आशिया चषक स्पर्धेतील सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दमदार विजय मिळवला. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्याचा सेलिब्रेटींसोबतच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आनंद लुटला. सामना जिंकल्यानंतर जगभरातील भारतीयांनी एकच जल्लोष केला. या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामना जिंकल्यानंतर त्यांनी सहकाऱ्याने दिलेला भारताचा झेंडा हातात पकडण्यास नकार देतानाची दृष्य कॅमेरात कैद झाली आहेत. या कृतीवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी यावरुन केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे.
अभिनेते प्रकाश राज हे नेहमी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी ट्वीटरवर एक ट्वीट शेअर केले आहे. त्यात त्यांनी जय शाह यांच्या कृतीवर भाष्य केले आहे. नुकतंच प्रकाश राज यांनी एक ट्वीट केले आहे.
प्रकाश राज काय म्हणाले?
“प्रिय सर्वोच्च नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह…जय शाह यांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी भारताचा तिरंगा हातात धरुन फडकवायला हवा हे गरजेचं नाही. पण जर कुणी बिगर भाजपा, बिगर हिंदू किंवा माझ्याप्रमाणेच तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या एखाद्या व्यक्तीने असं काही केलं असतं, तर त्यावर तुमची किंवा भाजपाच्या भक्तमंडळींची काय प्रतिक्रिया असती?” असा प्रश्न प्रकाश राज यांनी केला आहे. प्रकाश राज यांचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्वीटवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताने रंगतदार लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गडी आणि दोन चेंडू राखून पराभव करत विजयी सुरुवात केली. गोलंदाजी आणि फलंदाजीच्या आघाडीवर जबरदस्त चुरस दिसून आली. या सामन्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह सुद्धा उपस्थित होते.
भारताने हा सामना जिंकल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. जय शाह यांनीही आधी जल्लोष केला. त्यानंतर ते टाळ्या वाजवत होते.
त्याचवेळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या एका सहकाऱ्याने त्यांच्या हातात तिरंगा देऊ केला. मात्र शाह यांनी ‘नो, नो’ म्हणत तिरंगा हातात घेण्यास नकार दिला आणि ते टाळ्या वाजवत राहिले. हा सर्व घटनाक्रम मैदानातील कॅमेरांमध्ये कैद झाला आणि थेट प्रक्षेपणामध्येही दिसला.