प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना रविवारी अटक केली. यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने शाहरुख खानची भेट घेतली. यावेळी त्याने शाहरुखला धीर देण्याचा प्रयत्न केला. फक्त सलमान खान नव्हे तर अनेक सेलिब्रेटींनी शाहरुखला आधार देण्याचा प्रयत्न केला.
बॉलिवूडकरांकडून शाहरुखला धीर देण्याचा प्रयत्न
दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेक कलाकारांनी शाहरुखला फोन करत धीर देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण घटनेनंतर शाहरुखचा मित्र सलमान खान याने मन्नत बंगल्यात जाऊन त्याची भेट घेतली. रात्री जवळपास ११.३० वाजता सलमान खान शाहरुखच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्याने काळ्या रंगाची टी-शर्ट आणि टोपी घातली होती. यावेळी त्याने शाहरुखला धीर देण्याचा प्रयत्न केला. या दरम्यानचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
सलमान हा सध्या बिग बॉस १५ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र तरीही त्याने वेळात वेळ काढून शाहरुखची भेट घेतली. इतकंच नव्हे तर पुजा भट्ट, सुनिल शेट्टी, सुचित्रा कृष्णमुर्ती या कलाकारांनी शाहरुखला जाहीर समर्थन दिले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणानंतर #WeStandWithSRK असा टॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
#WeStandWithSRK सोशल मीडियावर ट्रेंड
अभिनेत्री पुजा भट्ट ही ट्वीट करत मी तुझ्या सोबत असल्याचे सांगितले आहे. “या कठीण प्रसंगी मी तुझ्यासोबत आहे. तुला याची गरज नसली तरी मला आहे. ही वेळही निघून जाईल,” असे ट्वीट पुजा भट्ट हिने केले आहे.
तर सुचित्रा कृष्णमुर्ती म्हणते, “अशाप्रकारे कोणाच्या मुलाला अडचणीत पाहून खूप वाईट वाटते. मनोरंजन विश्वातील लोकांचे जीवन कसे इतरांसाठी मनोरंजनाचे एक साधन बनले आहे, हे यातून स्पष्ट दिसत आहे. आजकाल जो कोणी बॉलिवूडवर निशाणा साधत आहे. एनसीबीकडून होणारी सर्व छापेमारी ही फक्त चित्रपट कलाकारांवरच होते. पण यातून काहीही साध्य होत नाही,” असा टोलाही तिने लगावला.
एएनआय वृत्तसंस्थेने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सुनील शेट्टीने नुकत्याच झालेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. “जेव्हा एखाद्या जागी धाड टाकण्यात येते, तेव्हा तिथे बरेच लोक असतात. म्हणून आम्ही असे गृहीत धरतो की या मुलाने ड्रग्स घेतले, या मुलाने हे केले. मला वाटते की प्रक्रिया चालू आहे, म्हणून ती तशीच ठेवा आणि त्या मुलाला श्वास घेण्यास वेळ द्या. जेव्हा आमच्या उद्योगात काहीही घडते, तेव्हा माध्यम लगेचच तुटून पडतात,” असे सुनील शेट्टी म्हणाला.
नेमकं प्रकरण काय?
आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर ‘एनसीबी’ने शनिवारी ही कारवाई केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले आहेत. सशयितांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा – आर्यन खानला मोठा दिलासा; NCB कोठडीची मुदतवाढ मागणार नसल्याची माहिती
‘एनसीबी’ने आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला, नवी मुंबईसह आणखी काही ठिकाणी शोधमोहीम राबवून संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली. यादरम्यान एकाला ताब्यात घेण्यात आले. रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या आठ जणांना ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील कार्यालयात आणले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आज दुपारी न्यायालयापुढे हजर करणार
अरबाज आणि आर्यन दोघेही एकाच खोलीत राहात होते. आर्यनवर सेवनाचा, तर उर्वरित दोघांवर अमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. जे. जे. रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून आर्यन, अरबाज आणि मूनमून धमेचा यांना सायंकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली. या तिन्ही आरोपींना सोमवारी दुपारी पुन्हा न्यायालायापुढे हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्यन खानसह मूनमून आणि अरबाज यांना रविवारची रात्र एनसीबीच्या कार्यालयातच घालवावी लागणार आहे.