‘चढती जवानी मेरी’ किंवा ‘दिलबर दिलसे प्यारे’ म्हणत प्रेक्षकांवर आपला ठसा उमटविणाऱ्या आणि नायिका, खलनायिका, चरित्र अभिनेत्री अशा विविध भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अरुणा इराणी दीर्घ कालावधीनंतर मराठीत पुनरागमन करत आहेत. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंगूमंगू’मध्ये अरुणा इराणी यांनी काम केले होते. आता त्यांची भूमिका असलेला ‘बोल बेबी बोल’ हा मराठी चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
१९६१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंगा जमुना’ या चित्रपटातून अरुणा इराणी यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले. त्यांची खरी जोडी मेहमूदबरोबर जमली. ‘कारवा’या चित्रपटातील ‘चढती जवानी’,  ‘दिलबर दिलसे’ या गाण्यांवरील त्यांच्या नृत्यांनी त्यांनी छाप पाडली. मराठीत अशोक सराफ यांच्यासोबत ‘चंगूमंगू’ चित्रपटात त्या होत्या. ‘बोल बेबी बोल’ या चित्रपटाची निर्मिती त्यांचे भाऊ बलराज इराणी यांनी केली असून दिग्दर्शन दिवंगत विनय लाड यांचे आहे. हा चित्रपट कौटुंबिक धमाल नाटय़ असून अरुणा इराणी यांच्यासह या चित्रपटात मकरंद अनासपुरे, अनिकेत विश्वासराव, नेहा पेंडसे, सिया पाटील आणि अन्य कलाकार आहेत. हा चित्रपट पुढील महिन्यात ६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
पदार्पणातील कलाकारांसाठी अरुणा इराणी ‘लकी’
हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या काही कलाकारांच्या बाबतीत अरुणा इराणी खूप ‘लकी’ ठरल्या आहेत. ज्यांनी आपल्या पदार्पणातील चित्रपटात अरुणा इराणी यांच्यासोबत काम केले ते पुढे ‘स्टार’ झाले आहेत. जीतेंद्र (फर्ज), ऋषी कपूर व डिम्पल कपाडिया (बॉबी), शबाना आझमी (फकिरा), जयाप्रदा (सरगम), कुमार गौरव (लव्हस्टोरी), संजय दत्त (रॉकी). या सर्व चित्रपटात अरुणा इराणी यांनी काम केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा