कुटुंब हे नेहमीच खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे असते. कुटुंबातील, नात्यागोत्यांतील प्रत्येकाशी आपले जिव्हाळय़ाचे, प्रेमाचे नाते असते. मराठी चित्रपटांतून आजपर्यंत कौटुंबिक विषय अतिशय उत्तमपणे हाताळले गेले आहेत. असाच एक कुटुंबावर आधारित नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आंबे, उंच माडाची झाडे, फणसाच्या बागा, काजू, अथांग समुद्र असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट ‘घरत गणपती’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने घरत कुटुंबीयांच्या घरी नक्की कसा गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्यातून नात्यांची गंमत कशी उलगडताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार याविषयी दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर, प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य देव आणि अभिनेत्री अश्विनी भावे यांच्याबरोबर तरुणाईच्या गळय़ातील ताईत असलेला अभिनेता भूषण प्रधान यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या भेटीत मनमोकळय़ा गप्पा मारल्या.
नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर या तरुण नवोदित दिग्दर्शकाचा ‘घरत गणपती’ हा पहिलावहिला चित्रपट येत्या २६ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नातेसंबंधांतील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो. मायेने आणि आपलेपणाने नाती जोडणाऱ्या घरत कुटुंबातील गणेशाचे आगमन आणि त्यानिमित्ताने पुन्हा जुळणाऱ्या आपुलकीची नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटात नव्या-जुन्या कलाकारांची फौज आहे. निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशीष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशा नामवंत कलाकारांची मांदियाळी आणि कोकणातील निसर्गसौंदर्य यांची सांगड घालत घरत गणपतीची कथा पडद्यावर रंगली आहे. याबद्दल बोलताना दिग्दर्शक नवज्योत म्हणतो, ‘फक्त कोकणातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र कुटुंब पद्धत आहे. आतापर्यंत गणपतीवर आधारित अनेक गाणी आली आहेत, पण असा घरातल्या गणपतीची गोष्ट सांगणारा चित्रपट आलेला नव्हता, त्यामुळे तो करायचा निर्णय घेतला’. या चित्रपटाची कथा कुठेतरी त्याच्या स्वत:च्या घरच्या गणपतीच्या आठवणींशी जोडलेली असल्याचेही त्याने सांगितले. ‘माझ्या घरी कोल्हापूरला मागील ७५ वर्षांपासून गणेश स्थापना होत आहे. या गणेशोत्सवात घर गजबजलेलं असायचं. याच अनुभवातून ‘घरत गणपती’ची कथा जन्माला आली आहे’ असं त्याने सांगितलं.
२५ वर्षांनी पुन्हा एकत्र..
‘घरत गणपती’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता अजिंक्य देव आणि अभिनेत्री अश्विनी भावे ही जोडी २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर काम करताना दिसणार आहे. ‘आम्ही २५ वर्षांनंतर एकत्र काम करत आहोत, या गोष्टीचे आमच्यापेक्षा प्रेक्षकांना अधिक कौतुक आहे हे पाहून खूप छान वाटते. एकप्रकारे ही आमच्या कामाची पोचपावती आहे, त्यामुळेच २५ वर्षांनंतरही प्रेक्षकांचे एवढे प्रेम आम्हाला मिळते आहे’ अशी भावना अजिंक्य देव यांनी व्यक्त केली. तर कितीही काम केले, पुरस्कार मिळाले तरी आपल्या मराठी प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम हे फार मौल्यवान आहे. प्रत्येक चित्रपट करताना नवीन सुरुवात केल्याप्रमाणे आम्ही काम करतो. आत्ताही त्याच भावनेने आम्ही ‘घरत गणपती’ या चित्रपटात काम केलं आहे. पण इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षक आम्हाला विसरलेले नाहीत, तर आमच्यावर भरभरून प्रेम करत आहेत हे पाहूनच आम्ही कृतार्थ झालो आहोत, असे अभिनेत्री अश्विनी भावे यांनी सांगितले.
