नीलेश अडसूळ

समाजमाध्यमांचे प्रस्थ कितीही वाढले, कलाकारांचा मोठा चाहतावर्ग तिथे निर्माण झाला तरी नाटक आणि वर्तमानपत्रामधील मनोरंजनाचं पान हे एक अविभाज्य समीकरण आहे. अचूक बातम्यांसह मनोरंजनाची भूक भागवू पाहाणारा चोखंदळ वाचकवर्ग नाटकांच्या त्या जाहिराती पाहण्यासाठी कायमच आसूसलेला असतो. करोनामुळे नाटक बंद झाल्याने हे पान दिसेनासे झाले आणि काहीतरी चुकल्यासारखे वाटू लागले. त्यातूनही वाट काढत नाटक पुढे आले आणि प्रयोग होऊ लागले. बघता बघता ५० टक्के आसन क्षमतेची अटही शिथिल झाली आणि पाचाचे पंचवीस झाले. आता मात्र वर्तमानपत्र वाचताना नाटकांच्या जाहिरातींनी भरलेले पान पाहून वाचकमन सुखावते आणि नाटय़गृहाकडे वळते. म्हणूनच नाटकाच्या या नव्या इिनगचा थोडक्यात आढावा..

Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
Best American Short Stories O Henry Prize Stories author book
बुकबातमी: कथेतला ‘तृतीयपुरुष’ हरवला आहे?
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
star pravah lagnachi bedi serial will off air
‘आई कुठे काय करते’नंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर केलं अधिराज्य

या नव्या पर्वाला ‘हलकंफुलकं’ नाव देता येईल. कारण करोनाच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या, नव्याने आलेल्या आणि येऊ घातलेल्या नाटय़कृती आशयघन आणि विषयाचे वेगळेपण घेऊन आल्या असल्या तरी त्यात विनोद आणि  मांडणीचा साधेपणा हा सामाईक धागा आढळतो. यात काही कलाकृती वेगळय़ा धाटणीच्या आहेत पण त्या बोटावर मोजण्याइतक्याच. प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाने रसिकांची मने जिंकलीच, शिवाय करोनाकाळात प्रयोग करण्याचे धाडसही केले. दामले यांचे नवे नाटक कधी येणार याची उत्सुकता रसिकांना होती आणि अखेर त्याचे उत्तर मिळाले आहे. ‘सारखं काहीतरी होतंय’ या त्यांच्या नव्या नाटकाचा पहिला प्रयोग २५ मार्च रोजी होणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्री वर्षां उसगावकर यांनी बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर पदार्पण केले आहे. तर लेखन- दिग्दर्शनाची धुरा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या खांद्यावर आहे. हे नाटक बदलत्या नातेसंबंधांवर भाष्य करते. आईवडील आपल्या मनाला मुरड घालून, पोटाला चिमटा काढून मुलांना मोठं करतात, पण तीच मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या स्वतंत्र जगण्याचा मार्ग निवडतात. आयुष्याकडे बघण्याचा दोन पिढय़ांचा दृष्टिकोन, त्याचे परिणाम आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न.. असे काहीसे कथानक असलेली ही नाटय़भेट आहे.

अंशुमन विचारे यांच्या ‘वाकडी तिकडी’ या नाटकाने १ मार्च रोजी रंगभूमीवर येऊन धुडगूस घातला आहे. हास्यविनोद आणि निखळ मनोरंजन असणारे हे फार्स स्वरूपाचे नाटक आहे. गरजेपोटी केलेली कृती आणि ती कृती करताना घडलेल्या गमतीजमती आपल्याला यात पाहायला मिळतात. नाटकाचे लेखन श्रमेश बेटकर यांनी केले असून अंशुमन आणि श्रमेश यांनी दिग्दर्शन केले आहे. अंशुमन यांच्या ‘हौस माझी पुरवा’ या नाटकानेही रसिकांची मने जिंकली आहेत. संतोष पवार आणि अंशुमन हे विनोदातून राजकीय कोपरखळय़ा मारत लोकशाहीचे महत्त्व पटवून देतात. या नाटकाचे लेखन- दिग्दर्शन  संतोष पवार यांनी केले आहे. संतोष पवार यांच्या लेखणीने प्रेक्षकांना मोठी भुरळ घातली आहे. त्यांच्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकानेदेखील अवघ्या एका महिन्यात रसिकांची पावले नाटय़गृहाकडे वळवली. अभिनेता सागर कारंडे या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांचे दिग्दर्शन असलेली दोन नाटके म्हणजे रसिकांसाठी पर्वणी.. त्यापैकी  ‘खरं खरं सांग’ हे नाटक ११ मार्च रोजी रंगभूमीवर आलं. नीरज शिरवईकर यांनी नाटकाचे लेखन केले असून आनंद इंगळे, सुलेखा तळवळकर, ऋतुजा देशमुख, राहुल मेहंदळे अशा दिग्गज मंडळींनी ही संसाराची गोष्ट रंगवली आहे. ‘प्रत्येक सुखी संसाराच्या मागे थोडं खोटं असतं’ असे या नाटकाचे ब्रीद असल्याने कथेतील गंमत काय असू शकते याचा काहीसा अंदाज बांधता येईल. विवाहबाह्य संबंधांवर सूचक आणि विनोदी शैलीतून भाष्य करत हास्याची खसखस पिकवण्याचे काम हे नाटक करते. तर ‘३८ कृष्ण व्हिला’ हे दुसरे नाटक. नुकताच या नाटकाचा शुभारंभ झाला, अभिनेते गिरीश ओक यात प्रमुख भूमिकेत असून त्यांची ही पन्नासावी नाटय़कृती आहे. डॉ. श्वेता पेंडसे या नाटकाच्या लेखिका आणि अभिनेत्रीदेखील आहेत. या नाटकाचे कथानक काहीसे गूढ उलगडणारे असल्याचे समजते. हे संवाद आणि शब्दांना प्राधान्य देणारे चर्चानाटय़ आहे. 

