तिच्याकडे विश्वसुंदरी ऐश्वर्यासारखे निळेशार, रेखीव डोळे नाहीत किंवा गोरापान रंगही नाही. तथाकथित सौंदर्याच्या व्याख्येतील सौंदर्याची एकही खुबी तिच्यात नाही. आणि तरीही नुकत्याच झालेल्या ‘एमटीव्ही इंडिया नेक्स्ट टॉप मॉडेल सिझन २’ या स्पर्धेत तिला उपविजेती ठरत ‘सौंदर्यवती’चा बहुमान मिळवला आहे. खरं म्हणजे जिच्याकडे विजेतेपदही नाही, अशा मुलीची दखल का घेतली जावी, असा प्रश्न अनेकांना पडेल. पण प्रसारमाध्यमांपासून समाजमाध्यमांपर्यंत तिची दखल घेतली जातेय. तिच्यात काहीतरी विशेष आहे असं लिहिलं जातंय. असं विशेष काय आहे जानती हजारिका या सध्या रॅम्पवर सगळ्यांना दखल घ्यायला लावणाऱ्या तरुणीत..
आसामच्या लख्मीपूर या गावात जन्मलेली, पुढे अरुणाचल प्रदेश ते पुन्हा आसाम असा प्रवास करणारी जानती हजारिका ही २२ वर्षीय तरुणी. दिसायला सावळी असं म्हटलं तरी तिचा रंग अधिकच गहिरा वाटतो. आसामी जनतेचे वैशिष्टय़ असलेले विशिष्ट आकाराचे डोळे लाभलेल्या जानतीचे सौंदर्य एकूणच सौंदर्याच्या तथाकथित व्याख्येत न बसणारं. पण तिचा आत्मविश्वास आणि अंगभूत कौशल्य या जोरावर ती या स्पर्धेत उपविजेती ठरली. ती विजेती ठरली नाही याचं तिला दु:ख वाटतं का? या प्रश्नावर ती उत्तरते, ‘‘मी उपविजेती ठरले तरी सर्वाना माझा अभिमान वाटतो. मलाही माझा अभिमान वाटतो आणि तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.’’
जानतीचा प्रवास तिने अभिमान बाळगावा असाच आहे. तिच्या रंगामुळे आणि वर्णामुळे तिला लहानपणापासूनच खडतर परिस्थितीचा सामना करावा लागला. जानती म्हणते, ‘‘माझ्या रंगावरून मला अपमानास्पद वागणूक दिली जायची. किशोरवयात माझ्या रंगामुळे अनेकांनी मला त्रास दिला. काहींनी तर अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली. त्या त्रासापोटी मी माझ्या अंगावर वार करून घ्यायचे. ज्याचे व्रण आजही माझ्या शरीरावर आहेत. पण अशा वेळी माझ्यासोबत काही चांगली माणसंही होती. ज्यांनी मला प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिलं. यात माझ्या आई-वडिलांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी मला घरात कधीही मुलगी म्हणून वागवलं नाही. मी अगदी बिनधास्त शेजारच्या मुलांसोबत जाऊन क्रिकेट खेळायचे. माझ्या त्यावेळेच्या एकंदर टॉम बॉय अवताराकडे बघून मी मॉडेल होईन असं मलाही वाटलं नव्हतं.’’
महाविद्यालयीन दिवसांत जानती महाविद्यलयाच्याच विविध सौंदर्यस्पर्धामध्ये भाग घेऊ लागली. त्यावेळी तिच्या रॅम्पवॉकचे अनेकांनी कौतुक केले. तिलाही हळूहळू मॉडेलिंग, रॅम्पवर चालणे आवडू लागले. फॅशन डिझायनिंगची विद्यार्थी असल्याचा तिला यात फायदा झाला. एक दिवस तिच्या आईनेच तिची छायाचित्रे एका प्रादेशिक सौंदर्यस्पर्धेसाठी पाठवली. तिथूनच तिला पुढे ‘मिस इंडिया’, ‘ग्रझिया कव्हर गर्ल’ आणि ‘एमटीव्ही इंडिया नेक्स्ट टॉप मॉडेल’ आणि ‘लॅक्मे फॅशन वीक’ यात सहभागी होण्याची संधी मिळाली.
