बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेतील आघाडीचे प्रथितयश दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी लगान, स्वदेस, जोधा अकबर असे नावाजलेले चित्रपट दिले आहेत. आपल्या सर्वच चित्रपटांमध्ये विषय, शैली, दृष्टिकोन या सर्व बाबतींत त्यांनी वेगळेपणा जपला आहे. त्यांच्याकडे असलेला अनुभवाचा हाच वैचारिक ठेवा चित्रपटसृष्टीत असलेल्या चित्रकर्मींना जाणून घेता यावा यासाठी डॉ. व्ही शांताराम यांच्या व्ही शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टच्या सिने कल्चरल सेंटरच्या वतीने परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
रविवारी १९ जुलैला दुपारी २.३० वाजता रविंद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर येथे  हा परिसंवाद रंगणार आहे. अधिकाअधिक चित्रकर्मींनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा असे आवाहन या उपक्रमाचे संकल्पनाकार हर्षल बांदिवडेकर यांनी केले आहे. याआधी नितीन देसाई, मधुर भंडारकर यांच्या झालेल्या दोन परिसंवादाना चित्रकर्मींचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.
डॉ. व्ही शांताराम ट्रस्टच्या या उपक्रमाचे चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी कौतुक केलं आहे. बॉलिवूडच्या यशाचा कानमंत्र व आशुतोष गोवारीकर यांचा चित्रपटसृष्टीतील अनुभव चित्रकर्मींना नक्कीच मोलाचा ठरेल असा विश्वास डॉ. व्ही शांताराम ट्रस्टचे अध्यक्ष श्री. किरण शांताराम यांनी व्यक्त केला.

Story img Loader