तब्बल ३ वर्षांनी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. २०१८ च्या झीरो चित्रपटात शाहरुख शेवटचा झळकला होता. त्या चित्रपटाच्या अपयशानंतर शाहरुखने काही काळ इंडस्ट्रीपासून फारकत घेतली होती. आता पुढील वर्षी चक्क ३ चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख पुन्हा जोरदार कमबॅक करणार आहे. त्याचा ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत आणि राजकुमार हिरानी यांच्याबरोबरच्या ‘डंकी’ या चित्रपटाचं चित्रीकरण अजून सुरू व्हायचं आहे.
साऊथचा दिग्दर्शक अॅटली कुमारच्या दिग्दर्शनाखाली शाहरुख ‘जवान’ या चित्रपटात एका वेगळ्याच अवतारात आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात सुपरस्टार विजय सेतुपतीदेखील दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतंच या चित्रपटाच्या सॅटलाईट आणि ओटीटी हक्काबद्दल नवीन माहीती समोर आली आहे.
या चित्रपटाच्या सॅटेलाईट आणि ओटीटी हक्कांमुळे ‘जवान’ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच चांगलाच नफा कमावला असल्याचं म्हंटलं जात आहे. एका चित्रपटाच्या बजेट एवढी ही कमाई असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटाचे ओटीटी हक्क नेटफ्लिक्सने घेतले असून सॅटेलाईट हक्क झी टीव्हीकडे आहेत. असं म्हंटलं जात आहे की हे दोन्ही मिळून ‘जवान’चे हक्क २५० कोटी मध्ये विकले गेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच त्यांचा नफा मिळवला असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत.
आणखी वाचा : ‘छेलो शो’च्या ऑस्करवारीमुळे एक वेगळाच वाद सुरू, चित्रपटावर लागले नक्कल केल्याचे आरोप
‘जवान’मध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय विजय सेतूपती आणि सान्या मल्होत्रा हे दोघेही दिसण्याची शक्यता आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २ जूनला चित्रपटगृहात झळकणार आहे. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याची चर्चासुद्धा सोशल मीडियावर होत आहे. याबरोबरच पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात शाहरुखचा ‘पठाण’ प्रदर्शित होणार आहे.