आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला, विनोदी भूमिका सादर करताना आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवलं असे लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ यांचा आज ४ जून रोजी वाढदिवस. ते मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. अशोक सराफ यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. पण अनेक चित्रपटांमध्ये त्यांचे शर्टाचे पहिले बटण कायम उघडे असायचे. या मागचे कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशोक सराफ यांनी स्वत: यामागचे कारण सांगितले आहे.
अशोक सराफ यांनी अलिकडेच लोकसत्ता डॉट कॉमच्या ‘डिजिटल अड्डा’ या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. दरम्यान त्यांना अनेक चित्रपटांमध्ये शर्टाचे पहिले बटण कायम उघडे का असायचे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले होते.
आणखी वाचा : ..तेव्हापासून अशोक सराफ ‘मामा’ म्हणून ओळखले जाऊ लागले
‘शर्टाचे पहिले बटण बंद केले तर सगळा अभिनय माझ्या गळ्याशी यायचा. म्हणून मी उघडं ठेवायचो. त्यानंतर काही वर्षे मी स्टाइल म्हणून ते ठेवलं होते आणि त्यावेळी ती स्टाइल देखील होती’ असे मजेशीर उत्तर अशोक मामांनी दिले होते.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशोक सराफ हे विनोदाचे बादशाह म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘गंमत जंमत’, ‘फेका फेकी’, ‘आयत्या घरात घरोबा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून आपल्या अफलातून अभिनयाचे प्रदर्शन केले आहे.