भक्ती परब

आशा पारेख हे नाव उच्चारलं की, ‘दिल देके देखो’, ‘तिसरी मंझिल’, ‘कटी पतंग’ असे चित्रपट आणि ‘ओ मेरे सोना रे सोना’, ‘सुनो सजना’, ‘जाईये आप कहा जायेंगे’, ‘सायोनारा’ अशी सदाबहार गाणी आपल्या ओठांवर येतात. कलाकाराचा चेहरा बोलका असावा लागतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आशा पारेख. आजही त्या बॉलीवूडमधील नवोदितांच्या बरोबरीने वावरताना दिसतात, कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात. त्यांना नुकतेच बिमल रॉय स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त त्यांच्याशी झालेला संवाद.

अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा होती म्हणून नव्हे, तर लहानपणापासून नृत्याची आवड होती म्हणून शास्त्रीय नृत्य शिकायला सुरुवात केली. तेव्हा रंगमंचावर रेकॉर्ड डान्स करायचे. एकदा आमच्या शाळेत कार्यक्रम होता. त्यासाठी प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रेमनाथजींना येण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, आशा नृत्य करणार असेल तर मी जरूर येईन. कारण त्यांनी माझं नृत्य पाहिलं होतं. तेव्हा मी ८-९ वर्षांची असेन. शाळेच्या कार्यक्रमात प्रेमनाथजी नृत्य बघायला येणार म्हणून आईने मोहनलाल यांच्या मदतीने सात दिवसांत एका गाण्यावर माझं नृत्य बसवून घेतलं. तेव्हापासून मला रंगमंचावर नृत्य करण्याची ओढ होती. एका बाजूला माझं शालेय शिक्षण सुरू होतं; पण नृत्य करणंही दुसऱ्या बाजूला सुरू असायचं. एके ठिकाणी रंगमंचावर नृत्य सादरीकरण करताना बिमलदांनी मला पाहिलं आणि चित्रपटात काम करशील का? अशी विचारणा केली. मी हो म्हटले आणि छोटीशी भूमिका केली.

अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये प्रवेश करणं सोपं होतं की कठीण? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, त्या काळातही बॉलीवूडमध्ये प्रवेश करणं सोपं नव्हतं. सहज शक्यही नव्हतं. बालकलाकार म्हणून तीन-चार चित्रपटांच्या बळावर बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर निर्माता, दिग्दर्शक, लेखक विजय भट यांच्या ‘चैतन्य महाप्रभू’मध्ये मी काम केलं असल्यामुळे त्यांनी एका चित्रपटासाठी नायिका म्हणून बोलावलं होतं; पण तेव्हा त्यांनी ज्या भूमिकेसाठी बोलावलं होतं, त्या भूमिकेसाठी योग्य नाही वाटले, त्यामुळे त्यांनी नकार दिला. तेव्हा थोडीशी निराश झाले होते; पण सकारात्मक विचार केला तर पुन्हा चांगली संधी मिळतेच. तशा पुढे एकेक चांगल्या संधी मिळत गेल्या. चित्रपटाच्या सेटवर कुटुंबासारखं वातावरण असायचं. तेव्हा ‘व्हॅनिटी व्हॅन’ असले प्रकार नव्हते. आम्ही सेटवरच पटकथा वाचत बसायचो. एकमेकांशी गप्पा, मस्ती, मजा चालायची. सहकलाकारांसोबत तालीम करणं ही शिस्त होती. एखाद्या भूमिकेसाठी माझी निवड झाली, की ही भूमिका मी कशा पद्धतीने करू शकते, याबद्दल एक प्रकारचा दृश्यात्मक विचार करायचे. साधारण अशा पद्धतीने ही व्यक्तिरेखा वागेल, बोलेल असा तो विचार असायचा. ‘चिराग’ चित्रपटात मला अंध नायिकेची भूमिका साकारायची होती. तेव्हा खूप मेहनत घेतली होती. अंध मुलांच्या शाळेत जाऊ न तिथे मुलं कशी वावरतात ते पाहिलं, निरीक्षण केलं. हे आव्हान होतं; पण तो चित्रपट हिट झाला नाही, याची मनात खंत आहे.

