बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खानचा लवकरच ‘अतरंगी रे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ डिसेंबर रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचले. त्यावेळी साराने तिचा एक अतरंगी किस्सा सांगितला आहे. ती आईशी खोटं बोलून घरातून बाहेर गेली होती पण एका पत्रकारामुळे तिचे खोटे पकडले गेले असे सारा म्हणाली.
सारा हा अतरंगी किस्सा सांगताना म्हणाली, ‘मी एकदा आईशी खोटं बोलले होते आणि मी असे करायला नको होते. शेजाऱ्यांकडे जात आहे असे सांगून मी ट्रेनने एल्फिन्स्टन स्टेशनला गेले होते.’ त्यानंतर साराला आईने कुठे गेली होती असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देत तिने ‘मी माझ्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेले होते. पण कोणत्या तरी पत्रकाराने आईला फोन करुन सांगितले होती की तुमच्या मुलीचा तुम्ही योग्य पद्धतीने सांभाळ केला आहे. पण ती लोकल ट्रेनने प्रवास करत होती. त्या पत्रकाराने माझा फोटो देखील आईला पाठवला होता. माझे खोटे पकडले गेले होते.’
आणखी वाचा : छोट्या भावाला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून सलमान खानने काढला होता पळ
त्यानंतर कपिलने साराला विचारले की हे तुझ्या आईशी शेवटचे खोटे बोलली आहेस का? की त्यानंतर ही तुला खोटे बोलावे लागले होते? त्यावर उत्तर देत सारा म्हणाली, ‘नाही, मी अनेकदा खोटे बोलले आहे. पण देवाच्या कृपेने कुणी माझा फोटो नाही काढला.’
‘अतरंगी रे’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे. या दोघांनी यापूर्वी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला २०२० मध्ये सुरुवात झाली होती.