अतुल कुलकर्णी आपली प्रत्येक भूमिका जिवंत व्हावी यासाठी जे काही करता येणे शक्य असेल ते करतो. ‘नटरंग’मध्ये आधी पैलवानाच्या भूमिकेसाठी त्याने आपले वजन वाढवले आणि नंतर नाच्याच्या भूमिके साठी तेवढीच मेहनत घेऊन ते कमीही केले. मराठीतील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असलेला अतुल आता ‘हॅप्पी जर्नी’ या मराठी चित्रपटात टेम्पो ट्रॅव्हलर चालकाची (मालवाहू वाहन)भूमिका करतो आहे. चित्रपटातील आपली भूमिका अधिक उठावदार व्हावी यासाठी अतुल चक्क टेम्पो ट्रॅव्हलर चालवायला शिकला..
अतुल कुलकर्णी याला गाडी चालवता येते. पण, नेहमीची साधी गाडी आणि टेम्पो ट्रॅव्हलर चालविणे यात फरक आहे. गाडी चालवता येत असली तरी त्या अनुभवावर टेम्पो ट्रॅव्हलर सहज आणि सफाईदारपणे चालवता येतोच असे नाही. त्यामुळे हा चित्रपट आणि ‘त्या’ भूमिकेसाठी अतुलने मेहनत घेऊन टेम्पो ट्रॅव्हलर हे वाहन चालवण्याचे मनाशी नक्की केले आणि काही दिवसांत तो शिकलाही. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एक विशेष प्रकारची गाडी (हाऊस ऑन व्हिल्स) तयार करण्यात आली आहे. प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केलेल्या इमरान यांनी टेम्पो ट्रॅव्हलरचे रूपांतर एका विशेष गाडीत केले आहे. अतुलला चित्रपटात ही गाडी चालवायची आहे. त्याला ही गाडी सफाईदारपणे चालविता येत नव्हती. भूमिकेची गरज म्हणून अतुलने ही टेम्पो ट्रॅव्हलर गाडी चालविण्याचे प्रशिक्षणच घेतले. गाडी सरावाची व्हावी म्हणून पुणे ते गोवा दरम्यान अनेक फेऱ्याही मारल्या.
या सरावामुळे प्रत्यक्ष गोव्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याआधीच अतुल या गाडीचा सराईत चालक झाला. अतुल कुलकर्णीबरोबर या गाडीत अभिनेत्री प्रिया बापट आणि पल्लवी सुभाष त्याच्या सहप्रवासी असणार आहेत.