काही व्यक्ती या काळाचं अपत्य असतात. तर काही अपवादात्मक व्यक्ती काळाला भेदून त्यावर स्वार होत अविरत कालपटावर आपलं स्वत:चं असं स्वयंभू स्थान निर्माण करतात. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे अशांपैकी एक होते. एखाद्याची स्तुती करताना अत्रे, दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही, असं म्हणत. खरं तर त्यांना स्वत:लाच हे विशेषण अतिशयोक्ती न वाटता चपखल लागू पडतं. एखादी व्यक्ती आपल्या हयातीत साधारणत: किती क्षेत्रं पादाक्रांत करू शकते याला काही मर्यादा आहेत. परंतु अत्र्यांनी ती खोटी ठरवली आहे. शिक्षक, प्राचार्य, नवयुग वाचनमालेसारखे अनेकानेक शैक्षणिक प्रयोग करणारे द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ, वक्ते, वादविवादपटू, कवी, विडंबनकार, ललितलेखक, विनोदी, गंभीर, प्रवासवर्णनपर, वैचारिक अशी चतुरस्र साहित्यसंपदा प्रसवणारे साहित्यसम्राट, वृत्तपत्रकार, नाटककार, नाटय़निर्माते, चित्रपटकार, राजकारणी, समाजकारणी, पीडित-शोषितांचे त्राते, संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचे सेनानी.. अशी त्यांच्या कर्तृत्वाची प्रदीर्घ यादी देऊनही दशांगुळे उरणारे अत्रे कवेत घेणं, हे येरागबाळ्याचं काम नोहे. स्वत: अत्र्यांनी ‘कऱ्हेचे पाणी’चे अनेक खंड लिहून आपल्या बहुमुखी व्यक्तित्वाची ओळख करून दिलेली आहेच. त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या शिरीष पै यांनीही त्यांच्या आत्मचरित्रपर लेखनातून सुटलेले अत्रे अलीकडेच शब्दांकित केलेले आहेत. इतकं प्रचंड ‘खंडीय’ आयुष्य जगलेल्या महापुरुषाला दोन-अडीच तासांच्या सीमित अवधीत सर्वागानं उभं करणं खुद्द अत्र्यांनाही जमलं असतं की नाही, शंका आहे. (या विधानावर अत्रेभक्त तुटून पडतील. परंतु ते अत्र्यांच्या अतिशयोक्तीपूर्ण शैलीतलं आहे, हे आधीच नमूद करतो.) त्यामुळे अशोक हांडे यांच्या ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ या चरित्रपर कार्यक्रमाला जाताना निराशेची मानसिक तयारी ठेवूनच गेलो होतो. परंतु सुखद आश्चर्याची गोष्ट म्हणजे हांडे यांनी या कार्यक्रमात ‘संपूर्ण अत्रे’ त्यांच्या काळासह अत्यंत प्रगल्भतेनं उभे केले आहेत. ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ पाहिल्यानंतर अत्र्यांच्या सर्वव्यापी व्यक्तिमत्त्वाचा कुठलाही पैलू अस्पर्श राहिलाय असं अजिबात वाटत नाही. आणि हेच या कार्यक्रमाचं यश आहे. अर्थात अशोक हांडे यांनी सुरुवातीलाच लहान मुलांसारखं ‘टाइम प्लीज’ घेत, ‘अत्र्यांचं कर्तृत्व इतकं प्रचंड आहे, की त्यांनी काय काय केलं हे सांगण्यापेक्षा काय नाही केलं हे सांगणं सोपं आहे,’ अशी कबुली देऊन अटकपूर्व जामीन घेतलेला आहेच.