सातत्याने वेगळेपणा जपण्याचा प्रयास
अभिनेता भूषण प्रधान या वर्षभरात वेगवेगळय़ा विषयांवरील चित्रपटातून भूमिका करताना दिसतो आहे. सातत्याने वेगवेगळे चित्रपट केल्याचे मान्य करतानाच त्याची सुरुवात मुळी ‘घरत गणपती’ चित्रपटापासून झाली होती, असे भूषणने सांगितले. या चित्रपटातील प्रत्येक पात्र हा चित्रपट पुढे घेऊन जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. गणरायाच्या आगमनाच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे याचा खूप आनंद वाटतो असे सांगतानाच त्यानेही कोकणातील गणेशोत्सव अनुभवला असल्याची आठवण सांगितली.
कलाकारांपेक्षा कथानक महत्त्वाचे..
मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका करत आपले अभिनयाचे खणखणीत नाणे सिद्ध करणाऱ्या अश्विनी भावे आणि अजिंक्य देव या दोघांनीही प्रेक्षकांच्या दृष्टीने मराठीत कलाकारांपेक्षा कथानक अधिक महत्त्वाचे असते, असे अनुभवी बोल ऐकवले. मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळय़ा कथा महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत, त्यामुळे ‘जोगवा’सारखे फार वेगळे उत्तम चित्रपट मराठीत झाले. मराठीत येणाऱ्या नवनव्या दिग्दर्शकांचा त्यांच्या कामावर विश्वास आहे, मेहनतीची तयारी आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांचा खूप अभिमान वाटतो, असे अश्विनी भावे यांनी सांगितले. तर मराठीत साठ-सत्तरच्या दशकांतही राजा परांजपे यांच्यासारखे दिग्दर्शक आणि त्याच ताकदीचे कलाकारही होते. आत्ताही त्याच ताकदीचे चित्रपटकर्मी असल्याने मराठी चित्रपट हिंदीपेक्षा अत्यंत चांगले आहेत, असे अजिंक्य देव यांनी स्पष्ट केले.
उच्च निर्मितीमूल्य असलेले चित्रपट हवेत..
मराठी चित्रपटांची कथा उत्तम असली तरी व्यावसायिकतेच्या समीकरणांमध्ये आपण मागे पडतो, असे मत नवज्योतने व्यक्त केले. ‘घरत गणपती’ हा चित्रपट करताना इतका निर्मितीखर्च एका चित्रपटासाठी करण्यापेक्षा त्यात दोन चित्रपट करता आले असते, असा सल्ला अनेकांनी दिला. देशभरात सध्या ‘केजीएफ’ चित्रपटाचे कौतुक केले जाते, पण तो त्या दर्जाचा बनवण्याचे धाडस निर्मात्यांनी केले आणि म्हणून कन्नड चित्रपटसृष्टीत ‘केजीएफ’हा पहिला ४०० कोटी कमावणारा चित्रपट ठरला. मराठीतही असे धाडस करत उच्च निर्मितीमूल्य असलेले अधिकाधिक चित्रपट करायला हवेत, असे त्याने सांगितले.
अभिनयगुणांपेक्षा फॉलोअर्सची संख्या महत्त्वाची ठरतेय..
सध्या कलाकारांच्या निवडीसाठीही त्यांच्या अभिनयगुणांपेक्षा समाजमाध्यमांवर त्यांचे फॉलोअर्स किती आहेत हे पाहिले जाते. हा प्रकार अर्थातच चुकीचा आहे, असे भूषणने सांगितले. मी पथनाटय़, एकांकिका मग चित्रपट असा प्रवास केला. सुरुवातीला आम्हा कलाकारांना आपला पोर्टफोलिओ घेऊन ऑडिशनसाठी जावं लागायचं. आता समाजमाध्यमांमुळे काही सेकंदांत तुमची वेगवेगळी छायाचित्रे वा ऑडिशन्सच्या रिल्स निर्माता-दिग्दर्शकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे एकीकडे चांगली सोय झाली असली तरी या माध्यमाचा अतिरेक न करता सुयोग्य वापरावर भर दिला पाहिजे, असेही त्याने स्पष्ट केले.