मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला. न्यायालयाचा आदेश प्राप्त करण्यासाठी आर्थर रोड कारागृहातील बेल बॉक्स आज पहाटे ५.३० वाजता उघडण्यात आला. आर्यनला नेण्यासाठी शाहरुख खान जेलबाहेर उपस्थित होता. या संपूर्ण प्रकरणानंतर आर्यनच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळत आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात होता. त्यानंतर ८ ऑक्टोबरला त्याची रवानगी आर्थररोड जेलमध्ये करण्यात आली. तब्बल २६ दिवस आर्यन खान तुरुंगात होता. शुक्रवारी जामीन मंजूर झाल्यानंतर अखेर काल त्याची सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटका होताच आर्यन ‘मन्नत’वर पोहोचला. यावेळी खान कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पण या संपूर्ण धामधुमीत आर्यनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे.
आर्यन खानने घरी परतताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा डिस्प्ले फोटो हटवला आहे. आर्यन खानला अटक केल्यापासून त्याला जामीन मिळेपर्यंत त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा डिस्प्ले दिसत होता. मात्र तुरुंगातून घरी परतल्यानंतर त्या ठिकाणाहून फोटो काढून टाकला आहे. पण त्याने कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ डिलीट केलेले नाही. त्याचे सर्व फोटो पूर्वीप्रमाणेच दिसत असून त्याने फक्त इन्स्टाग्राम अकाऊंटचा डिस्प्ले फोटो काढल्याचे दिसत आहे.
आर्यन खानला ‘या’ ३ कठोर नियमांचे करावे लागणार पालन
दरम्यान, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला होता. शाहरुखची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी संध्याकाळी २३ वर्षीय आर्यनच्या जामिनासाठी ड्रग्जशी संबंधित खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टात हजर झाली. हायकोर्टाने शुक्रवारी आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.