गेल्या काही वर्षांत परदेशात चित्रित झालेल्या मराठी चित्रपटांची संख्या वाढली आहे. ‘झिम्मा’सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. याच मांदियाळीतला नवा चित्रपट म्हणजे महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘एक राधा एक मीरा’ हा चित्रपट. येत्या ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणारा हा चित्रपट पूर्णपणे स्लोव्हेनियामध्ये चित्रित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि मुख्य जोडी अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी स्लोव्हेनियातील चित्रीकरणाच्या आठवणी, प्रेमकथेसाठी केलेली तयारी अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या.
आत्तापर्यंत हिंदीतही पूर्व युरोपमध्ये फारसं चित्रीकरण करण्यात आलेलं नाही, त्यामुळे ‘एक राधा एक मीरा’ हा पहिलाच चित्रपट आहे, ज्यात पूर्व युरोपचा निसर्गरम्य भाग अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती देत अभिनेता गश्मीरने चित्रीकरणाच्या निमित्ताने तेथील लोकांविषयी आलेला अनुभव सांगितला.
● प्रेमाची रूपं वेगवेगळी…
या चित्रपटात प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने मृण्मयीने तिची प्रेमाची संकल्पना काय आहे याविषयी सांगितलं. ‘प्रेमाची वेगवेगळी रूपं असतात. एकच व्यक्ती आपल्याला सगळ्या प्रकारचं प्रेम देऊ शकत नाही. आपल्याला मित्र-मैत्रिणींचं प्रेमही हवं असतं. आई-वडिलांचं प्रेम, भावंडांचं प्रेम हे सगळं हवं असतं. माझ्या मते प्रेमाची व्याख्या बदलत असते, पण आपण ज्याच्यावर हक्क गाजवू शकतो आणि त्या व्यक्तीलाही आपलं त्याच्यावर हक्क गाजवणं आवडतं ते प्रेमाचं नातं आहे.’
● तुमचा अभिनय उत्तम हवा…
प्रेमपटांमध्ये बऱ्याचदा नायक-नायिकेची जोडी पडद्यावरही तितकीच खुलून दिसावी लागते, पण त्यासाठी प्रत्यक्षातही त्यांच्यात चांगली मैत्री असायलाच पाहिजे हे गरजेचं नसतं, असं मत गश्मीरने व्यक्त केलं. त्याचं उदाहरण देताना त्याने आपल्या वडिलांची रवींद्र महाजनी यांची आठवण सांगितली. ‘रंजना आणि रवींद्र महाजनी ही पडद्यावरची अगदी लोकप्रिय जोडी होती. त्यांनी ‘हळदी कुंकू’, ‘मुंबईचा फौजदार’ असे कितीतरी चित्रपट नायक-नायिका म्हणून केले आहेत. पडद्यावर पाहताना अरे किती आकंठ प्रेमात बुडाले आहेत दोघं… असं प्रेक्षकांना वाटायचं. प्रत्यक्षात या दोघांचं कधीच आपापसात पटलेलं नव्हतं. एकदा कॅमेऱ्योसमोर दृश्य देऊन झालं की दोघंही एकमेकांकडे ढुंकूनही न बघता विरुद्ध दिशेने निघून जायचे. दोघांच्याही व्यक्तिमत्त्वात आणि स्वभावात खूप अंतर होतं, पण ते कधीच पडद्यावर त्यांनी जाणवू दिलं नाही. त्यामुळे मला वाटतं तुमचा अभिनय उत्तम असेल तर पडद्यावर समोर कोणीही असलं तरी तुमच्यातली अभिनयाची जुगलबंदी छान रंगते’, अशी आठवण सांगतानाच मृण्मयीबरोबर सुरुवातीला फारशी ओळख नव्हती, पण स्लोव्हेनियात चित्रीकरण सुरू असताना छान ओळख झाली आणि आता ती खूप जिवलग मैत्रिणींपैकी एक असल्याचं गश्मीरने सांगितलं.
● महाबळेश्वरची माती
मला जोडून ठेवते…
मृण्मयी देशपांडे मुंबई सोडून महाबळेश्वरमध्ये स्थायिक झाली आहे हे तिच्या चाहत्यांना माहिती आहे. पण म्हणून मी मुंबई – पुणे पूर्णपणे सोडलेलं नाही, असं तिने स्पष्ट केलं. मला कामासाठी मुंबई – पुण्यात यावंचं लागतं, पण काम झाल्यानंतर मी जेव्हा महाबळेश्वरमध्ये परतते तेव्हा ते खूप आनंददायी असतं. आता तिथेही कामं सुरू आहेत, त्यामुळे सतत धावपळ सुरू असते. तिथे मोबाइलला नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे सगळ्यांचे मेसेज वेळेवर मिळत नाहीत, चटकन संपर्क होत नाही, तरी सगळे जण मला याबाबतीत खूप सांभाळून घेतात. बाकी काहीही असलं तरी काम झालं की आपोआप पावलं महाबळेश्वरकडे वळतात, तिथली माती मला जोडून ठेवते, असं मृण्मयीने सांगितलं.
