क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी मुंबईमध्ये काल तीन महत्वाच्या घडामोडी घडल्या. अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनच्या जामीन याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यापूर्वी सकाळीच शाहरुख आर्थर रोड तुरुंगामध्ये जाऊन आर्यनची भेट घेऊन आला. त्यानंतर अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी दुपारी अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी छापा घातला. नंतर एनसीबीच्या कार्यालयात तिची चौकशी करण्यात आली. सव्वादोन तासांच्या चौकशीनंतर तिला पुन्हा शुक्रवारी सकाळी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले. अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ही शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानाची चांगील मैत्रीण आहे हे त्यांच्या सोशल नेटवर्किंगवरुन स्पष्ट होतेच. मात्र त्याचवेळी शाहरुख आणि चंकी पांडेमध्येही खास नातं असल्याचं फारच कमी लोकांना ठाऊक आहे. या नात्याबद्दल शाहरुखनेच एका कार्यक्रमात भाष्य केलेलं
आर्यन, सुहाना आणि अनन्या चांगले मित्र असण्यामागील कारण आहे दोन्ही कुटुंबामधील कौटुंबिक जवळीक. शाहरुख आणि चंकी पांडे हे ८० च्या दशकापासून एकेमेकांचे चांगले मित्र आहेत. शाहरुखने अनेकदा चंकी आणि त्याच्या कुटुंबियांसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. त्याने अनेकदा जाहीर कार्यक्रमांमध्ये चंकीने सुरुवातीच्या काळात केलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानले आहेत.
‘इंडिया पूछेगा सबसे शाणा कौन’ हा रिअॅलिटी शो एकदा शाहरुखने होस्ट केलेला. २०१५ साली अॅण्ड टीव्हीवर या कार्यक्रमाचे २० भाग प्रसारित झालेले. एका भागामध्ये शाहरुखने चंकीसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलेलं. चंकी आपल्या कुटुंबाच्या एवढ्या जवळच्या व्यक्तींपैकी एक का आहे याबद्दल शाहरुख बोलला होता. शाहरुख आज स्वत:च्या जोरावर नाव कमावणारा सुपरस्टार असला तरी त्याला हे सारं फार कष्टाने मिळालेलं आहे. शाहरुखने करियरच्या सुरुवातीला फार स्ट्रगल केलं आहे. याच कालावधीमध्ये त्याला चंकी पांडेने मोठा आधार दिला होता. चंकी पांडेच्या मदतीमुळेच आज शाहरुख एवढा मोठा स्टार झालाय. शाहरुख नेहमीच चंकीने केलेल्या मदतीचा उल्लेख करत असतो. चंकीनेच शाहरुखला बॉलीवूडमध्ये येण्यासाठी मदत केलेली.
८० च्या दशकामध्ये मी जेव्हा मुंबईला आलो होतो तेव्हा चंकी पांडेने मला राहण्यासाठी जागा दिलेली, अशी आठवण या कार्यक्रमाच्यावेळी शाहरुखने सांगितलेली. सुरुवातीचे काही दिवस मी चंकीच्याच घरी राहिलेलो. इंडस्ट्रीमधील अनेक मित्रांशी चंकीने शाहरुखची ओळख करुन दिली. त्यावेळी चंकी पांडे हे इंडस्ट्रीमधील फार मोठं नाव होतं, असंही शाहरुख म्हणालेला. हे सारं सांगताना तो थोडा भावूकही झाल्याचं पहायला मिळालं.
शाहरुख आणि चंकीची मैत्री फार वर्षांपासून आहे. या दोघांचीही मुलं एकमेकांचे चांगले मित्रमैत्रिणी आहेत. यांची मुलं एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखतात. अनेकदा हे लोक पार्ट्या, पिकनिकला एकत्र दिसतात. चंकीची पत्नी भावना आणि गौरी खानसुद्धा चांगल्या मैत्रिणी आहेत. ‘फॅब्युलस लाइव्ज ऑफ बॉलिवूड वाइव्ज’ या वेब सिरीजमध्ये गौरी आणि भावना एकत्र झळकल्या होत्या.