या सर्व स्पर्धा, याव्यतिरिक्त विविध ‘फॅशन शो’मध्ये रॅम्पवरून चालताना जानतीला एक गोष्ट प्रकर्षांने जाणवायची ती म्हणजे तिच्या रंग व प्रांताबाबत केली जाणारी कुजबुज, ओढले जाणारे ताशेरे. जानती म्हणते, ‘‘ऑडिशनच्या वेळी अनेकांनी तू भारतीय वाटत नाहीस असे शेरे मारले होते. तर काही जण तर तू चीनमधून आली आहेस का? असे प्रश्न विचारायचे. ईशान्य भारत हा नक्की भारताचाच भाग आहे का? अशा शंकाही उपस्थित केल्या जायच्या.’’
मॉडेलिंग क्षेत्रातील काही प्रस्थापितांच्या या दृष्टिकोनावर मात करणे निश्चितच कठीण होते. ती म्हणते, ‘‘आपल्याला फार वाटत असतं की लोकांनी आपल्याला आपण आहोत तसं स्वीकारावं, पण मॉडेलिंगच्या क्षेत्रात हे फारच कठीण आहे. अशा वेळी तुम्ही प्रथम स्वत: ला स्वीकारणं गरजेच आहे आणि तेच मी केलं. जे काही वाईट अनुभव वाटय़ाला आले ते बाजूला सारून आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरं जाणं आणि ते आवाहन जगणं यातच खरी मजा आहे. ती मजा मी अनुभवतेय,’’ असं जानती सांगते.
मॉडेलिंग क्षेत्रातील लोकांचा दृष्टिकोन असा असेल तर जानती ज्या छोटय़ा शहरातून मुंबईत आलीय तिथे एकंदर वातावरण कसं असेल याबाबत साहजिकच कुतूहल वाटतं. यावर जानती म्हणते, ‘‘ज्यावेळी मी मॉडेल नव्हते पण या क्षेत्रात येण्याची इच्छा बाळगून होते तेव्हा आमच्या छोटय़ा शहरात अजूनही स्त्रियांना बंधनात ठेवणंच पसंत केलं जातं. यातूनही आपला मार्ग शोधावा लागतो. आज अगदी मी यशस्वी मॉडेल झाले असले तरी अजूनही माझ्याकडे स्त्री म्हणूनच पाहिलं जातं.
मॉडेलिंग हेच पूर्णवेळ करिअर करायचं जानतीचं ध्येय पक्कं आहे. फक्त यासाठी प्रत्येक पायरी चढत, ‘स्लो अँड स्टेडी’ असा प्रवास करणं तिला योग्य वाटतं. मॉडेलिंग या क्षेत्राने देखील सौंदर्याची परिमाणं नक्की न करता प्रत्येकातील वेगळेपणाला संधी द्यावी अशी अपेक्षा ती बाळगते. जानतीही आपल्यातील अपरिपूर्णतेलाच सौंदर्य मानते.
रंग माझा सावळा
भारतात अनेक सावळ्या मॉडेल व अभिनेत्री आहेत. यात प्रामुख्याने सुश्मिता सेनचं नाव घ्यावं लागेल. सुश्मिता ‘मिस युनिव्हर्स’ आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुश्मिताचे वडील शुबर सेन हे भारतीय वायुसेनेत विंग कमांडर होते. तर आई दुबईतील एका मोठय़ा दुकानासाठी ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करायची. याशिवाय कोंकणा सेन शर्मा, नंदिता दास, प्रियांका चोप्रा, बिपाशा बासू, लिझा हेडन या अभिनेत्रींच्या सावळ्या सौंदर्यानेही प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. याशिवाय एकेकाळची नीना मॅन्युएल ही आघाडीची मॉडेल तिच्या सावळ्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरही टायरा बँक, नाऊ मी कॅम्पबेल या सौंदर्यवती आपल्या वेगळ्या सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्याचबरोबर आसाम राज्यातील प्रियदर्शनी चॅटर्जी ही २०१६ ची ‘मिस इंडिया’ आहे.