बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘माय चॉइस’ हा बहुचर्चित व्हिडिओ हॉलिवूड अभिनेता अॅश्टन कुचरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी एकत्र येऊन ‘माय चॉइस’ व्हिडिओ साकारला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून स्त्री-सबलीकरण आणि तिच्या स्वातंत्र्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिनेत्री निम्रत कौर, लेखिका आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या वयातील ९९ भारतीय स्त्रियांचा या व्हिडिओमध्ये समावेश करण्यात आला आहे. दीपिकाने व्हिडिओमध्ये काम करण्याबरोबरच आपला आवाजदेखील दिला आहे. स्त्री-पुरुष समानता ही केवळ बोलण्याची गोष्ट नसून, ती प्रत्येकाच्या कृतीमधून दिसली पाहिजे, असा संदेश देणारा हा व्हिडिओ ऑनलाइन झळकताच चर्चेला उधाण आले. अनेकांनी या व्हिडिओचे कौतुक केले असले, तरी काही जणांकडून यावर टीका करण्यात आली. दीपिकाचा ‘माय चॉइस’ व्हिडिओ शेअर करणाऱ्या कुचरने स्त्रियांच्या सुरक्षेवरील अलिया भटच्या लघुपटाचेदेखील कौतुक केले होते. ‘गोईंग होम’ नावाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन ‘क्वीन’ चित्रपट साकारणाऱ्या विकास बहलने केले होते.
पाहाः दीपिका म्हणते, ‘इट इज माय चॉइस’