औरंगाबादमध्ये वेरुळ- अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवातील ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ दरम्यान झालेल्या गोंधळाविषयी गायक- संगीतकार अतुल गोगावले यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता ऑनलाइन’कडे स्वतःची बाजू मांडली. या कार्यक्रमात साऊंड ट्रॅक अचानक बंद पडल्यामुळे अजय-अतुल यांची तारांबळ उडाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसून आमच्याविरोधात जाणुनबुजून नकारात्मक गोष्टी पसरविण्यात येत असल्याचा दावा अतुल यांनी केला. ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना अतुल गोगावले म्हणाले की, संपूर्ण भारतात आम्ही लाइव्ह कॉन्सर्ट करत असतो. ही काही पहिली वेळ नव्हती की आम्ही अशा प्रकारचा कोणता कार्यक्रम करत होतो. महाराष्ट्रामध्ये लाइव्ह कॉन्सर्ट ही संकल्पना मुळात आम्ही आणली असतानाही आम्ही लोकांसमोर असे का करु हा प्रश्न मलाच पडला आहे.
या कार्यक्रमात काही तांत्रिक बिघाडामुळे काही अडचणी आल्या. आम्ही दोघंही यामुळे खूप दुखावलो गेलो आहोत. या संपूर्ण कार्यक्रमात अनेक गोष्टींमध्ये अडचणी होत्या. प्रत्येक गोष्टीत गैरसोय होती. माझ्यासोबतच्या वादकांना वेळेत जेवणं मिळालं नाही. महिला कलाकारांना टॉयलेट्स उपलब्ध नव्हते. अशा सगळ्या अडचणींवर मात करुन आम्ही तो कार्यक्रम पार पाडला.
त्या कार्यक्रमावेळी एकाही प्रेक्षकाने अशी तक्रार केली नाही. मी स्वतः प्रेक्षकांमध्ये जाऊन गात होतो. अनेक लोक मला खेटून नाचत होते. जर आम्हाला फक्त ओठंच हलवायचे असते तर आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन गायलो असतो का? माझ्याकडे तो व्हिडिओही आहे. भारतात १२० वादक आणि भव्य व्यासपीठावर लाईव्ह परफॉर्मन्स देणारे आम्ही पहिलेच आहोत. आतापर्यंत असे कधीही घडले नव्हते.
अनेक मुलाखतींना, पुरस्कार सोहळ्यांना आम्ही गरज नसतानाही जातो. आणि इथे एवढे प्रेक्षक जर आमचं गाणं ऐकायला येणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर असे का वागू? मी आणि अजयने या घटनेला एवढे गांभीर्याने घेतले नाही. कारण कार्यक्रमांमध्ये अशा अनेक गोष्टी होतच असतात. पण या घटनेला एवढं वेगळं वळणं मिळेल याचा आम्ही विचारही केला नव्हता. ज्या कलेची आम्ही पूजा करतो, ज्या प्रेक्षकांनी आम्हाला मोठं केलं आहे त्यांच्याशीच आम्ही प्रतारणा कशी करु? त्या कार्यक्रमात अनेक गोष्टींची उणीव होती. या गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी हा सर्व प्रकार करण्यात आला आहे असे मला वाटते, असे अतुल यांनी सांगितले.