यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३९ जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणारे अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना मानाचा समजला जाणारा ‘पद्मश्री’ हा पुरस्कार जाहीर झाला. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमातील त्यांच्या आजवरच्या कामाचा सन्मान म्हणून त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार जाहीर होताच अवघ्या कलासृष्टीसह त्यांच्या असंख्य चाहते मंडळींनी आनंद व्यक्त केला.
अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळणं ही मराठी सिनेसृष्टीसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. त्यांना मिळालेल्या या मोठ्या सन्मानाबद्दल त्यांचं आजही सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशातच अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी अशोक सराफांना मिळालेल्या ‘पद्मश्री’ पुरस्कारानिमित्त एका खास कौतुक सोहळ्याचे आयोजन केलं होतं. या सोहळ्याला सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार आणि उद्योग व मराठी भाषा विकास मंत्री उदयजी सामंतही उपस्थित होते.
प्रशांत दामलेंनी अशोक सराफांच्या केलेल्या कौतुक सोहळ्याबद्दल निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी आभार मानले आहेत. याबद्दल त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक खास पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “प्रशांत दामले… तुला सलाम! अशोक सराफांना पद्मश्री पुरस्कार मिळाला याचा तुला एवढा आनंद झाला की, तू खास त्यांच्या सन्मानार्थ कौतुक सोहळा ठेवलास. मित्र परिवाराला आमंत्रित केलंस. सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार आणि उद्योग व मराठी भाषा विकास मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केलास.”
यापुढे निवेदिता यांनी असं म्हटलं आहे की, “इतकं प्रेम आणि इतकं कौतुक क्वचितच बघायला मिळतं. एका मित्राने दुसऱ्या मित्राचा केलेला हा सन्मान खूपच ह्रदयस्पर्शी होता. तुझे आणि तुला नेहमीच खंबीर साथ देणाऱ्या गौरीचे खूप खूप आभार.” निवेदिता यांनी शेअर केलेल्या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. शिवाय या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्समध्ये अशोक सराफ व प्रशांत दामले या दोन्ही अभिनेत्यांचं कौतुक केलं आहे.
पद्मश्री पुरस्कार मिळण्याआधी मागच्या वर्षी २०२४ मध्ये अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होतं. त्यानंतर २०२५ मध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. याबद्दल अनेकांनी आनंद व अभिमान व्यक्त केला होता. दरम्यान, अशोक सराफ सध्या कलर्स मराठीवरील ‘अशोक मा. मा.’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. शिवाय त्यांचा अशी ही जमवा जमवी हं चित्रपट येत्या १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.