बावळट विनोद नावाचा एक प्रकार सध्या सगळ्याच चित्रपटसृष्टीत रूढ होतोय. दिग्दर्शकाला सांगायचे काय, अभिनेत्यांना दाखवायचे काय आणि लोकांनी पाहायचे काय याची रूपरेषा न ठरवता वाटेल त्या तुंबडय़ा लावत चिनी खाद्यपदार्थ बनविण्याच्या वेगाशी प्रभावित होऊन चित्रपट बनविले जात आहेत. भारतीय चित्रपटांचा नव्वदोत्तरीचा पंधरा वर्षांतील टप्पा अशा चित्रपटांनी समृद्ध होता. त्यातील गंभीर सिनेमेही आज भरपूर विनोदी म्हणून पाहिले जाऊ शकतात. गेल्या काही वर्षांत नायक-नायिका आणि खलनायकांपासून चित्रपटात भूमिकांची उतरंड असलेले सगळेच बावळटपणाचे कहर करणारे विनोदी सिनेमे वाढू लागलेत. ते जराही थोर नसले तरी त्यातल्या व्यक्तिरेखांच्या मूर्खपणासाठी हसवतात. आपल्याकडील गोलमाल, वेलकम, ग्रॅण्डमस्तीसारख्या चित्रपटांना या कक्षेतील म्हणता येईल. त्यांच्या परदेशी आवृत्त्या इतरत्रही पाहायला मिळतात. अ‍ॅण्टोनिओ बॅण्डरस या अ‍ॅक्शन अभिनेत्याने वठविलेला ‘गन शाय’ हा ताजा ब्रिटिश सिनेमा बावळट विनोदाच्या पठडीला आणखी खोलीवर नेऊन ठेवणारा चित्रपट आहे.

कॉन एअर, द मॅकॅनिक  आणि एक्स्पाण्डेबल-२ सारखे ओढून ताणून विणलेले अ‍ॅक्शन सिनेमे बनविणाऱ्या सायमन वेस्टचा हा ओढून ताणून बनविलेला विनोदपट आहे. ज्यात नायकाच्या भूमिकेसाठी विजोड कलाकाराला आणले आहे आणि इतर अभिनेत्याच्या भूमिकांतील यथातथापण जोरकसपणे बिंबवण्यात आले आहे.

गन शाय ही पूर्वाश्रमीच्या प्रचंड लोकप्रिय बॅण्डमधील टर्क (अ‍ॅण्टोनिओ बॅण्डरस) या कलाकाराची गोष्ट आहे. मेटल अ‍ॅसेसिन नावाच्या त्याच्या बॅण्डचे ‘अ‍ॅस पेट्रोल’ नामक गाणे एका पिढीने डोक्यावर उचलून घेतलेले असते. पण शीला (ओल्गा कुर्यलेंको) या सुपरमॉडेलशी विवाह केल्यानंतर त्याच्यातले संगीतही संपते आणि प्रसिद्धीचा फेराही. म्युझिक चॅनलमधील निवेदकही त्याची दोन वर्षे नुसते घरी बसून राहिल्यामुळे खिल्ली उडवू लागतात. प्रसिद्धीकाळात कमावलेला अमाप पैसा आणि आलिशान राहणीमानात संगीत आणि खुद्द शीलावरील प्रेम या सर्वाना विसरून टर्क तऱ्हेवाईकपणाचे कळस गाठत असतो. चित्रपटाला सुरुवात होते तीच आपल्याविषयीची खिल्ली टीव्हीवर पाहून तो लांबोडका टीव्ही नोकरांना स्विमिंग पूलमध्ये टाकायला सांगण्याच्या फर्मानातून. दोन वर्षांच्या टर्कच्या घरकोंबडेपणावर उतारा म्हणून शीला त्याला त्याच्या मायदेशात म्हणजेच चिलीमध्ये फिरायला नेण्याचा कार्यक्रम आखते. तेथे पर्यटनासाठी मारक काळामध्ये हे जोडपे पोहोचते. नाखुशीने चिली देशात दाखल झालेला टर्क हॉटेल परिसरातच मद्य आणि कंटाळ्याची आवर्तने गिरवू पाहतो, त्याला टाकून फेरफटका करण्यासाठी निघालेल्या शीलाचे दहशतवादी अपहरण करतात. गोष्ट या अपहरण नाटय़ानंतर गंभीरऐवजी अधिकच विनोदी वळणाचा अंगीकार करते.

दहशतवाद्यांनी शीलाच्या सुटकेसाठी मागितलेली लक्षावधी डॉलरची रक्कम देण्यासाठी टर्क तयार असतो. पण अगदी छोटी कामे करण्यासाठीही नोकर ठेवणाऱ्या टर्कला बँकेत जाण्याचा प्रकार कठीण वाटायला लागतो. त्यातच अमेरिकी दूतावासातील अधिकाऱ्याला टर्कच्या अडचणींची माहिती होते. दहशतवाद्यांना आर्थिक मदत मिळू नये या खातर तो टर्कला पैसे बँकेतून काढण्यात अडथळा आणतो. आधी त्याने अशाच प्रकारे काढलेल्या पैशांना लंपास करतो. टर्क आपल्या लंडनमधल्या मैत्रिणीला पैसे काढण्यासाठी पाचारण करतो. ती चिलीमध्ये आणखी एका व्यक्तीला शीलाला सोडविण्याच्या मोहिमेत नियुक्त करते. हेरासारख्या पाठी लागलेल्या अमेरिकी अधिकाऱ्याला टाळून मग ते तिघे आपल्याच खात्यातील पैसा काढण्यासाठी दरोडय़ासारखी विचित्र योजना आखतात.

अपहरणाला विनोदी नाटय़ात परावर्तित करण्याचा प्रकार इथे जाणून-बुजून घडविण्यात आला आहे. इथल्या तथाकथित दहशतवाद्यांकडे बंदुका आहेत, पण त्यांच्याकडील दहशत पुरती बाद झालेली आहे. त्यात भर म्हणजे हे दहशतवादी बंदुकीतील गोळ्यांच्या मॅगझिनसोबत वाचायची मासिकेही सोबत बाळगताना दाखविलेले आहे. त्यातले सगळे मेटल अ‍ॅसेसिन या बॅण्डचे फॅन आणि अ‍ॅस पेट्रोल गाणे पाठ असलेले दाखविले आहेत. आपल्या बायकोला सोडविण्यासाठी दहशतवाद्यांपर्यंत पोहोचल्यावर दहशतवादी आणि रॉक स्टार यांची सांगीतिक चर्चा घडविणारा आणखी एक खिदळवून सोडणारा व्रात्यपणा येथे पाहायला मिळतो. एकुणातच इथला सगळाच प्रकार फार गंभीर न घेतल्यास आणि संगीत व दहशवादाच्या संदर्भातील थोडेसे वृत्तज्ञान असल्यास फारच गमतीशीर वाटेल.

रॉकस्टारचे बिघडलेले आयुष्य सावरलेले दाखवण्यासाठी केली गेलेली ही गोष्ट एरव्ही वाईटातला वाईट तर्कहीन बॉलीवूड चित्रपटांच्या दिग्दर्शकांनाही करता येण्यासारखी नाही. त्यासाठीच हा चित्रपट पाहायला हवा. नेहमी चांगले सिनेमे पाहायचे असे का कुठे बंधनकारक आहे?

 

Story img Loader