खरं म्हणजे आजच्या पिढीला आचार्य अत्रे हे केवळ नावानंच माहीत आहेत. त्यांच्या दंतकथाच त्यांच्या कानावरून गेलेल्या असण्याची शक्यता अधिक. त्यांची नाटकं अद्यापि रंगभूमीवर पुनरुज्जीवित होत असल्यानं एक नाटककार म्हणून त्यांची ओळख त्यांना अधिक आहे. बाकी अत्र्यांचं चौफेर कार्यकर्तृत्व त्यांना माहीत असण्याचं कारण नाही. अत्र्यांना जाऊनही आता जवळजवळ अर्धशतक लोटलंय. जिथं राजीव गांधी कोण होते, हे आजच्या विशीतल्या पिढीला माहीत नाहीत, तिथं अत्र्यांचं प्रचंड व्यक्तिमत्त्व परिचित असणं अवघडच. अशा पिढीला अत्रे समजावून सांगण्याची निकड अशोक हांडे यांना जाणवली. असा एक मनस्वी, कलंदर, कर्तृत्वाचा महामेरू या महाराष्ट्रात होऊन गेला, हे आजच्या स्वकेंद्री पिढीला सांगण्याची आत्यंतिक गरज होतीच. ती पूर्ण करताना अत्र्यांची आरती तर गायची नाही; परंतु त्यांचं बहुआयामी महाकाय व्यक्तिमत्त्व त्यांनीच लिहिलेल्या गाण्यांतून, कवितांतून, वक्तव्यांतून उलगडून दाखवायचं, हे अक्षरश: शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं. आणि हांडे त्यात दोनशे टक्के यशस्वी झालेले आहेत. शिवाजीराजांच्या घोडदळाचे प्रमुख असलेल्या अत्र्यांच्या घराण्याच्या मूळ पुरुषापासून सुरू झालेली ही अत्रे जीवनगाथा काळाचा व्यापक पट ओलांडत तत्कालीन देश-काल-परिस्थितीचं समग्र चित्र आपल्यासमोर उभं करते. अत्र्यांच्या प्रचलित किश्श्यांमध्ये न अडकता ‘बाल अत्रे ते विविध क्षेत्रांतील अग्रणी अत्रे’ हा प्रवास या चरितपटात रेखाटला गेला आहे. अत्र्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना-प्रसंगांचीदेखील नुसती निवड करायचं म्हटलं तरी दमछाक व्हावी इतकं त्यांचं महाप्रचंड कर्तृत्व. तरीही हांडे यांनी त्यांच्या आयुष्यातले निवडलेले टप्पे, त्यावेळची सामाजिक-राजकीय परिस्थिती, त्यानं अत्र्यांच्या जडणघडणीला आणि चौफेर कर्तृत्वाला फुटलेले धुमारे, बऱ्या-वाईट परिणामांचा विचार न करता कशालाही बेधडकपणे भिडायची त्यांची निडर वृत्ती, त्यांचं मनस्वीपण, त्यांच्या वरपांगी नि:संग वाटणाऱ्या व्यक्तित्वातील हळुवार कोमलता, जीवनातील उन्नत, उदात्त, महन्मंगलाबद्दल त्यांना असलेली ओढ, एकीकडे रसरसून आयुष्य जगणाऱ्या अत्र्यांच्या ठायी संतमहात्म्यांसारखी असलेली सुप्त विरागी वृत्ती, एकाच वेळी अनेक क्षेत्रांत उत्तुंग झेप घेण्यासाठी आवश्यक उपजत विलक्षण प्रतिभाशक्ती आणि काळ्यामिट्ट अंधारातही उडी घेण्याची बेदरकार धमक.. या सगळ्याचं चमत्कार वाटावा असं रसायन अत्र्यांच्या ठिकाणी एकवटलेलं होतं. हे सारं ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’मध्ये बैजवारपणे येतं.
