छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका आता रंगतदार वळणावर आली आहे. गुरुनाथने फसवल्यानंतर स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी राहिलेली राधिका लवकरच दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. राधिका तिच्या कॉलेज मित्रासोबत म्हणजे सौमित्रसोबत लग्न करणार आहे. त्यामुळे सध्या सौमित्र आणि राधिका या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु झाली आहे. त्यातच त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने या मालिकेमध्ये एका नव्या सदस्याची एण्ट्री झाली. हा नवा सदस्य म्हणजे सौमित्रची आई. विशेष म्हणजे सैमित्रच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने तब्बल ४० वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे. इतकंच नाही तर ही अभिनेत्री ४० वर्षांपूर्वी प्रचंड लोकप्रिय होती.
सौमित्रच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव वंदना पंडित असं असून १९७९ सालीच्या अष्टविनायक या चित्रपटामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. सचिन पिळगांवकर यांच्यासोबत वंदना पंडित हिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटातील “अष्टविनायका तुझा महिमा कसा… ” हे गाणं त्या काळी विशेष गाजलं होतं. इतकंच नाही तर आजही या गाण्यातील गोडवा कमी झालेला नाही. या गाण्यात आशा काळे, रवींद्र महाजनी, अशोक सराफ, उषा चव्हाण, जयश्री गडकर असे दिग्गज कलाकार झळकले होते. या गाण्यासोबतच ‘प्रथम तुला वंदितो’, ‘दिसते मजला’ ही गाणी लोकप्रिय झाली होती.
वाचा : ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरा परदेशात विकतो दिवाळीचा फराळ
वाचा : Photo : ‘चला हवा येऊ द्या’मधील तुषार देवलची पत्नी आहे ही लोकप्रिय अभिनेत्री
दरम्यान, वंदना पंडितने या चित्रपटाव्यतिरिक्त ‘घाशीराम कोतवाल’ हा चित्रपटही केला होता. त्यानंतर तब्बल ४० वर्षांनी ही अभिनेत्री ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.