अभिनेता संदीप पाठकने चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये हटके भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंस करुन घेतलं. त्याने आपल्या कलेच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संदीप कलाकार म्हणून उत्तम आहेच. पण त्याचबरोबरीने एक व्यक्ती म्हणून देखील तो सगळ्यांचं मन जिंकून घेतो. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे संदीपने पंढरीच्या वारीमध्ये सहभाग घेतला आहे. इथे तो वारकऱ्यांबरोबर पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रमला आहे.
आणखी वाचा – अभिमानास्पद! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील दत्तू मोरेच्या ठाण्यातील चाळीला दिलं त्याचच नाव, अभिनेता म्हणतो…
आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं. अलंकापुरीहून वारकऱ्यांसोबत इंद्रायणी ते चंद्रभागा असा संदीपचाही प्रवास सुरू झाला. या वारीमध्ये तो प्रत्येक वयोगटातील वारकरी मंडळींना आवर्जुन भेटत आहे. इतकंच नव्हे तर त्यांचा आशिर्वाद देखील घेत आहे. संदीपने वारीदरम्यानचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
कपाळाला गोपीचंदन टिळा, हातात भगवी पताका, डोक्यावर वारकरी टोपी आणि सदरा असा संदीपचा लूक पाहायला मिळत आहे. या प्रवासात एकीकडे संदीपला बालवारकरी भेटत आहेत, तर दुसरीकडे नव्वदी गाठत आलेल्या ज्येष्ठ वारकऱ्यांचा आशीर्वाद मिळत आहे. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारीत चालणाऱ्या महिला वारकरी संदीपच्या मुखावरून हात फिरवत प्रेम देत आहेत. ‘माऊली, माऊली’च्या गजरात भक्तीमय झालेल्या वातावरणात संदीपही रमून गेला आहे.
आणखी वाचा – Photos : भाऊ कदमच्या लेकीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?, दिसते फारच सुंदर
इंदापुरमध्ये डोळ्याचं पारणं फेडणारा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा ही संदीपनं अनुभवला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणत जेजुरीमध्ये संदीपनं बेल भंडारा उधळला. संदीपला या वारीमध्ये वारकऱ्यांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. तसेच चाहत्यांना निराश न करता त्यांच्याबरोबर तो फोटो देखील काढताना दिसत आहे. वारकऱ्यांचं आपल्यावर असणारं प्रेम पाहून संदीप अगदी भारावून गेला आहे.