गेल्या साठ वर्षांपासून अगदी आजपर्यंत रसिकांच्या मनावर आपल्या आवाजाचे गारुड करणाऱ्या गायिका आशा भोसले यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनपूर्तीच्या निमित्ताने मुंबईत पुन्हा एकदा आशा भोसले यांच्या सुरेल आवाजाची जादू संगीतप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. रविवार, १४ सप्टेंबर रोजी मुंबईत षण्मुखानंद सभागृहात आशा भोसले यांच्या ‘म्युझिकल लाइव्ह शो’चे आयोजन करण्यात आले आहे.
विविध भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन आशा भोसले यांनी विश्वविक्रम केला आहे. त्यांनी २० भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षांत पदार्पण केलेल्या आशा भोसले यांच्या आवाजाची जादू आणि त्यांनी गायलेली आणि गाजलेली हिंदी गाणी त्यांच्याच आवाजात ऐकण्याचा योग रसिकांसाठी जुळून आला आहे. पीपल्स आर्ट सेंटरतर्फे गोपकुमार पिल्लई यांच्या अध्यक्षतेखाली या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात सुदेश भोसले हे आशा भोसले यांना काही गाण्यांना साथ करणार आहेत. कार्यक्रमात केरळ येथील कारागिरांनी खास तयार केलेली समई आशा भोसले यांना प्रदान केली जाणार आहे. या समईची उंची साडेतीन फूट आणि वजन ६५ किलो इतके आहे. समईत नऊ थर असून प्रत्येक थरात नऊ अशा एकूण ८१ ज्योती असणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा