच्या मित्रपक्षांनीही रेटला हिंदुत्वाचा मुद्दा
Loksatta vyaktivedh Street artist Hanif Qureshi passed away
व्यक्तिवेध: हनीफ कुरेशी
After 75 years of independence ST bus started for the first time in Naxal-affected Gardewada
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर नक्षलग्रस्त गर्देवाडात ‘लालपरी’ अवतरली; गावात पहिल्यांदाच…

आपण स्वत:ला कितीही आधुनिक, पुरोगामी वगैरे म्हणवत असलो तरी बाबा, बुवा, बापू नामे कथित आध्यात्मिक मंडळींची वाढती संख्या या दाव्याला सणसणीत टाचणी लावते. नवनव्या वैज्ञानिक शोधांमुळे माणसांचं जीवन अधिकाधिक सुसह्य़, आरामदायी होत असतानाच त्यांच्या जगण्यातलं निवांतपण मात्र हरपलंय. इच्छा असो-नसो, सतत जीवघेण्या स्पर्धेचा बागुलबुवा वागवीत उरीपोटी धावण्याशिवाय माणसाला गत्यंतर उरलेलं नाही. त्यातून उत्पन्न होणाऱ्या ताणतणावांमुळे त्याचं मानसिक, भावनिक न् शारीरिक स्वास्थ्य हरपलंय. अनिश्चितता, अस्थैर्य, नैराश्य, कधीच न संपणारी हाव यांच्या परिणामी त्याने स्वत:ला यंत्र बनवलंय. २४ तास अविरत धडधडणारं यंत्र! आणि याचीच स्वाभाविक परिणती म्हणजे त्यानं गमावलेली मानसिक शांती. तिच्या शोधात मेंदू गहाण टाकून आध्यात्मिकतेचं दुकान मांडून बसलेल्या बाबा-बापूंच्या कच्छपि लागणं मग आलंच. त्यामुळे या भोंदू मंडळींची सध्या चलती आहे. यांपैकी काहींचे मुखवटे या ना त्या कारणामुळे उघडेही पडताहेत. परिणामी काहींना जेलची हवाही खावी लागलीय. परंतु अशा घटनांतून अंधश्रद्धाळू मात्र काहीही बोध घेताना दिसत नाहीत. बुवा-बापूंचे मठ आजही गर्दीनं तुडुंब वाहताहेत. ‘तुका म्हणे..’ हे नाटक या किडलेल्या समाजाच्या स्थिती-गतीचं विलक्षण भेदक दर्शन घडवतं.

भक्तांच्या गळ्यातले ताईत असलेले एक ह. भ. प. अचानक हार्ट अटॅकने जातात. तालुका-जिल्ह्य़ात त्यांचं मोठं प्रस्थ. त्यांच्या भजनी लागलेली भक्त मंडळी शोकाकुल होते. ह. भ. प. माऊंलींवर अंतिम संस्काराची तयारी सुरू असते. परंतु त्यांचा वाया गेलेला मुलगा तुक्या सकाळपासून गायब आहे. व्यसनाधीन तुक्या म्हणजे बापाच्या जीवाला लागलेला घोर. त्याच्या शोधासाठी पाठवलेले दोघं जण रिक्त हस्ते परत येतात. तुक्या गावाबाहेर मित्रांसमवेत दारू पिऊन तर्र्र असतो. वडिलांच्या मृत्यूची खबर द्यायला आलेल्या त्या दोघांना तो अक्षरश: हाकलून देतो. तुक्याला त्यांनी जबरदस्तीनं घरी आणण्याचा प्रयत्न करताच हातातली दारूची बाटली फोडून तो स्वत:ला जखमी करून घेतो.

