प्रत्येकाला आपल्या लाडक्या आणि नावाजलेल्या व्यक्तींविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. ही कलाकार मंडळी त्यांच्या खऱ्या आयुष्यात कशी आहेत किंवा त्याच्या यशामागचं गमक काय हे आणि असे अनेक प्रश्न सामान्य माणसांच्या मनात असतात. याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी कर्लस मराठी वाहिनीवर ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शविली असून या आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले आणि गायक आनंद शिंदे या कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थिती दर्शविणार आहे.
मकरंद अनासपुरे यांच्यासोबत रंगणाऱ्या या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनमुराद गप्पा मारल्या असून काही प्रश्नांची एकदम बेधडक उत्तरं दिली आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी त्यांच्या उत्स्फुर्त सुचणाऱ्या कवितांविषयीही गप्पा मारल्या. अनेक वेळा ते पार्लमेंटमध्ये किंवा सभेमध्ये बसू कविता रचतात असंही त्यांनी सांगितलं.
आनंद शिंदे यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. ‘माझ्या बारशाला माझ्या वडीलांनी मला दहा हजार रुपयांवर झोपवलं होतं. ही एक आमच्यासाठी गोड आठवण आहे. मोठ्या झाल्यावर मी गायक होईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला कायम असंच वाटायचं की मी म्युन्सिपाल्टीमध्ये काम करेन. पण माझ्यात प्रल्हाद शिंदे यांचं रक्त आहे त्यामुळेच माझा कलदेखील गायकी क्षेत्राकडे आपोआप वळत गेला आणि मी गायक झालो,’ असं आनंद यांनी सांगितलं.
दरम्यान, चक्रव्ह्यु या राऊंडमध्येही मकरंद अनासपुरेने या दोघांना रोमांचक प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तर या दोघांनी काय आणि कशी दिली हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तेव्हा बघयाला विसरू नका धमाकेदार भाग येत्या गुरु आणि शुक्र रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.