Ashok Saraf Birthday Special: विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या अभिनेता अशोक सराफ यांचा आज ७५ वा वाढदिवस. अशोक सराफ यांनी आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर मराठी रसिकप्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक आणि हिंदी मालिकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विशेष म्हणजे गेले अनेक वर्ष कलाविश्वामध्ये वावर असणाऱ्या अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये सारेच जण ‘मामा’ या विशिष्ट नावाने हाक मारतात. मात्र त्यांना ‘मामा’ का म्हणतात हे फार कमी जणांनाच माहित आहे. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात त्यांच्या या खास नावाविषयी.
मुंबईमध्ये जन्मलेले अशोक सराफ मुळचे बेळगावचे असून दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात त्यांचे बालपण गेले. सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड असलेल्या अशोक सराफ यांनी वयाच्या १८ व्या वर्षी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. त्यांनी काही संगीत नाटकांतूनदेखील भूमिका केल्या आहेत.
“नाटक, चित्रपट, मालिका असा प्रवास करत असतांनाच त्यांना ‘मामा’ हे नाव पडलं. त्याचं हे नाव पडण्यामागेदेखील रंजक किस्सा आहे. काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामन होता. तो अनेक वेळा सेटवर त्याच्या मुलीला घेऊन येत असते. त्यावेळी मला पाहिल्यानंतर त्याची मुलगी कायम माझ्याकडे बोट दाखवत हे कोण ? असं विचारायची, त्यावेळी प्रकाशने तिला हे अशोक मामा असून तू त्यांना ‘अशोक मामा’ म्हणत जा असं सांगितलं.तेव्हापासून ती मला मामा म्हणते. विशेष म्हणजे कालांतराने तिच्यामुळे सेटवरील प्रत्येक जण मला हळूहळू मामा म्हणू लागले आणि मला मामा हे नवीन नाव मिळालं”.
अशोक सराफ हे पडद्यावर प्रेक्षकांना त्यांच्या गप्पांनी आणि अफलातून विनोदबुद्धीने खळखळून हसवतात. पण त्यांना स्वत:ला मात्र जास्त गप्पा मारायला आवडत नाही. त्यांना बोलतं करावं लागतं, त्यांना स्वत:हून बोलायला आवडत नाही.