तुक्याच्या या वागण्यानं आधीच माऊलींच्या जाण्यानं शोकाकुल झालेल्या मंडळींत संतापाचा उद्रेक होतो. आमदारही तोवर तिथं येऊन पोचलेले असतात. भक्त मंडळी ह. भ. पं.च्या पत्नी माईंना विनवणी करतात. माई तुक्याच्या या अघोरी वागण्यानं संतापून तिरमिरीत तो जिथं दोरू ढोसत बसलेला असतो तिथं जातात आणि त्याला काठीनं बडवीत घरी आणतात. आईचा मार खात तुक्या घरी येतो खरा; परंतु वडलांवर अंतिम संस्कार करण्यास तो साफ नकार देतो. इतक्यात एक इन्स्पेक्टर दोन पोलिसांसमवेत तिथं येतात. ते भक्तांना माऊलींच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टेम केल्याविना अंत्यसंस्कार करता येणार नाहीत असं सांगतात. कारण तुक्यानं.. माऊलींच्या मुलानंच पोलिसांत तक्रार दाखल करून ही मागणी केलेली असते.

तुक्याच्या या पवित्र्यानं सारेच हवालदिल होतात. परंतु भक्त मंडळी ‘आम्ही माऊलींच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टेम करू देणारा नाही’ असं एकमुखानं बजावतात. आमदारही त्यांच्या सुरात सूर मिसळतात. त्यांना आपल्या ‘मतदारांची’ पडलेली असते. पण इन्स्पेक्टर आपल्या भूमिकेवर ठाम असतात. मुलानंच वडलांचं पोस्टमॉर्टेम करण्याची मागणी केलेली असताना ती नाकारणं हा गुन्हा ठरेल याची जाणीव ते सर्वाना करून देतात. पण लोक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. कायदा हातात घेऊन माऊलींवर अंतिम संस्कार करू, असा दृढ निर्धार ते व्यक्त करतात. या पेचावर तोडगा म्हणजे तुक्यानं आपली मागणी मागे घ्यावी आणि तसं लिहून द्यावं असं इन्स्पेक्टर सुचवतात. परंतु तुक्या हटून बसलेला असतो. या पेचातून कसा मार्ग काढावा, कुणालाच कळत नाही. तुक्यासारख्या बेवडय़ाच्या नादी न लागता माऊलींवर आपणच अंत्यसंस्कार करू असं काही जण म्हणू लागतात.

दरम्यान, खासदारांचा फोन येतो की ते पोहचेतो माऊलींवर अंतिम संस्कार करू नयेत. आमदार त्यांच्या हुकमाचे ताबेदार असल्यानं वेळ काढण्यासाठी ते तुक्याला- ‘वडलांबद्दलची तुझी जी काही तक्रार असेल ती एकदाची बोलून मोकळा हो, म्हणजे मग तुझं मन शांत होईल,’ असं सांगतात. लोक आमदारांवर संतापतात. पण तुक्याच्या मनातलं वडलांबद्दलचं किल्मिष निघून जावं आणि त्यानं अंतिम संस्कार करण्यासाठी राजी व्हावं म्हणून मी हे करतोय असं आमदार खुलासा करतात. लोक नाइलाजानं याला राजी होतात..

पुढे जे घडतं ते मन सुन्न, विषण्ण करणारं आहे.

जगाच्या दृष्टीनं वंदनीय असलेले ह. भ. प. तुक्याच्या दृष्टीनं इतके तिरस्करणीय का? तुक्याची व्यसनाधीनता ही कशाची परिणती? मेडिकलचा विद्यार्थी असलेला तुका एकाएकी वाया जातो..? माईंच्या मूकपणाचं रहस्य काय? ..अशा अनेक प्रश्नांची आवर्तनं वाचक म्हणून तुमच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. परंतु त्यांची उकल प्रत्यक्ष नाटकातून करवून घेणंच उचित होय.

