दुलकर सलमान, मृणाल ठाकूर आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सिता रामम्’ हा तेलुगू चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवरही या दाक्षिणात्य चित्रपटाने चांगली कमाई केली. ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षाबंधन’ अशा बिगबजेट चित्रपटांऐवजी लोकांना ‘सिता रामम्’ चित्रपट पाहायला गर्दी केली. हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची वाढती लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदीमध्ये डब करुन २ सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला.
‘सिता रामम्’ ही भारतीय सैन्यातील एका जवानाची प्रेमकथा आहे. या चित्रपटामध्ये दुलकर सलमानने लेफ्टनंट रामची व्यक्तिरेखा साकारली आहे. मराठमोळ्या मृणाल ठाकूरने सीता महालक्ष्मीचे पात्र साकारले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. दुलकर सलमान आणि मृणालच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हनु राघवपुडी यांनी केले आहे. रश्मिका मंदाना, सचिन खेडेकर, प्रकाश राज, मुरली शर्मा असे तगडे कलाकारही या चित्रपटामध्ये आहेत.
या चित्रपटाची निर्मिती वैजयंती मूव्हीज यांनी केली आहे. सिता रामम् चित्रपट प्रदर्शित होऊन आज ५० दिवस झाले आहेत. हे निमित्त साधत निर्मात्यांनी चित्रपटामधील प्रदर्शित न केलेल्या एका दृश्याचा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे. लेफ्टनंट राम पाकिस्तानमधील तुरुंगामध्ये असतानाचा हा दिड मिनिटांचा व्हिडीओ आहे. यात राम, त्याचा साथीदार विष्णू शर्मा या दोघांना शिक्षा देण्यापूर्वी तुरुंगातून बाहेर काढले जाते आणि ते दोघेही मैदानावर सुरु असलेल्या खेळात सामील होतात असे दाखवले आहे. निर्मात्यांनी या व्हिडीओची माहिती ट्वीटकरुन चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
आणखी वाचा – लक्षवेधी सजावट, जंगी पार्टी अन्…; बिपाशा बासूने दुसऱ्यांदा केला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम
दरम्यान २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांच्या ‘वीर जारा’ चित्रपटामध्ये आणि ‘सिता रामम्’ या चित्रपटामध्ये बऱ्याच गोष्टी समान आहेत असे म्हटले जात आहे.