पंजाबी कवयित्री आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखिका अमृता प्रीतम यांनी आपल्या ‘रसीदी टिकट’ या आत्मकथनात एके ठिकाणी म्हटलंय.. ‘माणूस जोवर नवनवी स्वप्नं पाहत असतो तोवर त्याचं सोळावं वर्ष कधीच सरत नाही.’ खरंय ते. आपण बऱ्याच वेळा अवतीभोवती पाहतो की परिस्थितीनं म्हणा किंवा इतर कशानं म्हणा; आयुष्याबद्दल कडवट, वैफल्यग्रस्त व नकारात्मक झालेली माणसं शरीरानं तरुण असूनही मनानं मात्र वृद्ध, चिपाड झालेली दिसतात. याउलट, एखादा साठी-सत्तरीतला वृद्धही विशीतल्या तरुणासारखा नित्य नवी स्वप्नं पाहत रसरशीतपणे आयुष्याला सामोरा जाताना दिसतो.
असं का होतं?
प्राप्त परिस्थिती, संकटं, अडीअडचणी, सततचा जीवनसंघर्ष हे माणसाला घडवत (वा बिघडवत) असतात. माणसाच्या प्रकृतिधर्मानुसार तो या गोष्टींना सामोरा जात असतो. कारण परिस्थितीला सामोरं जाणं कुणालाच चुकत नाही. माणसाच्या वृत्तीत सकारात्मकता वा नकारात्मकता येते ती संघर्षांला सामोरे जायच्या त्याच्या मानसिकतेतून. ती ठरवलं तर बदलताही येते. पण त्यासाठी त्या माणसानंच स्वत:च प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी त्याला फार तर दुसरं कुणीतरी मार्गदर्शन करू शकतं.
तर.. ‘वेलकम जिंदगी’ हे सौम्य जोशीलिखित व राजन ताम्हाणे दिग्दर्शित नाटक अशा एका माणसाच्या स्थित्यंतराबद्दलचं आहे. दीनानाथ दत्तात्रय धैर्यवान तथा दिनू (वय वर्षे ७५) आणि त्यांचे पिताश्री दत्तात्रय धैर्यवान ऊर्फ दत्तू (वय वर्षे १०२) हे दोघं एकाच घरात राहतात. मात्र, दीनानाथ परिस्थितीचे टक्केटोणपे खाऊन शरीराबरोबरच मनानंही म्हातारे झालेत; तर दत्तूशेठ मात्र सेंच्युरी मारूनही ‘अभी तो मैं जवॉं हू’ म्हणणारे. दीनानाथ औषधं, डॉक्टर, योग, कानटोपी, स्वेटर यांत गुरफटलेले; तर त्यांचे वडील दत्तूशेठ ट्रॅक-पॅन्ट चढवून सक्काळीच तरुणाईच्या जोशात जॉगिंगला जाणारे. आपला मुलगा दीनानाथनं वयानं आपल्यापेक्षा २७ वर्षांनी लहान असूनही म्हातारपणाचं अवडंबर माजवणं त्यांना मान्य नाहीए. त्यावरून त्यांच्यात खडाजंगीही होत राहते. इतकी, की एकाच छपराखाली दोघं राहत असूनदेखील दत्तूशेठनी स्वत:साठी स्वतंत्र फ्रीज आणि फोनची सुविधा करून घेतली आहे.
एके दिवशी दत्तूशेठच्या वाचनात येतं की, चीनमधील ऑंग चॉंग तू पेन हा माणूस चक्क ११८ वर्षे जगला. त्याच्या नावे सर्वाधिक वर्षे जगण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तेव्हा दत्तूशेठच्या मनात येतं की आपण या ऑंग चॉंगचा रेकॉर्ड का मोडू नये? पण यात एक मुख्य अडचण होती, ती अशी की, ऑंग चॉंगनं एका मुलाखतीत त्याच्या दीर्घायुष्याचं रहस्य सांगितलं होतं.. ‘मी नीरस गोष्टींना माझ्या आजूबाजूला कधीच फिरकू दिलं नाही.’ पण दत्तूशेठ मात्र दिवसाचे २४ तास दीनानाथसारख्या नीरस माणसाच्या सान्निध्यात राहत होते!
