प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना रविवारी अटक केली. एनसीबीकडून आर्यनची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान आर्यन हा गेल्या ४ वर्षापासून ड्रग्जचे सेवन करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, एनसबीच्या अधिकाऱ्यांनी कालपासून आर्यनसह इतर आठ जणांची कसून चौकशी करत आहे. यावेळी आर्यनवर अनेक प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. यावेळी आर्यन हा गेल्या ४ वर्षापासून ड्रग्जचे सेवन करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. आर्यनने फक्त भारतातच नाही तर यूके आणि दुबईसह इतर देशात ड्रग्सचे सेवन केले होते, अशी माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे.

विशेष म्हणजे आर्यन आणि अरबाज हे गेल्या १५ वर्षांपासून मित्र आहेत. ‘आजतक’ला एनबीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खानने मुलगा आर्यन खानशी फोनवर संवाद साधला. जवळपास दोन मिनिटे आर्यनने वडील शाहरुखशी संवाद साधला. दरम्यान आर्यनला रडू कोसळल्याचे म्हटले जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर ‘एनसीबी’ने शनिवारी ही कारवाई केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले आहेत. सशयितांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा – आर्यन खानला मोठा दिलासा; NCB कोठडीची मुदतवाढ मागणार नसल्याची माहिती

‘एनसीबी’ने आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला, नवी मुंबईसह आणखी काही ठिकाणी शोधमोहीम राबवून संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली. यादरम्यान एकाला ताब्यात घेण्यात आले. रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या आठ जणांना ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील कार्यालयात आणले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आज दुपारी न्यायालयापुढे हजर करणार

अरबाज आणि आर्यन दोघेही एकाच खोलीत राहात होते. आर्यनवर सेवनाचा, तर उर्वरित दोघांवर अमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. जे. जे. रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून आर्यन, अरबाज आणि मूनमून धमेचा यांना सायंकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली. या तिन्ही आरोपींना सोमवारी दुपारी पुन्हा न्यायालायापुढे हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्यन खानसह मूनमून आणि अरबाज यांना रविवारची रात्र एनसीबीच्या कार्यालयातच घालवावी लागणार आहे.

यानंतर काही तासांनी शाहरुख खान आर्यनशी फोनवर बातचीत केली. आर्यनच्या अटकेनंतर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून एनसीबीने त्याला शाहरुखशी २ मिनिट फोनवर बोलण्यास मुभा दिली होती. यावेळी आर्यनला रडू कोसळले.