आमच्या काळातील सगळे दिग्दर्शक एखाद्या मार्गदर्शकासारखे होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच काम करणं शक्य झालं. एस.एस. वासन यांच्याबरोबर काम केलं. ते खूपच थोर दिग्दर्शक होते. जेव्हा गुरू दत्त यांच्याबरोबर ‘भरोसा’मध्ये काम केलं. ते सहअभिनेता होते; पण चित्रपटाचे दिग्दर्शक अचानक आजारी पडले. तेव्हा गुरू दत्त यांच्यावर जबाबदारी आली की, तुम्ही काही दृश्य दिग्दर्शित करा, कारण कलाकारांच्या तारखा नव्हत्या. मद्रासहून आम्हाला परत यायचं होतं. गुरू दत्त एखादं दृश्य चित्रित करताना कलाकारांना समजावून सांगत. मी हे दृश्य असं का चित्रित करतोय त्याबाबत आणि कॅमेऱ्याविषयीसुद्धा सांगायचे. त्या वेळच्या गाण्यांच्या सादरीकरणावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, ‘लो आ गयी उनकी याद’, ‘दैया रे दैया कहा आ फसी’ अशी विविध भावभावना व्यक्त करण्याची संधी देणारी ती गाणी होती. त्यामुळे गाण्यात वर्णन केलेल्या भावानुसार आम्ही व्यक्त व्हायचो. तशी कल्पना करायचो की, आपण त्या वेळी तसे आहोत. नृत्य दिग्दर्शक मा. सुरेश यांच्यासोबत काम करताना खूप शिकायला मिळालं. त्यांचं सर्जनशील व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्याबरोबर खूप चित्रपट केले असल्यामुळे नृत्य करताना छान सूर जुळायचे. एखादं आनंदी, गमतीशीर गाणं अभिनीत करताना त्या भावनेची मजा घेत त्याचं सादरीकरण व्हायचं. माझ्यावर चित्रित झालेली लोकप्रिय गाणी आशा भोसले यांच्या आवाजातील आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत गाण्याचे ध्वनिमुद्रण करताना गप्पा व्हायच्या.

अभिनय क्षेत्रातील त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वांविषयी त्या म्हणाल्या की, दिलीपकुमार, राज कपूर आणि वैजयंतीमाला माझे आदर्श आहेत. ते मला खूप आवडायचे. राज कपूर यांच्या अभिनय कौशल्याने मी भारावून जायचे. त्यांचं चेहऱ्यातून भाव व्यक्त करणं लाजवाब होतं. मी त्यांच्याबरोबर एकच चित्रपट केला; परंतु दिलीपकुमार यांच्याबरोबर काम करायला मिळालं नाही याची खंत आहे. वैजयंतीमाला यांच्याबरोबर मी ‘आशा’ चित्रपटात काम केलं होतं. त्यात मी त्यांच्याबरोबर नृत्यही केलं होतं. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रभावी होतं. शम्मी नावाची विनोदी अभिनेत्री माझी खूप चांगली मैत्रीण होती. ती एकदा वाढदिवसादिवशी मला म्हणाली, की तुला आश्चर्याचा धक्का देणार आहे आणि त्या दिवशी वैजयंतीमाला माझ्या घरी आल्या.

मराठी कलाकारांशीही माझी छान मैत्री जुळली आहे. माझ्या पहिल्या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्यासमवेत मला काम करण्याची संधी मिळाली. त्या खूप प्रेमळ आहेत. मराठी चित्रपटांविषयी मला जिव्हाळा आणि आवड असून अलीकडे प्रदर्शित झालेले काही मराठी चित्रपट मी पाहिले आहेत. फक्त ‘नाळ’ चित्रपट पाहायचा राहिलाय. चित्रपटसृष्टीत असतानाचा काळ भरभरून जगले आणि आजही मागे वळून पाहताना मी त्याबद्दल खूप समाधानी आहे, असे सांगत त्यांनी गप्पांचा समारोप केला.

आजच्या काळातील कलाकारांवर आमच्यापेक्षा जास्त ताणतणाव आहे. एखादा चित्रपट हिट झाला नाही तर त्या अपयशाशी सामना करणं, आजच्या काळात त्यांना खूप अवघड जातं. मी आजच्या काळात असते तर हा ताण सहन करू शकले नसते. कारण दृश्यमाध्यमे, मुद्रितमाध्यमे आणि तसेच समाजमाध्यमे यांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे कलाकार त्यांचं अस्तित्व सतत दाखवून देण्याच्या प्रयत्नात त्यांचं स्वातंत्र्य हिरावलं जातं. आजच्या कलाकारांना आमच्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागते. कारण चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर त्याचे प्रमोशन (प्रसिद्धी) करण्यासाठीसुद्धा त्यांना मेहनत घ्यावी लागते. प्रसिद्धीसाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात.

आशा पारेख

Story img Loader