मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन दिला आहे. २४ दिवसानंतर मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी जाणार हे स्पष्ट झाले. दरम्यान, आर्यन खानला संध्याकाळी ६ च्या दरम्यान जामीन मिळाल्याची बातमी देण्यात आली. त्यानंतर आर्यन खान हा फार खूश पाहायला मिळाला. यावेळी आर्यनने जेल कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक चाहत्यांनी तर मन्नतसमोर येऊन फटाके फोडत आनंद व्यक्त केला. इतर ठिकाणी देखील हेच चित्र पाहायला मिळालं.
आर्थर रोड जेल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला संध्याकाळी ६ च्या दरम्यान जेवणावेळी जामीन मिळाल्याची खूशखबर देण्यात आली. यानंतर आर्यनच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. ही बातमी दिलेल्या अधिकाऱ्यांचे आर्यनने आभार मानले. गेल्या २० दिवसात आर्यन खानची बरॅकमधील काही कैद्यांशी ओळख झाली आहे. जामीन मिळाल्याची बातमी कळताच तो त्या कैद्यांकडे गेला आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन आर्यनने त्यांना दिले.
अखेर २४ दिवसांनंतर गौरी खानची ‘मन्नत’ झाली पूर्ण, शाहरुख करणार मुलासोबत वाढदिवस साजरा
आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यानंतर आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली. त्यावर रोहतगी यांनी पुन्हा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावला.
जामीन मिळूनही आर्यनला रात्र तुरुंगात काढावी लागणार
न्यायालयाने तिन्ही आरोपींना जामीन दिला असला तरी तो काल तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाही. न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याचं निकालपत्र आणि जामिनाच्या अटी यावर शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) अंतिम निर्णय होईल. यानंतरच तिघे तुरुंगाबाहेर येऊ शकतील.
आर्यनसाठी रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?
वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, “अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७ अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय.”