● चित्रपटाचा प्रकार आणि कथेतील वेगळेपण महत्त्वाचे
‘आजवर अॅक्शन, प्रेमकथा, थरार, रहस्य, नाट्यमय आदी प्रकारातील बहुसंख्य चित्रपटांची निर्मिती झाली आहे. प्रेमकथेवर आधारित चित्रपटच ५० ते ६० हजारांच्यावर आले असतील. त्यामुळे प्रेमपट ही नवीन गोष्ट नाही, पण आपण संबंधित प्रकारात काय वेगळे करत आहोत, हे महत्त्वाचं असतं, असं मांजरेकर यांनी सांगितलं. ‘अनेकदा प्रेमकथेत आपण आदर्श जोडीदार शोधतो किंवा आपल्या खास मित्र-मैत्रिणींमधील गुण त्या जोडीदारामध्ये पाहतो. परंतु आपली मित्र किंवा मैत्रीण आपल्यासोबत आयुष्यभर असणारच आहे, असं गृहीत धरून आपण त्यांच्याकडे नकळतच दुर्लक्ष करीत असतो, काहीशी या पद्धतीची प्रेमकथा ‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटातून मांडली आहे’, असं मांजरेकर म्हणाले.
● अभिनयासाठी ‘आत्मविश्वास’ महत्त्वाचा असतो
आयुष्यात सर्व गोष्टी क्षणार्धात मिळणारी आणि थोडीशी लाडावलेली मुलगी ‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटासाठी हवी होती. या पात्रासाठी मला नवोदित तरुण अभिनेत्रीची निवड करायची होती. हा शोध सुरू असताना प्रवीण तरडे याने सुरभी भोसले हिचं नाव सुचवलं. मला सुरभी संबंधित पात्रासाठी योग्य वाटली. ऑडिशन घेण्यापेक्षा संबंधित कलाकाराची भेट घेतल्यानंतर त्याला हो की नाही? असं विचारतो. या उत्तरातच कळतं की चित्रपटात कलाकार हा संबंधित पात्र करणार की नाही. मुळात अभिनय करण्यासाठी आत्मविश्वास ही गोष्ट महत्त्वाची असते. ‘मी करेन’ असा आत्मविश्वास असल्यास सर्व गोष्टी सुरळीतपणे साध्य होतात, असं स्पष्ट मत महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलं.
अपरिचित जागा दाखवायची होती…
बऱ्याच वर्षांपासून सांगीतिक प्रेमकथा करायची इच्छा आणि व्हॅलेंटाईन डेच्या पूर्व आठवड्यात प्रदर्शित होणारा ‘एक राधा एक मीरा’ हा प्रेमपट असा योग जुळून आला असल्याचं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितलं. ‘या चित्रपटातील मुख्य नायक हा शिक्षणासाठी परदेशात गेलेला असतो. बहुसंख्य चित्रपटांमधून ‘लंडन’ हे शहर प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे, त्यामुळे मला अपरिचित देशातली वेगळी जागा दाखवायची होती. यासाठी मी जवळपास पंधरा दिवस रेकी केली. पूर्व युरोपातील देशांचे सौंदर्यच वेगळे आहे. मी बल्गेरियापासून सुरू करून क्रोएशिया असं फिरत शेवटी स्लोव्हेनियामध्ये पोहोचल्यानंतर हा देश मला आवडला. त्यानंतर तिथे चित्रीकरण करायचे निश्चित केले. स्लोव्हेनिया देश इतका सुंदर आहे की तुम्हाला दीड तासांच्या प्रवासात बर्फातही जाता येते आणि समुद्रकिनारीही पोहोचता येते. काही चित्रीकरण इटलीतही केलं आहे. स्लोव्हेनियामध्ये चित्रिकरणासाठी विविध परवानगी घेताना कोणतेही अडथळे आले नाहीत, निर्मिती संस्था सहकार्य करणाऱ्या असल्यामुळे आव्हानात्मक असे काही वाटले नाही’, असं मांजरेकर यांनी सांगितलं.
लोक खूप शिस्तीचे…
‘प्रत्येक प्रांतात वा देशात चित्रीकरण करत असताना तिथले अनुभव तुम्हाला अधिक शिकवून जातात. स्लोव्हेनियातले लोक खूप शिस्तीचे आहेत आणि तितकेच देशाभिमानी आहेत. वेळेवर सेटवर येणं-जाणं, शांततेने, कोणावरही न ओरडता आपलं काम पूर्ण करणं अशा शिस्तीने ते वावरतात. एकदा तिथल्या एका महामार्गावर गाडीत आमचं चित्रीकरण सुरू होतं. आणि दृश्य संपल्यानंतर आम्ही गाडी तिथेच रस्त्याच्या कडेला लावली. तेव्हा आमच्याबरोबर सेटवर काम करणाऱ्या तिथल्या नागरिकाने सांगितलं की पुढच्यावेळी दृश्य संपल्यानंतर गाडी पुढे जिथे वळण रस्ता असतो तिथे थांबवा, असं महामार्गावर तुम्ही थांबू शकत नाही. चित्रीकरण सुरू असताना ही गोष्ट लक्षात राहायचीच असं नाही. आमच्याकडून आणखी दोनदा तसंच घडलं, तेव्हा त्याने येऊन सांगितलं की आता जर तुम्ही हा नियम पाळला नाही, तर आम्ही तुमच्याबरोबर काम करणार नाही. त्याची ती कृती मला इतकी मनाला भिडली की तिथे पोलिसांची वगैरे गरजच नाही, तिथले नागरिक स्वत: नियम पाळतात आणि तुम्ही नियम पाळत आहात की नाही यावरही तेच कटाक्षाने लक्ष ठेवतात. त्यामुळे तिथून भारतात परतल्यानंतर मी माझ्यापुरतं तरी नियमानेच वागायचा पक्का निर्धार केला.’ अशी आठवण गश्मीरने सांगितली.