‘काश्मीर फाईल्स’ या सिनेमाची चांगलीच चर्चा झाली होती. काही विशिष्ट लोकांनी हा सिनेमा म्हणजे प्रपोगंडा फिल्म आहे अशीही टीका केली होती. मात्र काश्मीर फाईल्स या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. काश्मिरी पंडितांना काय काय सहन करावं लागलं? बिट्टा कराटेने कसे अत्याचार केले? या सगळ्यावर या चित्रपटांत भाष्य करण्यात आलं होतं. या सिनेमाबाबत आता ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी परखड भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशा पारेख काय म्हणाल्या काश्मीर फाईल्सबाबत?

‘द केरला स्टोरी’, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटांवरुन बराच गदारोळ, वाद झाला. त्याविषयी काय वाटतं? असं विचारलं असता आशा पारेख म्हणाल्या, “मी हे चित्रपट पाहिले नाहीत त्यामुळे त्यावर भाष्य करु इच्छित नाही. असे चित्रपट लोकांना आवडत असतील तर त्यांनी ते बघावेत.” कश्मीर फाईल्स हिट सिनेमा होता, लोकांना आवडला त्याबाबत काय वाटतं? हे विचारलं असता आशा पारेख म्हणाल्या, “होय लोकांनी तो सिनेमा पाहिला. मी थोडं वादग्रस्त वक्तव्य करते. या सिनेमाच्या निर्मात्याने ४०० कोटी कमवले. त्यांनी काश्मिरी पंडितांना, हिंदूंना ज्यांच्याकडे पैसे नाहीत, पाणी नाही त्यांना यातले किती पैसे दिले?, चला आपण असं समजू की चारशे कोटीमधले सगळे पैसे काही त्यांना मिळाले नसतील. २०० कोटी खर्च, इतरांची कमाई यात गेले असतील. २०० कोटी कमवले असतील. त्यातले ५० कोटी तरी काश्मिरी हिंदूंना, जे आत्ता हाल सहन करत राहात आहेत त्यांना दिले का? “

काश्मीर फाईल्सच्या निर्मात्यांना आशा पारेख यांनी तुम्ही काश्मिरी पंडितांसाठी काय केलंत? ५० कोटी रुपये तरी देऊ शकला असतात ना? असा प्रश्न विचारला आहे. आता यानंतर सिनेमा दिग्दर्शक आणि निर्माता विवेक अग्निहोत्री ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्या या परखड प्रश्नाचं उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आशा पारेख यांनी News 18 हिंदीला काही वेळापूर्वी एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हे भाष्य केलं आहे. आता आशा पारेख यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होणार असं दिसतं आहे. कारण सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याची क्लिप व्हायरल झाली आहे. आशा पारेख यांनी धाडस दाखवलं असं काही युजर्स म्हणत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha parekh slams the kashmir files producers asks how much money did they give for welfare of hindus living in jammu and kashmir scj