काही कलाकार हे त्यांच्या एका ठरावीक शैलीमुळे ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांचा बाजही थोडाबहुत सारखाच असतो, तरीही लोकांच्या मनात आपलं स्थान टिकवण्यात ते कमी पडत नाहीत. ‘बालक पालक’, ‘टाईमपास’सारख्या चित्रपटांपासून सुरुवात करत विनोदी अभिनेता म्हणून लोकप्रिय ठरलेल्या अभिनेता प्रथमेश परबचे चित्रपट हे डोकं बाजूला ठेवून करमणूक करणाऱ्या चित्रपटांमध्ये गणले जातात. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘होय महाराजा’ हा शैलेश एल. एस. शेट्टी दिग्दर्शित चित्रपट हाही त्याच रंजक प्रथमेशपटांमध्ये मोडणारा आहे. मात्र यावेळी तो एकटा नाही आहे, तर मराठीतील चार प्रसिद्ध विनोदी अभिनेतेही या चित्रपटाशी जोडले गेले आहेत.
कोकणातून इलेक्ट्रिक इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेऊन शहरात चांगल्या पदाची नोकरी मिळणार या विश्वासाने आलेल्या रमेश परब या तरुणाची कथा ‘होय महाराजा’ या चित्रपटात रंगवण्यात आली आहे. प्रत्यक्षात मुलाखतीला गेल्यानंतर त्याला वास्तव दुनियेची जाणीव होते. मात्र नोकरी करण्याशिवाय गत्यंतर नसल्याने साहेब होण्याचं स्वप्न घेऊन आलेला रमेश शिपाई म्हणून दिवस ढकलत राहतो. मनाविरुद्ध नोकरी करत असताना त्याच्या आयुष्यात आएशासारख्या सुंदर तरुणीचा आणि पैसे मिळवण्याच्या कल्पनेचा एकाच वेळी प्रवेश होतो. पैसे मिळवण्याचा हा रस्ता प्रामाणिकपणाचा नसला तरी रमेश आणि त्याच्या मामाला झटपट श्रीमंती मिळते. मात्र एकीकडे केलेली लूट ही दुसरीकडे त्यांच्या जीवावर बेतते. खोट्यातून बाहेर पडण्यासाठी आणि आएशाला पुन्हा मिळवण्यासाठी रमेश मामा आणि राशिदभाईच्या मदतीने जे काही करतो त्याचं चित्रण म्हणजे हा चित्रपट म्हणता येईल. संचित बेंद्रे यांची कथा-पटकथा असलेला हा चित्रपट तसा सरधोपट पद्धतीने पुढे जाणारा आहे. फारसं वळण वा भावनिक नाट्य नसलेली ही कथा फुलवताना बव्हंशी चित्रपटाचा मुख्य नायक प्रथमेशची खासियत लक्षात घेऊन थोडीशी प्रेमकथा, विनोदाचा तडका, त्यासाठी उत्तम कलाकारांची निवड केलेली लक्षात येते.
हेही वाचा >>>Video: ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम ऋचा घांगरेकरने गायलं ‘ठरलं तर मग’ मालिकेचं शीर्षकगीत, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक
दिग्दर्शकाने प्रथमेशचा तरुण प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवत रमेश आणि आएशाच्या प्रेमकथेचा एक धागा चित्रपटाच्या मुख्य कथेत जोडला आहे. शिवाय, कुठेही भडक विनोदी नाट्य वाटू नये म्हणून प्रासंगिक विनोदनिर्मितीवर भर देण्याचाही प्रयत्न केलेला आहे. त्या नादात अनेकदा कथेने तर्काची खुंटी सोडलेली दिसते. सुरुवातीला रमेशचा साहेब जिग्नेशभाई (समीर चौगुले), मग राशिदभाई (संदीप पाठक) आणि चित्रपटाच्या उत्तरार्धात अण्णा नामक खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता वैभव मांगले यांचा प्रवेश होतो. एकेक व्यक्तिरेखा आणि त्यांच्या उपकथा एकमेकांत गुंतवत रमेशचं पैशाच्या मोहापायी दुष्टचक्रात अडकणं, सुखात लोळत असताना बसलेला धक्का, खऱ्या प्रेमाची जाणीव आणि मग ते मिळवण्यासाठी केलेली धडपड अशी साधी-सरळ रंजक मांडणी दिग्दर्शकाने केली आहे. तांत्रिकदृष्ट्या आणि मांडणीच्या अनुषंगाने चित्रपट सफाईदार आहे. पण आधीच उल्लेख केला त्याप्रमाणे अशाप्रकारच्या विनोदी चित्रपटांमध्ये बऱ्याचदा तर्काला जागा नसते. परीकथांच्या धाटणीनेच सुलभीकरण केलेल्या अशा चित्रपटांतून रंजन व्हावे हाच माफक उद्देश असतो. ‘होय महाराजा’ या चित्रपटातून तो उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रथमेशबरोबर अभिजीत चव्हाण आणि संदीप पाठक बऱ्यापैकी दीर्घ भूमिकेत आहेत. मामा-भाचे म्हणून अभिजीत चव्हाण आणि प्रथमेश परब ही जोडी चांगली जमून आली आहे. संदीप पाठक यांनीही राशिदच्या भूमिकेसाठी पकडलेला लहेजा आणि या तिघांची एकमेकांमधली केमिस्ट्री उत्तम आहे. त्यामुळे चित्रपटातली मनोरंजनाची मात्रा बऱ्यापैकी लागू पडते. त्या तुलनेत समीर चौगुले यांच्या व्यक्तिरेखेला पुरेसा वाव मिळाला नाही, वैभव मांगले यांनी त्यांच्या नेहमीच्या सहजशैलीत अण्णा साकारला आहे. मामा आणि भाच्यामधील कोकणी संवाद पुरते फसलेले आहेत. अंकिता लांडे आणि प्रथमेश यांनी याचवर्षी प्रदर्शित झालेल्या ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटातही एकत्र काम केले होते. ‘होय महाराजा’मध्येही ही जोडी चांगली वाटत असली तरी अंकिताला दोन गाणी आणि काही संवादांपलीकडे ठोस भूमिका नाही. संगीतकार चिनार-महेश जोडीने संगीत दिलेली दोन गाणी चित्रपटात आहेत. प्रेमकथेच्या अनुषंगाने केलेली ही दोन्ही गाणी श्रवणीय झाली आहेत. उत्तम विनोदी कलाकारांमुळे बऱ्यापैकी जमून आलेला ‘होय महाराजा’ हा चित्रपट दोन घटका करमणुकीच्या पलीकडे वेगळा अनुभव देत नाही.
होय महाराजा
दिग्दर्शक – शैलेश एल. एस. शेट्टी
कलाकार – प्रथमेश परब, अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, समीर चौगुले, वैभव मांगले, अंकिता लांडे.