ईशान्य आफ्रिकेतील इजिप्त देशातील महत्वाचा मानला जाणारा ‘ब्रिटिश युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल स्टुडन्ट्स फिल्म फेस्टिवल २०२४’ मध्ये ‘अत्तर’ या लघुपटाची निवड झाली आहे. हा चित्रपट महोत्सव ए. आय. शोरूक, न्यू कैरो, गव्हर्नरेट, इजिप्त या ठिकाणी १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

गटारात उतरून सफाईचे काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न हा जगभर आहे. गटारात काम करणाऱ्या वडिलांना एक अत्तराची बाटली मुलीला द्यायची आहे. त्यांच्या आयुष्यात सुगंधाची दरवळ आणण्यासाठी मुलीने केलेल्या धडपडीची कहाणी ‘अत्तर’ या लघुपटात दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी रंगवली आहे. ‘ब्रिटिश युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल स्टुडन्ट्स फिल्म फेस्टिवल २०२४’मध्ये ‘अत्तर’ची निवड होणे याचा खूप आनंद आहे. आम्ही केलेल्या कलाकृतीला जगाच्या पाठीवर मान्यता मिळणे, तेथील प्रेक्षकांची पसंती मिळणे ही आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, असे चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे आणि निर्माते राजू लुल्ला यांनी सांगितले. ‘अत्तर’मध्ये प्रमुख भूमिकेत मीरा शेडगे या बालकलाकाराने काम केले आहे. डार्क शॅडो मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि रुहानी म्युझिक निर्मित ‘अत्तर’चे लेखन – दिग्दर्शन रामकुमार गोरखनाथ शेडगे यांनी केले आहे. जगभरातील ६० देशांत ‘अत्तर’चा दरवळ रसिकांपर्यंत पोहोचला आहे.