यंदा पाऊस आणि आशा भोसले एकदमच बरसल्या. आशाबाईंचे शाब्दिक फटकारे चित्रपटसृष्टीला नवीन नाहीत, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नवीन गाण्यांमधील सवंगपणावर हल्लाबोल केला. ‘हलकट जवानी’सारख्या गाण्यांचा त्यांनी यथेच्छ समाचार घेतल्यानंतर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. दुर्दैव हे की या टीकेनंतरही नवीन कलाकार काही शिकण्याच्या मूडमध्ये नाहीत.
आशाबाई या जेवढय़ा चतुरस्र गायिका आहेत, तेवढय़ाच त्या अनाकलनीय व अतक्र्यही आहेत. त्या कधी, कुठे, काय बोलतील याचा नेम नसतो. मनात येईल ते बोलून त्या मोकळ्या होतात. अनेकदा त्यातून वाद होतात, काही जण दुखावले जातात, मात्र बाई पर्वा करत नाहीत (त्यांचं आत्मचरित्र लवकरच येऊ घातलाय म्हणे.. एरव्ही एवढं स्फोटक बोलतात, या पुस्तकात काय काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी. हे पुस्तक येऊ नये म्हणून अनेकांनी देवही पाण्यात बुडवून ठेवले असतील.)
परवा दिल्लीत एका कार्यक्रमात त्यांनी नेहमीच्या रोखठोक शैलीत सध्याच्या गाण्यांमधील हीन भाषेचा समाचार घेतला. ‘हिरॉईन’ हा काही नवा सिनेमा नाही, मात्र कसा काय विषय निघाला, बाई त्यातल्या ‘हलकट जवानी’वरच घसरल्या. ‘हलकट जवानी’ हे काय शब्द आहेत, मला अशा गाण्याची ऑफर मिळाली असती तर मी ते मुळीच गायलं नसतं, आजकालच्या गाण्यांमध्ये सर्रास शिव्याही असतात, अनावश्यकपणे इंग्लिश शब्दही घुसडले जातात. ‘झंडू बाम, फेव्हिकॉल’ ही काय गाणी आहेत, लोकंही आनंदाने ती ऐकतात, याचं आश्चर्य वाटतं. आमच्या ओळखीतल्या एका लहान मुलाच्या तोंडी ‘हलकट जवानी’ हे गाणं ऐकलं तेव्हा मला धक्काच बसला….आशाबाईंचा पट्टा सुरू होता, माध्यमांना नवा मसाला मिळाला. बाईंच्या विधानावर वाद-प्रतिवाद सुरू झाले. काहींचा आक्षेप असा होता, की ही टीका करण्याचा यांना अधिकार आहे का, यांनी अशी गाणी गायली नाहीत का ..वगरे वगरे.
असा एकांगी आक्षेप घेऊन मूळ मुद्दय़ाला बगल दिली जात आहे. मंगेशकर भगिनी जेव्हा शिखरावर होत्या तेव्हा सोज्वळ गाणी लतादीदींना आणि दुय्यम किंवा व्हँम्पच्या तोंडी असणारी गाणी आशाबाईंना अशी सरळ सरळ विभागणी झाली होती. त्यामुळे नायक-नायिकेच्या प्रेमात विष कालवण्यासाठी आतूर असलेल्या िबदू, हेलन, पद्मा खन्ना आदी मदनिकांसाठी आशाबाईंचाच आवाज वापरला जात असे. या मदनिकांची वेशभूषा कशी असे, हे वेगळं सांगायला नको. ‘हुस्न के लाखो रंग, कौनसा रंग देखोगे’ (जॉनी मेरा नाम), ‘पिया तू अब तो आजा’ (कारवाँ), ‘आजकी रात’ (अनामिका), ‘आओ ना गले लगाओना’ (मेरे जीवनसाथी) आदी गाण्यांमधले शब्दही उत्तेजक होते.
आशाबाई आज त्या गाण्यांना बोल्ड म्हणतायत, मात्र त्या गाण्यांना तेव्हाही अनेकांनी नाकं मुरडली होतीच. चित्रीकरण राहिलं दूर, लतादीदी तर गाण्यांच्या शब्दांबाबत सजग असत. ‘मैं का करू राम’ (संगम) या गाण्यातील ‘बुढ्ढा मिल गया’ या शब्दांवर त्यांनी आक्षेप घेतला होता, तर ‘आँखों आँखों में’ मधल्या ‘गया बचपन लो आयी जवानी’ या गाण्यातले खटकलेले शब्द त्यांनी ऐनवेळी बदलण्यास भाग पाडले (सवंग चित्रीकरण होणार नाही, याची हमी मिळाल्यानंतर त्या ‘आ जाने जाँ’, हे ‘इंतकाम’मधलं कॅब्रे गायल्या, लतादीदींचं ते त्या प्रकारचं एकमेव गाणं आहे.) आपल्याला पर्याय नाही, याची पूर्ण जाणीव असल्याने लतादीदी एवढी ठाम भूमिका घेऊ शकल्या आणि दीदींच्या स्पध्रेत टिकायचं तर मिळतील ती गाणी गायची, अशी आशाबाईंची स्थिती असल्याने त्यांना त्या प्रकारची गाणी गावी लागली. अर्थात तरीही, ती कॅब्रेसदृश गीतं आणि सध्याची झंडुगीतं यांची तुलना होऊ शकत नाही. याचं पहिलं कारण म्हणजे तेव्हा नायिकेला पदराचं भान होतं, (तेव्हाच्या ‘बोल्डनेस’च्या व्याख्येनुसार) अंगप्रदर्शन करण्यासाठी वर उल्लेख केलेल्या व्हँम्पची फौज होती, आणि विशेष म्हणजे, या मदनिकांचं कोणी समर्थन करत नसे, प्रेक्षक त्यांच्या नावाने बोटं मोडत असत. सध्याचं चित्र काय आहे, अंगप्रदर्शन करण्याची जबाबदारीही कतरिना, दीपिका, सोनाक्षी, करिना आदी नायिकांनी हसतमुखाने स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांच्यावर चित्रित होणारी गाणीही तशीच आणि आयटम नंबर नावाचा जो हिणकस प्रकार रुजला आहे. संगीतप्रवाह काळानुरूप बदलले असं मान्य केलं तरी हा बदल काही पचनी पडणारा नाही. ती गाणी लिहिणारे, संगीत देणारे, गाणारे सगळेच प्रतिभावान व गुणी होते. ती गाणी उगाच सदाबहार नाही ठरली. इकडे सगळाच आनंदीआनंदच आहे.
प्रतिभा आणि दर्जा यामध्ये झालेली ही घसरण कुठवर जाणार आहे, हे कळेनासं आहे. गीतकार-संगीतकार म्हणतायत दिग्दर्शकाच्या मागणीनुसार आम्ही गाणी (?) देतोय, तशी गाणी आम्ही दिली नाही तर आणखी कोणीतरी देईल. दिग्दर्शक म्हणतायत, सध्या हाच ट्रेंड आहे, पब्लिकला अशी गाणी आवडतात..आणि गाण्यांचा सुवर्णकाळ जगलेल्या आशाबाईंना प्रश्न पडलाय, ‘ये क्या जगह है दोस्तों, ये कौनसा दयार है…’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा