बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. शनिवारी २ ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने केलेल्या छापेमारीत आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले. तर दुसरीकडे अद्याप आर्यनला जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे येत्या २० ऑक्टोबरपर्यंत त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. दरम्यान एनसीबी कोठडीत असताना आर्यनने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना एक वचन दिल्याची माहिती समोर येत आहे. “मी यापुढे चांगले काम करेन आणि एक दिवस तुम्हालाही माझा अभिमान वाटेल,” असे वचन आर्यन खानने समीर वानखेडे यांना दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने केलेल्या छापेमारीमारीनंतर दोन ते तीन दिवस आर्यन हा एनसीबी कोठडीत होता. यावेळी त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याने ड्रग्जचे सेवन केले होते का? तो या पार्टीत कसा पोहोचला? यासह विविध प्रश्नांची सरबत्ती यावेळी करण्यात आली. यादरम्यान आर्यन खानने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना एक आश्वासन दिले आहे. “मी तुरुंगातून सुटल्यानंतर एक चांगला व्यक्ती होईन. तसेच मी जे कोणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, अशा लोकांना मदत करेन,” असे आर्यन म्हणाला. एनसीबी कोठडीत असतेवेळी एनसीओद्वारे त्याचे समुपदेशन करण्यात आले.
शनिवारी २ ऑक्टोबरला मध्यरात्री मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने छापेमारी केली. यावेळी आर्यन खानसह इतर सात जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सर्वांना अटक करण्यात आली. यानंतर आर्यन खानसह सर्व आरोपींना एनसीबी कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या आर्यन खान मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे.
२० ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम
दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने १४ ऑक्टोबरला आर्यन खानच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान आदेश राखून ठेवला आहे. येत्या २० ऑक्टोबरला याप्रकरणी पुन्हा सुनावणी केली जाणार आहे. त्यामुळे पुढील ३ दिवस त्याला आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाची १५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरदरम्यान सुट्टी असेल. विजयादशमीच्या निमित्ताने उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालय सलग ५ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे आर्यन खानला जामिनासाठी २० ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.