अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकला. त्यावेळी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहित आठ लोकांना अटक करण्यात आली. सोमवारी आर्यन खानसोबत अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धामेचा यांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान अरबाज मर्चंटचे वडील असलम मर्चंट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
असलम मर्चंट यांनी टाइम्स नाउला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. पेशाने वकील असलेल्या असलम यांनी म्हटले की, ‘सध्या या प्रकरणी तपास सुरु आहे. त्यामुळे यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही. एनसीबी अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे तसेच त्यांनी मुलांना चांगली वागणूक दिली आहे.’
पुढे ते म्हणाले, ‘एनसीबीच्या अधिकाऱ्यांची वागणूक खूप चांगली होती. एक वकील असल्यामुळे माझा भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सत्य सर्वांसमोर येईल आणि त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटो ठरतील.’ आर्यन आणि अरबाज पाहुणे म्हणून त्या क्रूझवर गेले होते असे देखील असलम यांनी म्हटले आहे. तसेच अरबाजने वडिलांकडून क्रूझवर जाण्यास परवानगी घेतली असल्याचे देखील सांगितले.
आर्यनच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आर्यन आणि शाहरुख खानच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. यामध्ये पूजा भट्ट, हंसल मेहता, नफीसा अली आणि सुझान खान यांच्या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर काही लोक आर्यनच्या अटकेला चुकीचे म्हणत आहेत. दुसरीकडे, आमचे कोणाशीही वैर नाही. जर कोणी बेकायदेशीर काम केले असेल, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, तो कोणीही असो, असे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.