‘पोस्टर बॉइज’ आणि ‘पोस्टर गर्ल’ या धमाल मॅड कॉमेडी चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्र गाजवल्यानंतर समीर पाटील आता ‘शेंटीमेंटल’ या नवीन चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना हसून हसून मेंटल बनवायला सज्ज झाला आहे. सामाजिक प्रश्नांवर विनोदी शैलीत भाष्य करणारा दिग्दर्शक अशी समीर पाटील याची ओळख झाली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीमध्ये ‘शेंटीमेंटल’ या नवीन चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
वाचा : .. अन् सुहानावर खिळल्या सर्वांच्या नजरा
आर आर पी. कॉर्पोरेशन आणि बनी डालमिया प्रस्तुत ई. सी. एम. पिक्चर्स निर्मित असणाऱ्या या चित्रपटाचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रदीर्घ काळानंतर, विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी प्रसिद्ध असणारे अशोक सराफ महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये ‘शॉल्लीड’ क्रेझ निर्माण झाली आहे. उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोरे, रघुवीर यादव आदी कलाकारांचा समावेश असणारा हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
वाचा : ऐश्वर्याला ‘कोल्हीण’ का म्हणाली कतरिना?
हवालदाराचा वेष मामांसाठी खरच खूप खास आहे. १९७५ मध्ये त्यांच्या करियरची सुरुवात ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने झाली होती. त्यात त्यांची हवालदारची भूमिका खूप गाजली होती आणि आता ४२ वर्षानंतर ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटात देखील ते हवालदारच्या, किंबहुना हवालदाराच्या भूमिकेतून बढती घेऊन सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहेत. अशोक मामांचा अभिनय आणि संवाद शैलीतील ‘अचूक टायमिंग’ याला संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत तोड नाही. गेली ४०-४५ वर्षं आपल्या चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या – प्रसंगी मामा बनवणाऱ्या मामांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली होती. तसेच, चित्रपटाचा पहिला पोस्टरही त्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता.