रहस्यमय बाज जपणारे ‘मास्टर माईंड’ हे नवे नाटक आता रंगभूमीवर आले आहे. गेल्याच आठवडय़ात या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग पार पडले असून ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे हे १०६ वे नाटक आहे. या नाटकात आस्ताद काळे व अदिती सारंगधर या कलावंतांच्या मुख्य भूमिका आहेत.
विशेष म्हणजे ‘मास्टर माईंड’ या नाटकाच्या निमित्ताने आस्ताद काळे व अदिती सारंगधर हे दोघे पुन्हा एकदा रंगभूमीवर एकत्र दिसणार असून, या दोघांनी रंगभूमीवर हॅटट्रिक साधली आहे. आता या नाटकातला खरा ‘मास्टर माईंड’ कोण हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रकाश बोर्डवेकर हे या नाटकाचे लेखक असून त्याची रंगावृत्ती सुरेश जयराम यांनी केली आहे. निर्माते अजय विचारे हे त्यांच्या ‘अस्मय थिएटर्स’ या संस्थेतर्फे हे नाटक रंगभूमीवर आणत आहेत. या नाटकाची प्रकाशयोजना शीतल तळपदे यांनी केली आहे. अशोक पत्की यांचे संगीत आणि प्रदीप मुळय़े यांचे नेपथ्य या नाटकाला लाभले आहे. नाटकासाठी वेशभूषेची जबाबदारी मंगल केंकरे यांनी सांभाळली आहे. अभय भावे व शरद रावराणे हे या नाटकाचे सहनिर्माते आहेत, तर श्रीकांत तटकरे हे या नाटकाचे सूत्रधार आहेत.