मुलं असूनही वृद्धापकाळात एकटेपण वाटय़ाला आलेले अनेक आईवडील आपल्या आजूबाजूला आहेत. हे दुखणं घेऊन जगताना यावर उपाय काय, अशा वेळी करायचे काय, असे अनेक गंभीर प्रश्न समोर येतात. त्याच प्रश्नांना ‘संज्या छाया’ या नाटकाने वाट करून दिली आहे. वास्तवदर्शी आणि तितकाच गंभीर विषय अत्यंत सोप्या पद्धतीने, विनोदाची झालर देत लेखक प्रशांत दळवी यांनी मांडला आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून निर्मिती सावंत आणि वैभव मांगले हे प्रमुख भूमिकेत आहेत. फेब्रुवारीमध्ये रसिक भेटीला आलेल्या या नाटकाने अवघ्या दीड महिन्यात २५ प्रयोगांचा टप्पा गाठला आहे, लवकरच या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग होणार आहे.

याशिवाय ‘कुर्रररर’, ‘वासूची सासू’, ‘फॅमिली नंबर १’, ‘मी स्वरा आणि ते दोघं’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘तू म्हणशील तसं’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘वुमन’, ‘सही रे सही’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘वन्स मोअर तात्या’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘व्हॅक्युम क्लीनर’ अशा अनेक नाटय़कृती रसिकांचे रंजन करत आहेत. केवळ नाटकच नव्हे तर सांगीतिक मैफली, नृत्याविष्कार, लावणी या कार्यक्रमांनाही बहर आला आहे. तसेच नवे कलाकार प्रायोगिक रंगभूमीवर विविध प्रयोग करत आहेत. या निमित्ताने नव्या जागा, नवे रंगमंच, नवे विषय रसिक अनुभवत आहेत.

५० टक्के आसन क्षमतेची मर्यादा दूर झाल्याने रसिकवर्ग सकारात्मक झाला असून नाटय़सृष्टी खऱ्या अर्थाने उभारी घेऊ लागली आहे. ‘१०० टक्के प्रतिसादात नाटक अनुभवण्याची मजा वेगळी आहे. र्निबधकाळात नाटक पाहून मनमोकळे हसतानाही दडपण यायचे. आपल्या शेजारच्या माणसाशी हितगूज करत रसिक नाटक पाहतो. त्यामुळे नाटय़गृहात आलेली भयाण शांतता जाऊन जुनी अनुभूती पुन्हा अनुभवास मिळते आहे. हास्य विनोद, टाळय़ा,शिटय़ा यांची भरभरून दाद देताना मजा येते. त्यामुळे आता खरे नाटक रंगत जाईल,’ अशा प्रतिक्रिया नाटय़ रसिकांकडून येत आहेत. असेच सकारात्मक वातावरण राहिले तर महिन्याभरात आणखी काही नवे नाटय़प्रयोग रसिकांच्या भेटीला येतील, अशी माहिती निर्मात्यांकडून मिळाली. त्यामुळे लवकरच सारे ‘नाटय़मय’ होवो अशी आशा वजा खात्री बाळगण्यास हरकत नाही.