यावर उपाय काय?
त्यांना तो सुचतो : दीनानाथला आपल्यापासून दूर ठेवायचं. वृद्धाश्रमात! त्यांचा निर्णय पक्का होतो. ते तो दीनानाथला स्पष्टपणे सांगून टाकतात. सुरुवातीला दीनानाथला ते आपली मस्करी करताहेत असं वाटतं. परंतु ते खरोखरच याबद्दल गंभीर आहेत हे कळल्यावर त्याचा धीर खचतो. तो गयावया करतो. निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी साकडं घालतो. पण दत्तूशेठ आपल्या निर्धारावर ठाम असतात. पण नंतर आपल्या निर्णयाने दीनानाथची झालेली केविलवाणी अवस्था पाहून त्यांचं मन किंचितसं द्रवतं. ते त्याला आपल्या काही अटींची तू पूर्ण केल्यास तुला घरात राहू देईन असा उ:शाप देतात. दीनानाथ मागचापुढचा कसलाही विचार न करता त्यांच्या अटी तात्काळ मान्य करतो.
दत्तूशेठ त्यांना एकेक अटी सांगत जातात आणि दीनानाथला त्या पूर्ण करण्याविना गत्यंतरच उरत नाही. दीनानाथ आपल्या अटी योग्य तऱ्हेनं पुऱ्या करतो आहे की नाही, हे पाहण्यासाठी दत्तूशेठनी दीनानाथला औषधं पुरवणाऱ्या मेडिकल स्टोअरमधील औषधांची डिलिव्हरी करणाऱ्या मुलीला- साईला साक्षीदार म्हणून मुक्रर केलेलं असतं.
पुढं काय घडतं? दत्तूशेठनी अशा कोणत्या अटी घातल्या, की ज्या पूर्ण करता करता दीनानाथला नाकी नऊ आले? आणि हे सारं त्यांनी का केलं? आपल्याच मुलाचा त्यांनी असा का छळ मांडला? ..या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवायची तर ‘वेलकम जिंदगी’ पाहण्याशिवाय पर्याय नाही.
लेखक सौम्य जोशी यांनी एक अतिशय ‘हटके’ थीम या नाटकासाठी निवडली आहे. त्यात प्रेक्षकांना एकामागोमाग एक धक्के बसत राहतील याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. साईची साक्षीदार म्हणून केलेली योजना नाटकाला एक वेगळं परिमाण देते. म्हटलं तर हे नाटक तसं ‘प्रेडिक्टेबल’ आहे. हुशार प्रेक्षकांना त्यामागील हेतूचा लगेच अदमास लागतो. परंतु तरीही ते नाटकात गुंगून जातात. याचं कारण नाटकाची काहीशी उत्स्फूर्त वाटावी अशी रचना! उत्तरार्धात नाटकाला प्रेक्षकांना अपेक्षित कलाटणी मिळते; मात्र तोवर नाटककर्त्यांचा हेतू साध्य होतो. एक गोष्ट मात्र खटकते, की मुलात सकारात्मकता रुजवण्यासाठी बापाला शंभरीनंतर प्रयत्न करावे लागणं याचाच अर्थ पालक म्हणून ते स्वत:च मुळात कमी पडले, असा होत नाही का? अर्थात ज्यासाठी त्यांनी हा सगळा घाट घातला त्यामागचा त्यांचा हेतू उचित होता, हे मान्य.
दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी या काहीशा वेगळ्या कथाबीजाचं सादरीकरण करताना त्यातला आशय अधिक टोकदार कसा होईल हे कसोशीनं पाहिलं आहे. नाटकातील गंभीर आशय हसतखेळत मांडताना त्यांनी साई या पात्राचा सुयोग्य वापर केला आहे. या भूमिकेसाठी शिवानी रांगोळे या चळवळ्या, बडबडय़ा आणि उत्साहानं सळसळणाऱ्या कलावतीची निवड करून त्यांनी नाटकात उत्स्फूर्त निरागसता आणली आहे. तिथंच त्यांनी बरीचशी लढाई जिंकली आहे. नाटकात दत्तूशेठनी दीनानाथला घातलेल्या अटी पुनरावर्ती असल्या तरी त्यात अभिप्रेत मानवी पदर खचितच अंतर्मुख करणारे आहेत. दत्तूशेठ या पात्रावर मात्र दिग्दर्शकानं जे काम करायला हवं होतं ते त्यांनी केलेलं दिसत नाही. कारण शंभरी पार केलेले दत्तूशेठ मनानं कितीही ‘तरुण’ असले तरी त्यांचं शरीर तसं राहणं निसर्गनियमाने शक्यच नाही. या गोष्टीचा विचार झाल्याचं जाणवत नाही. किमान संवादोच्चार, शारीर बोली यांतून तरी ते प्रतीत व्हायला हवं होतं. दीनानाथच्या टोकाच्या विरोधी मानसिकतेचं हे पात्र असलं तरी इतका विरोधाभासही प्रेक्षकांच्या पचनी पडणं कठीण. त्यामुळे दत्तूशेठ यांचा बाह्य़ावतार अविश्वसनीय वाटत राहतो. डॉ. गिरीश ओक यांनी नेहमीच्या सफाईने दत्तूशेठ रंगवले असले तरी त्यात भूमिकेचा विचार दिसत नाही. भरत जाधव यांनी मात्र प्रस्थापित विनोदी अभिनेत्याच्या आपल्या इमेजबाहेर पडून इथे परिस्थितीनं वाकलेला, शरीराबरोबरच मनानं खचलेला, म्हातारपण सर्वस्वानं वागवणारा दीनानाथ प्रत्ययकारीतेनं साकारला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात हळूहळू होणारे बदलही त्यांनी विचारपूर्वक दाखवले आहेत. ‘अधांतर’नंतर बऱ्याच वर्षांनी त्यांच्यातल्या संवेदनशील कलावंताला अशी आव्हानात्मक भूमिका मिळाली आहे. तिचं त्यांनी चीज केलं आहे. शिवानी रांगोळे यांची साई कमालीची भाबडी आणि लोभस आहे. मनात येईल ते कसलीही भीडभाड न बाळगता बिनधास्तपणे धप्पकन् बोलून दाखवणारी साई प्रेक्षकांच्या मनात अलगद घर करते. तिने या नाटकात स्वत:बद्दल बऱ्याच अपेक्षा निर्माण केल्या आहेत. नाटकाचा ‘यूएसपी’ ठरावा असा तिचा वावर आहे.
नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी पाल्र्यातला जुना बंगला त्यातल्या तपशिलांनिशी उत्तम उभा केला आहे. नाटकाची जातकुळी ओळखत राहुल रानडे यांनी मूड ठळक करणारं संगीत दिलं आहे. रंगभूषाकार शरद व सागर सावंत यांनी दीनानाथच्या रंगभूषेबद्दल जो विचार केला आहे तसा दत्तूशेठच्या रंगभूषेसंदर्भात ते करते तर हे पात्र अविश्वसनीय ठरते ना! चैत्राली डोंगरेंनी वेशभूषेतून पात्रांना बाह्य़ व्यक्तिमत्त्व दिलं आहे. राजन ताम्हाणेंनी प्रकाशयोजनेतून नाटकातील ताणतणाव अधोरेखित केले आहेत. एकुणात, एक हटके नाटक पाहिल्याचं समाधान ‘वेलकम जिंदगी’ देतं यात संशय नाही.