बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचासह १४ दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. शाहरुख खानच्या मुलाचे नाव ड्रग्स प्रकरणात समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड एकजुटीने त्याला पाठिंबा देत आहे. आता प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांनीही शाहरुख खान आणि आर्यन खानला पाठिंबा दिला आहे.
आर्यन खानच्या अटकेनंतर काही बॉलिवूड सेलिब्रिटी शाहरुखच्या घरी गेले तर काहींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला पाठिंबा दिला. राज बब्बर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुखला पाठिंबा दिला आहे. त्यांनी एक ट्वीट करत शाहरुखला पाठिंबा दिला आहे. “तो आला लढला आणि त्याने विजय मिळवला. शाहरुखला बऱ्याच काळापासून ओळखत आहे, त्याच्या आत्म्याला या कठीण काळात थोडाही धक्का बसणार नाही. जसे जग त्याच्या लहान मुलाला त्या जखमांद्वारे शिकवते, मला खात्री आहे की योद्धाचा मुलगा नक्कीच परत लढेल. आशीर्वाद,” अशा आशयाचे ट्वीट राज यांनी केले आहे.
आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल
राज यांनी केलेले हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राज यांच्या आधी देखील अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखला पाठिंबा दिला आहे. यामध्ये शेखर सुमन, रवीना टंडन, फराह खान, हंसल मेहता, अभिषेक कपूर तसेच अनेक सेलिब्रिटींनी शाहरुख आणि गौरीच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत.
आणखी वाचा : “त्या दिवशी बाळासाहेब नसते तर…”, अमिताभ यांनी केला होता खुलासा
दरम्यान, आर्यन खानची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. त्याच्यासोबत इतर पाच आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले. पुढील १५ दिवस आर्यनला जेलमधील सर्व नियम पाळावे लागणार आहेत. येत्या पाच दिवस आर्यनचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे. यावेळी जेलमध्ये आर्यन खानला कोणतीही खास ट्रीटमेंट दिली जाणार नाही. त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वागवले जाईल. तसेच न्यायालयाच्या आदेशापर्यंत त्याला बाहेरचे काहीही अन्न मिळणार नाही. त्यांना फक्त तुरुंगाचे अन्न दिले जाणार आहे.