मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा माधव’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर मराठीत पुन्हा एकदा एक ऐतिहासिक चित्रपट-युद्धपट तयार होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील काही घटनांवर आधारित या चित्रपटात शिवाजी महाराज यांचे सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा लढवय्ये सरदार यांचा पराक्रम दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’चा थरार लवकरच ‘सात’ मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार असून अभिनेता अतुल कुलकर्णी ‘प्रतापराव गुजर’ ही भूमिका करणार आहे.
दार मोशन पिक्चर्स, आयएमई मोशन पिक्चर्स व ब्लू ड्रॉप फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे, सामर्थ्यांचे वर्णन ‘शिवकल्याण राजा’ या लोकप्रिय अल्बममध्ये करण्यात आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निवेदन आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील या अल्बममधील गाणी खूप लोकप्रिय ठरली आहेत. याच अल्बममध्ये प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहकारी सरदार यांच्यावरील कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले ‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गाणे आहे. प्रतापराव गुजर आणि विजापूरचा सरदार बहलोलखान यांच्यातील युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे. प्रतापराव यांनी बहलोलखान याचा पराभव केल्यानंतरही त्याला जीवदान दिले होते. तेव्हा ‘बहलोलखानाला मारल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका’असा निरोप शिवाजी महाराज यांनी त्यांना पाठविला. महाराजांचा आदेश मिळताच प्रतापराव आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी बहलोलखानच्या बारा हजार सैन्यावर चाल केली. यात त्यांना आणि सर्व सरदारांना वीरगती प्राप्त झाली होती. कोल्हापूरजवळील नेसरी येथे झालेल्या या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासह या वीरांमध्ये विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव विठ्ठल, पीळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोबा यांचा समावेश होता. अरुण रंगाचारी, विवेक रंगाचारी, सुहृद गोडबोले, निखिल महाजन यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष बेंडे यांचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा