आशिया चषक स्पर्धेमध्ये अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या भारत-पाकिस्तान सामना भारताने पाच गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. भारताला शेवटच्या तीन चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्याने षटकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या या दमदार विजयानंतर सर्वत्र एकच जल्लोष पाहायला मिळाला. भारताच्या आशिया चषक स्पर्धेतील विजयानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचे कौतुक करताना दिसत आहे. अभिनेता रितेश देशमुख, कार्तिक आर्यन यांसह अर्जुन रामपाल या तिघांनीही भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे.
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यातील भारताच्या विजयी सलामीवर रितेश देशमुखने खास पद्धतीने एक ट्वीट केले आहे. यात त्याने हार्दिक पंड्यासह सर्व टीमला या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“हार्दिक पंड्या तुझे फार कौतुक. सामना छान रंगला आणि आपण विजयी ठरलो. खूपच छान. भारतीय संघाचे अभिनंदन. त्यासोबत पाकिस्तानचा संघही चांगला खेळला”, असे ट्वीट रितेश देशमुखने केले आहे. त्यासोबत त्याने #INDvsPAK या हॅशटॅगचाही वापर केला आहे.
त्यासोबतच अभिनेता कार्तिक आर्यन यानेही इन्स्टाग्रामवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने भारतीय संघाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या मागे भुलभुलेय्या २ या चित्रपटातील गाणेही पाहायला मिळत आहे. याला कॅप्शन देताना तो म्हणाला, भारत-पाकिस्तान सामन्यात भारत जिंकावा अशी प्रार्थना मी दिवस रात्र करत असतो. त्यासोबत त्याने #HardikRoohBaba असा हॅशटॅग शेअर करत हार्दिक पांड्याचे कौतुक केले आहे.
तसेच अभिनेता अर्जुन रामपालनेही याबाबत एक ट्वीट केले आहे. भारतीय टीमने दमदार कामगिरी केली. हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा तुमचे खूप खूप आभार. इंडिया रॉक्स, असे अर्जुन रामपालने म्हटले आहे.
दरम्यान आशिया चषक स्पर्धेतील बहुचर्चित अशा भारत-पाक सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य भारताने पाच गडी राखून गाठले. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात आपली भूमिका चोखपणे बजावली. त्याने गोलंदाजीमध्ये तीन गडी बाद करून पाकिस्तान संघाला रोखलं तर भारताची स्थिती बिकट झालेली असताना त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावत ३३ धावा केल्या.