आपली १२ वर्षांची नात जनाई हिने गायनाच्या क्षेत्रात आपल्यासारखेच नाव कमवावे, ही आपली इच्छा असून त्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे, असे ख्यातनाम पाश्र्वगायिका आशा भोसले यांनी सोमवारी येथे सांगितले.
जनाई ही आशाताईंचे चिरंजीव आनंद यांची कन्या असून सन २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘माई’ या चित्रपटातही तिने गाणी गायली आहेत. याखेरीज या वर्षी तिने आपल्या आजीसमवेत, आशाताईंसमवेत स्टेज शोही केला होता.
माझ्या आयुष्यात मला जे जे करायचे होते, ते सर्व काही केले आहे. गायन, अभिनय, टीव्ही शो, स्टेज शो अगदी अलीकडेच फॅशन शोमध्ये रॅम्पही केला असल्याचे सांगत आशाताईंनी पुढच्या पिढीतील माझ्या नातीने एक गायिका म्हणून नाव कमवावे, अशी आपली मनोकामना असल्याचे नमूद केले. जनाईच्या आवाजात आपण आणि लतादीदींच्या आवाजाचे मिश्रण झाले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘यंग फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ या संस्थेने येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आशाताई बोलत होत्या. या संस्थेने त्यांचा सत्कारही केला. आशा भोसले यांनी अलीकडच्या चित्रपट संगीतावर आपली परखड मते मांडली. ‘हलकट जवानी’, ‘मुन्नी बदनाम’, ‘लुंगी’ यांसारखी गाणी ऐकली की संताप येतो. आजकाल आयटम सॉँग्ज ही एक फॅशनच झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
लता मंगेशकर, शमशाद बेगम, नूर जहाँ, गीता दत्त यांच्यासारख्या गायिका चित्रपटसृष्टीत चांगल्यापैकी स्थिरावलेल्या असताना, आपल्याला प्रारंभीच्या काळात कमालीचे कष्ट पडले होते, असे सांगत आपण आपल्या गाण्याची शैली म्हणूनच बदलली आणि त्यामधूनच वेगळ्या शैलीतील ‘इना मिना डिका..’ हे गीत आपण प्रथम गायले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha bhosle wants to groom granddaughter as playback singer