‘प्यार किया नाही जाता, हो जाता है’ असं म्हणतात. नकळत कधीतरी, कुठेतरी, कुणीतरी आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात घरं करू लागतं, त्याच्या किंवा तिच्या विचारांनी मनं घेरून जातं मग कुठे ध्यानात येतं कि आपण प्रेमात पडलोय. पण अशा या प्रेमात अनेक टिविस्ट येतात, कधी हे प्रेम अव्यक्तच राहतं, तर कधी तिसऱ्याच्या एण्ट्रीने प्रेमाचा त्रिकोण तरी होतो. प्रेमाची अशीच एक आगळीवेगळी कहाणी असलेला पारस मुव्हीज प्रस्तुत ‘असा हा अतरंगी’ हा मराठी चित्रपट २८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
प्यारेलाल चौधरी यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केले आहे. चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे जगन्नाथच्या मध्यवर्ती भूमिकेत असून प्रियांका यादव नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मकरंद अनासपुरे, प्रियांका यादव, विकास पाटील, प्रमोद पवार, किशोर महाबोले, प्रतिभा भगत या कलाकारांनी ‘असा हा अतरंगी’ मध्ये भूमिका साकारल्या आहेत. हृदयस्पर्शी प्रेमकथेवरील असा हा अतरंगी २८ मार्चपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.