नवं काही : अपहरण २

‘अपहरण २’ ही कथा वरिष्ठ पोलीस अधिकारी रूद्रा श्रीवास्तव यांच्याभोवती फिरते. एकीकडे त्याच्याकडे देशाला वाचवण्याची जबाबदारी आहे तर दुसरीकडे मात्र त्याचे वैयक्तिक आयुष्यही गुंतागुंतीचे झाले आहे. मर्दानीपणा, रुबाब, जबरदस्त डायलॉगबाजी आणि तोंडातून अस्खलित शिव्या असा तामझाम असणारा हा रूद्रा आपल्या संपूर्ण मोहल्यात लोकप्रिय आहे. जेम्स बॉण्ड किंवा हिंदूीतील एजंट विनोद या पठडीतला हा रूद्रा थायलंडमध्ये जाऊन पोहोचतो आणि वाटेत बिक्रम बाहदूर शहा सारखे एक पात्र मध्येच डोकं वर काढते. बीबीसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिक्रम बाहदूर शहा रूद्राचे अपहरण करायचे असल्याचे कळवतो आणि तिथून एकूणच अपहरणाचा मामला सुरू होतो. एका बाजूला सत्तरच्या दशकातील संगीत, विनोदी प्रसंग आणि थरारक अँक्शनबाजी अशी काहीशी रूपरचना या वेबमालिकेला देण्यात आली आहे. अपहरणाचे षडय़ंत्र, मग तशी हेराफेरी, शोधाशोध, पळापळ, गोळीबार आणि गोंधळ सुरू होतो आणि हळूहळू रूद्रा आणि बिक्रमचे पैलूही उलगडत जातात. एकूणच रंगभूषा आणि वेशभूषा पाहता ही वेबमालिका जेम्स बॉण्डच्या चित्रपटांची हुबेहूब नक्कल वाटते. टाळेबंदीच्या काळात बीसी आन्टी म्हणून घराघरात पोहोचलेल्या स्नेहील दीक्षित-मेहरा या वेबमालिकेतून छोटी भूमिका करत आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचीही यात पाहुणे कलाकार म्हणून भूमिका आहे. या वेबमालिकेचे दिग्दर्शन सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी केले असून याची निर्मिती एकता कपूर यांची आहे.

कलाकार -अरुणोदय सिंग, माही गिल, मोनिका चौधरी, निधी सिंग, संजय बद्रा, श्वेता राजपूत, आदित्य जाधव आणि स्नेहील दीक्षित-मेहरा  कधी -१८ मार्चपासून प्रदर्शित  कुठे -वूट

रुहानियात

प्रेमभंग होणे हा तरुण पिढीच्या आयुष्यातील एक कटू अनुभव जो आत्तापर्यंत चघळून चघळून चोथा झालेला विषय. कोवळय़ा वयातील तरुणांसाठी प्रेम म्हणजे टाइमपास. त्यामुळे त्यांना खरं प्रेम म्हणजे काय हे ओळखणे तर दूरच पण ते जाणून घेणेही मुश्कील असते, असा एक शिक्का त्यांच्यावर लावला जातो. अनेकदा आयुष्यात प्रेमाने दगा दिल्यावरही आलेल्या अनुभवामुळे काही जण परत परत प्रेमाच्या शोधात नवनवे पर्याय निवडत राहातात. अशी दोन प्रकारची माणसं एकमेकांसमोर आली की प्रेम या एकाच गोष्टीवरून त्या दोघांमध्ये रणकंदन माजते. तरुणांना प्रेमाची व्याख्या आशावादी वाटते तर एकदा आयमुष्यात प्रेम गमावल्याने काहींसाठी ती व्याख्या पूर्णत: बदलून गेलेली असते. प्रिषा आणि सावीर या दोन टोकाची विचारसरणी असलेल्या युगुलांना आयुष्यात असाच प्रेमाचा अनुभव आलेला असतो. प्रिषा ही १९ वर्षांची तरुण मुलगी आहे जिने कधी प्रेम ही संकल्पना अनुभवलेली नसते. त्यामुळे तिला प्रेमाचा अर्थ काय माहिती असणार? अशी सावीरची धारणा असते. सावीरच्या आयुष्यात त्याने एकदा प्रेम गमावलेले असल्याने प्रिषाकडे पाहून तरी तो तिच्या प्रेमात पडेल का आणि प्रिषालाही सावीरकडून खरं प्रेम मिळेल का, या प्रश्नांची उत्तरं ‘रुहानियात’ या वेबमालिकेतून प्रेक्षकांना मिळणार आहेत. सावीरसाठी प्रिषाबद्दलचे त्याचे मत बदलणार की नाही अशा घडामोडींतून ही मालिका पुढे सरकणार आहे. त्यामुळे यात अनेक पात्रं असून तद्दन मेलोड्रामा पाहायला मिळणार आहे. या वेबमालिकेचे दिग्दर्शन अंकुश मोहला आणि ग्लेन बार्रेट्टो यांनी केले आहे. एकता कपूरच्या ‘क’च्या बाराखडीतील मालिकांची आठवण करून देणारी अशी ही वेबमालिका आहे.

कलाकार -अर्जुन बिजलानी, कनिका मनन, अमन वर्मा आणि स्मिता बन्सल कधी -२३ मार्च कुठे – एमएक्स प्लेअर