आपल्या विविधरंगी भूमिकांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे सर्वांचे लाडके अशोक मामा म्हणजेच अभिनेता अशोक सराफ आज ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अशोक सराफ यांनी केवळ चित्रपटच नाही तर अनेक नाटकांमध्येही उत्तम भूमिका साकारल्या आहेत. अशोक सराफ यांची त्यांच्या कामावर किती निष्ठा आहे हे ‘व्हॅक्यूम क्लिनर’ या नाटकाची तालीम सुरू असताना दिसून आलं. याचा एक किस्सा दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरनं शेअर केला होता. पाठीत वेदना असूनही ते नाटकाची तालीम करत होते असं एका मुलाखतीत चिन्मय म्हणाला होता. पण त्यावेळी अशोक सराफ यांनी असं का केलं याचं कारण त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत सांगितलं.
अशोक सराफ एक उत्तम कलाकार तर आहेतच पण यासोबत ते एक उत्तम व्यक्ती देखील आहेत. काम करत असतानाही आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याचा विचार ते नेहमी करतात हे हा किस्सा वाचल्यावर लक्षात येतं. चिन्मय मांडलेकरनं त्याचं नाटक ‘व्हॅक्यूम क्लिनर’च्या तालीम सुरू वेळी घडलेला प्रसंग एका मुलाखतीत सांगितला होता. तो म्हणाला, “त्यावेळी नाटकची तालीम जोरदार सुरू होती आणि मामांचा उत्साह पाहण्याजोगा होता. अनेक तरूण कलाकारांना लाजवेल अशा उत्साहात ते तालीम करत होते.”
चिन्मय पुढे म्हणाला, “आम्ही तालीम करत होतो. पण अचानक एके दिवशी मला मामांच्या वागण्यात बदल जाणवू लागला. मी त्यांना कारण विचारलं पण त्यांनी टाळाटाळ केली. नंतर न राहवून मी त्यांच्या ड्रायव्हरला विचारलं तर तो म्हणाला की त्यांच्या पाठीत प्रचंड वेदना होत आहे. असं त्यांना बरेचदा होतं आणि त्यासाठी ते एक विशिष्ट बाम वापरतात. पण आज त्यांनी तो लावलेला नाही. एवढ्या वेदना होत असतानाही ते त्यांचं काम करत आहेत.”
यानंतर एका मुलाखतीत अशोक सराफ यांना यामागचं कारण विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले, “मला पाठदुखीची समस्या आहे आणि त्यासाठी मी जो बाम वापरतो त्याला फारच उग्र वास येतो. ज्यामुळे इतरांना काम करताना समस्या आली असती किंवा ते माझ्यामुळे काही न बोलता तो उग्र वास सहन करत राहिले असते. पण मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता त्यामुळे मी त्यावेळी वेदना होत असतानाही काम करत राहिलो.” त्यावेळी अशोक सराफ यांचं उत्तर ऐकून सर्वच भावुक झाले होते. यावरून अशोक सराफ एक उत्तम व्यक्तीमत्त्व का आहेत हे स्पष्ट होतं.