लेखक-दिग्दर्शक राम दौंड यांनी ‘तुका म्हणे..’द्वारे एक सामाजिक विकृती चव्हाटय़ावर मांडली आहे. केवळ ती मांडूनच ते थांबले नाहीत, तर समाज म्हणून आपण किती भोळसट, ढोंगी, अंधश्रद्ध आहोत याचा पंचनामा करत, याचा गैरफायदा राजकारणी मंडळी कसा उठवतात आणि सत्याचा आग्रह धरणारे लोक कसे ‘वेडे’ ठरवले जातात, याचं विलक्षण भेदक चित्रण त्यांनी या नाटकात केलं आहे. आणखीन एक नमूद करण्याजोगं वैशिष्टय़ म्हणजे तुकोबांच्या रचनांचाच आधार घेत त्यांनी रेखाटलेला ह. भ. प. आणि त्यांचे साथीदार मृदंगाचारी यांच्यातला संघर्ष! राम दौंड यांचा तुकोबांचा अभ्यास किती दांडगा आहे याची प्रचीती देणारा! बुवाबाजीचं दुकान थाटणारे कसे मातीच्या पायाचे असतात, हे दाखवताना त्यांनी ‘नाथाघरची उलटी खूण’ योजिली आहे; ज्यामुळे प्रयोग अधिकच अंगावर येतो. हे नाटक पाहताना ‘महानिर्वाण’ची नकळत आठवण होते. विसंगतीतून संगती स्थापित करण्यात राम दौंड यशस्वी झाले आहेत. संहितेतला उपहास, उपरोध प्रयोगात पात्रांच्या व्यवहारांतून त्यांनी कौशल्यानं संक्रमित केला आहे. असंख्य पात्रांना लीलया हाताळण्यातली हुकमत त्यांनी याआधीच ‘हे राम!’मध्ये सिद्ध केलेली आहेच. प्रसंगांतले बारकावे चितारण्यातली त्यांची मास्टरीही वादातीत आहे. संहितेत एकही अनावश्यक शब्द नाही, तद्वत प्रयोगातही एकही फ्रेम वा पात्रांचे वर्तन-व्यवहार अकारण नाहीत.. इतका बंदिस्त प्रयोग त्यांनी बांधलेला आहे.

अरुण कदम यांनी सूचक नेपथ्यातून विविध स्थळं निर्माण केली आहेत. आशुतोष वाघमारे यांचं पार्श्वसंगीत प्रयोगाची आंतरिक लय सांभाळणारं आहे. विनोद राठोड यांच्या प्रकाशयोजनेनं प्रयोगातलं नाटय़ अधिकच उभरून येतं. उदय तांगडींची रंगभूषा आणि अमर-तेजस यांची वेशभूषा नाटकाचा पोत अभिव्यक्त करते.

सुशील कुमार यांचा विद्रोही तुका तुकोबारायांप्रमाणेच मूढ समाजाप्रतीचा आपला आक्रोश त्याच तीव्रतेनं व्यक्त करतो. त्यांच्या असंगत वागण्या-बोलण्यातली संगती प्रेक्षकाला प्रयोगात खिळवून ठेवते. ह. भ. प. माऊलींच्या भूमिकेत उदय बराथे यांनी ‘चेहरा’ आणि ‘मुखवटय़ा’चा खेळ चांगलाच रंगवला आहे. त्यांच्यातली राक्षसी प्रवृत्ती आणि वरपांगी पांघरलेला संत-सज्जनाचा मुखवटा यांच्यातलं द्वंद्व त्यांनी नेमकं हेरलं आहे. माईंच्या मनातली अव्यक्त खळबळ, त्यांचा कोंडमारा आणि तुक्याच्या हट्टाग्रहानं त्यांनी सोडलेलं मौन मनाली देशपांडे यांनी संयतपणे व्यक्त केलं आहे. अतुल गोडसे यांचा मृदुंगचारी वास्तवदर्शी आहे. शारदाचं कोंडलेलं दु:ख व हतबलता तेजस्वी परब यांनी सर्वागानं पकडलीय. निशांत कदम यांच्या वागण्या-वावरण्यात बनचुक्या आमदाराचा हिशेबीपणा स्पष्ट जाणवतो. कु. मानस तांबटने छोटा तुक्या छान साकारलाय. साहेब मुधोळ (इन्स्पेक्टर), सौरभ रानडे (कारभारी), विजय पवार (कार्यकर्ता), शैलेश चव्हाण (आप्पा), ज्योत्स्ना रोकडे (चंदाई) तसंच इतरही कलाकारांनी या संस्मरणीय प्रयोगात आपापला वाटा चोख निभावला आहे.

प्रयोग संपला तरी प्रेक्षकाचा पाठलाग करणारं हे नाटक चुकवू नये असंच..!!!