आणि अत्र्यांची गोष्ट सांगण्याच्या निमित्तानं तो सबंध काळ, त्या काळाची सामाजिक-सांस्कृतिक घडण, तत्कालीन राजकीय परिस्थिती, माणसांचं जगणं, त्यांची मूल्यं, महाराष्ट्रातील तेव्हाचा भावगीतांचा सुवर्णकाळ असं आजूबाजूचं अवघं पर्यावरणही उभं करण्यात ‘अत्रे..’चे कर्ते अशोक हांडे हे यशस्वी झाले आहेत. हे सारंच अत्र्यांच्या आयुष्याशी एकरूप झालेलं होतं. त्यानंच अत्रे नामक एक ‘चमत्कार’ जन्माला घातला. हे सगळं शब्दांतून व्यक्त होत असतानाच पाश्र्वपडद्यावर तो काळ समूर्त होताना दाखवला आहे. त्यामुळे त्याला एक अस्सलता प्राप्त झाली आहे. अत्र्यांच्या चित्रपटांतील किंवा त्यांनी लिहिलेली अनेक गाणी आजच्याच काय, पण कालच्या पिढीलाही अपरिचित वाटावीत अशी आहेत. त्यांच्यावर चढलेली अज्ञाताची आणि काळाची पुटं साफसूफ करून ती पुन्हा यानिमित्तानं ‘अत्रे’मध्ये उजळविली गेली आहेत. केवळ निवेदनातूनच नव्हे, तर ‘दिनूचं बिल’सारखी बालमनांवर संस्कार घडविणारी सुगम गोष्ट, ‘साष्टांग नमस्कार’मधील ‘चिंचेवर चंदू चढला’ या विडंबनगीताची नाटय़पूर्ण पेशकश, ‘खबरदार जर टाच मारूनि..’ या ओजस्वी कवितेचं त्यात अभिप्रेत असलेल्या भावार्थासह झालेलं सादरीकरण, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ‘उगवला हा चंद्र पुनवेचा’ या नाटय़पदातून महाराष्ट्राचा मंगल कलश मराठीजनांच्या पदरी पडल्यावर त्यांना झालेला निखळ आनंद.. असे कधी अंगावर रोमांच उभे करणारे, तर कधी गहिवरून टाकणारे, कधी अत्र्यांच्या मिश्कील हजरजबाबीपणाचा प्रत्यय देणारे अनेक क्षण ‘अत्रे..सर्वत्रे’मध्ये अधेमधे पेरलेले आहेत. यात निवडलेली चपखल व समयोचित गाणी हा तर एक स्वतंत्र लेखाचाच विषय ठरू शकेल. सुरेश बापट, नीलाक्षी पेंढारकर, मैथिली जोशी, सचिन मुळ्ये, प्रमोद सोहोनी आणि स्मिता जोशी या गायक कलाकारांनी ती संस्मरणीय केली आहेत. ‘अत्रे’मधील वादक मंडळींचाही कार्यक्रमाच्या यशस्वीतेत अतिशय मोलाचा वाटा आहे. यानिमित्ताने संगीत संयोजक महेश खानोलकर आणि ज्ञानेश देव यांनी अत्र्यांची विस्मृतीत गेलेली किंवा अपरिचित अशी गाणी त्यांतल्या गोडव्यासह पुनश्च रसिकांसमोर पेश केली आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. दिलीप बोनाटे यांचं ध्वनिसंयोजन, सुनील जाधव यांची प्रकाशयोजना, प्रसाद ठक्कर यांची रंगभूषा आणि सुजय हांडे यांच्या व्हिडीओनं कार्यक्रमाच्या निर्मितीमूल्यांत महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे.
अत्र्यांचं समग्र व्यक्तिमत्त्व रसील्या गोडव्यासह साकारणारा ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ हा कार्यक्रम एका सर्वार्थानं महाकाय अशा माणसाच्या जीवनदर्शनाचा आनंद तर देतोच; शिवाय त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या परिचयातून स्फूर्ती मिळवण्यासाठीही प्रत्येकानं एकदा तरी नक्कीच पाहावा असा आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा